पश्चिम विदर्भ : दलित-मुस्लीम फॅक्टरचा असणार वरचष्मा

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
पश्चिम विदर्भ : दलित-मुस्लीम फॅक्टर
पश्चिम विदर्भ : दलित-मुस्लीम फॅक्टर

 

विदर्भातील उर्वरित वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ या पाच लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ तारखेला मतदान होणार असून या सर्व मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अखेरच्या टप्प्यात उमेदवारांनी 'जात विषय' फोकस करणे सुरू केले असून आता घरोघरच्या प्रचाराला प्रारंभ झाला आहे. यावेळी दलित-मुस्लिम फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरणार आहे. तसेच ओबीसी मतदारही नाराज असून सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचा असंतोषही भोवण्याची शक्यता आहे.

यवतमाळात दोन्ही शिवसेना समोरासमोर
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेना आमने सामने उभ्या ठाकल्या आहेत. आघाडीचे संजय देशमुख व महायुतीच्या राजश्री पाटील या रिंगणात आहेत. आघाडीकडून अमृत पाणीपुरवठा योजना, भुमीगत गटार योजना, शहरातील वाढती गुन्हेगारी, आयात उमेदवार या मुद्यांवर भर देत आहेत तर महायुतीकडून रेल्वे, रस्ते आदी मुद्यांवर फोकस केला जात आहे. जातीय समीकरणात दोन्ही उमेदवार बसत आहेत. असे असले तरी इतर समाजाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

बुलडाण्यात तिरंगी लढत
बुलडाण्यात महायुतीचे प्रतापराव जाधव, दमदार अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर व महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर यांनी अशी तिरंगी लढत होण्याचे चित्र आहे. देशाचा विकास, जागतिक पातळीवर देशाचे नाव व मोठमोठे प्रकल्प या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी आपल्याला मत द्या, असे आवाहन प्रतापराव जाधव करीत आहेत. नदीजोड प्रकल्प व खामगाव जालना रेल्वेमार्ग हे देखील त्यांच्या प्रकाराचे प्रमुख मुद्दे आहेत. दुसरीकडे नरेंद्र खेडेकर शिवसेनेतील नेत्यांनी केलेली गद्दारी व पंधरा वर्षात जिल्ह्याची झालेली पीछेहाट या मुद्द्यांवर भर देताना दिसत आहे.

वर्ध्यातही चुरशीची लढत
वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपने रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. ते गत दोन निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले होते. यंदा त्यांच्यात व महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे यांच्यात थेट लढत आहे. ते आर्वी विधानसभेत तीन वेळा आमदार राहिले आहे. भाजपने जिल्ह्यात निर्माण केलेले संघटन आणि महाविकास आघाडीत असलेले गठबंधनातून जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रचारातील जोश या माध्यमातून रामदास तडस आणि अमर काळे यांच्यात थेट आणि चुरशीची लढत आहे.

अमरावतीत 'तिसरा' ठरविणार भवितव्य
राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या अमरावती लोकसभेच्या एससीसाठी राखीव असलेल्या जागेसाठी सुरू असलेली लढत आता निर्णायक वळणावर आली आहे. येथे महायुतीच्या विद्यमान खा. नवनीत राणाविरुद्ध महाविकास आघाडीचे बळवंत वानखेडे, प्रहारचे दिनेश बूब व वंचितचे आनंदराज आंबेडकर असा सामना होणार असला तरी प्रहारच्या उमेदवाराने सुद्धा चांगलाच जोर लावल्याने येथे तिरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे. मतांच्या विभाजनाचा फायदा कोणत्या उमेदवाराला होईल, यावर सध्या खल सुरू आहे. त्यातूनच दावे-प्रतिदावे करण्यात येत असले तरी मतदारांच्या मनात नेमके काय आहे, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचारात महायुतीच्या उमेदवार तसेच नेत्यांकडून देशात करण्यात आलेली विकासकामे व गेल्या दहा वर्षांत विविध क्षेत्रात झालेला कायापालट, यावर जोर दिला जात आहे. यासोबतच विरोधकांवर टीकादेखील केली जात आहे. काँग्रेसने गेल्या ७० वर्षांत कोणताच विकास केला नाही, असा आरोप करून या दहा वर्षांत झालेल्या बदलांची आकडेवारी सादर केली जात आहे.

अकोल्यात सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश 
अकोला मतदारसंघात सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड आक्रोश असल्याचे चित्र आहे. भाजपचे संजय धोत्रे पाचवेळा निवडून आले पण एवढ्या प्रदीर्घ काळात पाहिजे तेवढा विकास झालेला नसल्याने मतदार नाराज आहेत. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकरही मैदानात आहेत. त्यांचा हा पांरपरिक मतदारसंघ असल्याने त्यांचे कायमस्वरूपी अशा मतपेढी आहे. त्यांना जर मुस्लिम मते मिळाली तरच ते विजयापर्यंत जावू शकतात. परंतु, काँग्रेसने डॉ. अभय पाटील या मराठा समाजाच्या उमेदवारास रिंगणात उत्तरविल्याने भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला मोठी कसरत करावी लागत आहे.