इर्शाद वडगावकर : रशियन साहित्यात गरुडझेप घेणारा तरुण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 52 m ago
इर्शाद वडगावकर
इर्शाद वडगावकर

 

मृदगंधा दीक्षित 
 
एखाद्या घरात साहित्याची, वाचनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, केवळ एका भाषेच्या आणि पुस्तकांच्या वेडापायी एक तरुण कोल्हापूरच्या रस्त्यावरून थेट जेएनयू आणि तिथून पुढे थेट रशियापर्यंत मजल मारतो, ही कहाणी एखाद्या कादंबरीसारखीच वाटते. थेट रशियन साहित्यातून मराठीत अनुवाद करण्याचं मोलाचं काम करणाऱ्या कोल्हापूरच्या इर्शाद वडगावकर यांची ही कहाणी अशीच आहे. 
 
पुस्तकं आयुष्यात येण्याआधीचं बालपण
इर्शादचं मूळ घर कोल्हापूरच्या सोमवार पेठेतल्या लुगडी ओळ भागातलं. तिथे त्यांच्या आजोबांचं पानपट्टी आणि अंडी विकण्याची टपरी होती. १९९६ च्या दरम्यान ते घर विकून त्यांचं कुटुंब लक्षतीर्थ वसाहतीत राहायला आलं. इर्शादचे वडील चौथी तर आई सहावी पास. वडील गेली तीसहून अधिक वर्षं महाद्वार रोडवरील महालक्ष्मी धर्मशाळेसमोर गाडीवर होजिअरीचे कपडे विकतात. त्यांच्या नातेवाईकांपैकी बहुतांश लोक याच कपड्यांच्या व्यवसायात आहेत. तीन भावंडांमध्ये इर्शाद मधला. मोठा भाऊ एम.एस्सी. करून गोव्याला नोकरीला आहे, तर लहान भावाने एम.कॉम. केलंय.
 
 
वाचनाचं वेड लागल्यानंतर
इर्शादचं सातवीपर्यंतचं शिक्षण महानगरपालिकेच्या अण्णासाहेब शिंदे शाळेत, तर दहावीपर्यंतचं शिक्षण लक्षतीर्थमधल्याच महात्मा फुले शाळेत झालं. तोपर्यंत वाचनाचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता; 'बटाट्याची चाळ' किंवा 'श्यामची आई' एवढीच काय ती पुस्तकांची नावं त्याला माहीत होती. पण शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजमध्ये अकरावीत (कॉमर्स) गेल्यावर तिथल्या 'टी.एच. अपराध ग्रंथालया'मुळे त्याला खऱ्या अर्थाने पुस्तकांची ओळख झाली. गंगाधर गाडगीळांची 'बंडू' सिरीज, सुहास शिरवळकरांच्या रहस्यमय कादंबऱ्या वाचत त्याला वाचनाचं वेड लागलं.
 
बी.कॉम.च्या पहिल्या वर्षाला असताना त्याला जाणवलं की, आपल्याला इंग्रजी साहित्याचा अभ्यास करायचा आहे. त्यासाठी त्याने चक्क कॉमर्स सोडून आर्ट्सला (बी.ए. इंग्लिश) जाण्याचा निर्णय घेतला. 'कॉमर्सवरून आर्ट्सला जाणं म्हणजे डिमोशन' असा विरोध झाला, एका वर्षाचं नुकसानही झालं, पण 'एमपीएससीचा अभ्यास करायचा आहे' असं कारण प्राचार्यांना देऊन त्याने परवानगी मिळवली. याच काळात महालक्ष्मी मार्केटसमोरील 'चांद बुक स्टॉल' या जुन्या पुस्तकांच्या दुकानात त्याने एक-दोन वर्षं पार्टटाईम काम केलं. तिथे येणाऱ्या प्राध्यापक आणि वेगवेगळ्या वाचकांशी होणाऱ्या चर्चेतून त्याची पुस्तकांची ओढ अधिकच वाढली. कधी कधी कामाचा मोबदला म्हणून पैसे न घेता तेवढ्या पैशात तिथूनच काही पुस्तकं घेण्याचा सिलसिलाही सुरु झाला.
 
 
दोस्तोव्हस्कीने लावली रशियन भाषेची गोडी
बी.ए. करत असताना वर्ल्ड लिटरेचरच्या अभ्यासक्रमात त्याला दोस्तोव्हस्की, गॉर्की, चेखव या रशियन लेखकांचे इंग्रजी अनुवाद वाचायला मिळाले. 'पुअर पीपल', 'व्हाईट नाइट्स', 'क्राईम अँड पनिशमेंट' वाचून तो रशियन साहित्याच्या प्रेमातच पडला आणि दोस्तोव्हस्की त्याचा आवडता लेखक बनला. पुढे शिवाजी विद्यापीठात एम.ए. इंग्लिश करताना त्याला तिथल्या फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटची माहिती मिळाली. आपल्या आवडत्या लेखकाचं साहित्य मूळ भाषेत वाचता यावं, म्हणून त्याने रशियन शिकण्याचा चंग बांधला.
 
सुरुवातीचे चार महिने फक्त ग्रामर आणि पुस्तकांच्या आधारे अभ्यास केल्यामुळे रशियन डोक्यावरून गेलं आणि त्याने ते सोडून दिलं. तेव्हा काही प्रोफेसर्सनी त्याला "सोव्हिएत युनियन कोसळल्यामुळे रशिया मागे पडतोय, त्यापेक्षा जर्मन भाषा शिक," असा सल्ला दिला होता. पण साहित्याच्या ओढीपायी इर्शादने तो सल्ला मानला नाही. पुन्हा नव्या जोमाने त्याने सोशल मीडिया आणि लँग्वेज लर्निंग ॲप्सचा वापर करून रशियन मित्र-मैत्रिणी बनवले. त्यांच्याशी व्हॉट्सॲप, ऑडिओ-व्हिडिओ कॉलवर बोलताना त्याला 'स्पोकन रशियन' अवगत झालं. एम.ए. सोबतच त्याने रशियनचे सर्टिफिकेट, डिप्लोमा आणि हायर डिप्लोमा पूर्ण केले.
 
 
संघर्ष आणि जेएनयूची वाट
२०१५ मध्ये इर्शादच्या आईला ब्रेन स्ट्रोक झाला. आईच्या आजारपणात इर्शादने एम.ए. सेकंड इयरला असताना शिक्षण मधेच सोडलं. पुढे एका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये त्याने दोन वर्षं इंग्रजी शिक्षकाची नोकरी केली, तसेच स्पर्धा परीक्षा आणि स्पोकन इंग्लिशचे खाजगी क्लासही घेतले. नंतर विद्यापीठातील एका मेजर रिसर्च प्रोजेक्टवर 'रिसर्च असिस्टंट' म्हणून काम करताना तो पुन्हा अकॅडमिक्सकडे वळला. मग पुढे त्याने एम.ए. (रशियन) पूर्ण केलं, नेट परीक्षा पास केली आणि रशियन विषयात 'एनएफओबीसी (जेआरएफ)' फेलोशिप मिळवणारा तो विद्यापीठातला पहिला विद्यार्थी ठरला. कोविड काळात ऑनलाईन वेबिनार्स आणि रशियन लँग्वेज ऑलिंपियाडमध्ये भाग घेतल्याने त्याला रशियन भाषेतील अफाट संधींची जाणीव झाली.
 
पीएच.डी.साठी त्याने हैदराबादच्या 'इफ्नू' (EFLU), शांतिनिकेतन आणि जेएनयूची प्रवेश परीक्षा दिली. नंतर जेएनयूमधूनही निवड झाल्याचे समजताच त्याने आपला मोर्चा जेएनयूकडे वळवला. जेएनयूमधील तीन-साडेतीन वर्षांचा काळ त्याच्यासाठी अत्यंत डायनॅमिक आणि वेगळा अनुभव देणारा ठरला. तिथे त्याने एका सेमिस्टरला ग्रामरचा पेपरही शिकवला.
 
'भुरा' पुस्तकाने दिली घर सोडण्याची प्रेरणा
घराची ओढ असणाऱ्या कोल्हापूरकरांसारखीच इर्शादचीही घर सोडण्याची मानसिकता नव्हती. कोविडच्या काळात जवळचे पैसे संपले होते, कुणाकडे मागता येत नव्हते आणि पीएच.डी.साठी बाहेर जाण्याची वेळ आली होती. अशा टप्प्यावर मित्रांच्या मदतीने त्याने शरद बाविस्करांचे 'भुरा' हे पुस्तक विकत घेऊन वाचले. "रावेरसारख्या ठिकाणाहून, कोणतंही सामाजिक-सांस्कृतिक भांडवल नसताना जर एखादा तरुण तिथपर्यंत मजल मारू शकतो, तर शाहू महाराजांचा एवढा मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या कोल्हापूरसारख्या समृद्ध शहरातून येऊन आपण घर सोडायला का घाबरायचं?" या विचाराने त्याला जेएनयूपर्यंत जाण्याची प्रेरणा दिली. पुढे एका इंटरप्रिटेशनच्या कामासाठी तो मलेशियालाही गेला. परदेशवारी करणारा तो घरातला पहिलाच व्यक्ती.
 
 
रशियनमधून अनुवाद ते थेट रशियावारी
चेखवची सोपी रशियन भाषा आणि त्याच्या कथांच्या प्रेमातून इर्शादने 'कवडसे' नावाचा ब्लॉग सुरू केला आणि छोट्या कथांचे रशियनमधून मराठीत भाषांतर सुरू केले. मित्र आणि शिक्षकांकडून ब्लॉगला उत्तम प्रतिसाद मिळाल्यावर त्याने चेखवच्या कथांच्या अनुवादाचे स्वतःचे पुस्तक काढण्याचा विचार केला. जुन्या सोव्हिएत पब्लिकेशनच्या नॉस्टॅल्जियाला जोडत 'रादुगा' (इंद्रधनुष्य) या नावाने त्याचा पहिला कथासंग्रह २०२३ मध्ये डायमंड पब्लिकेशनकडून प्रकाशित झाला. त्यानंतर त्याने मिखाईल बुल्गाकोव्हचे 'कुत्र्याचं काळीज' (हार्ट ऑफ डॉग - जे मराठीत पहिल्यांदाच आले) आणि वॉर्डन प्रकाशनाकडून दोस्तोव्हस्कीचे 'व्हाईट नाइट्स' अनुवादित केलं. ज्या पुस्तकाने रशियनची गोडी लावली, त्याचाच अनुवाद करण्याची संधी त्याला मिळाली. त्याच्या कुत्र्याचं काळीज ह्या अनुवादित पुस्तकाचं आंतरभारती तर्फे दिल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कारासाठी यावर्षी नामांकनही झालं.
 
अलीकडेच रशियातील 'इन्स्टिट्यूट फॉर लिटररी ट्रान्सलेशन्स'कडून नोबेल विजेते लेखक इव्हान बुनिन यांच्या 'गाव' या कादंबरीच्या अनुवादासाठी त्याला ग्रँट मिळाली. या संस्थेच्या निमंत्रणावरून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो रशियात एका कॉन्फरन्ससाठी जाऊन आला. तिथे त्याने "प्रॉब्लेम्स इन ट्रान्सलेटिंग हार्ट ऑफ डॉग इन टू मराठी" (राजकीय व्यंग अनुवादित करताना येणाऱ्या अडचणी) या विषयावर शोधनिबंध सादर केला.
 
सध्या तो पीएच.डी.च्या अंतिम टप्प्यात असून, "कमिंग ऑफ एज नॉव्हेल्स ऑफ कंटेंम्पररी रशियन लिटरेचर" (२१ व्या शतकातील रशियन साहित्यातील कुमारवयीन मानसिक प्रवासाच्या कादंबऱ्या) या विषयावर संशोधन करत आहे. मराठी जाणणारा गाईड न मिळाल्याने त्याने अनुवादावर पीएच.डी. करण्याऐवजी हा विषय निवडला. सोबतच फ्रीलान्स ट्रान्सलेशन आणि इंटरप्रिटेशनची कामे तो करतो.
 
 
पुस्तकांचा लढा आणि भाषेने बदललेले आयुष्य
इर्शादच्या वडिलांना पुस्तके अजिबात आवडत नसत. दोन खोल्यांच्या घरात पुस्तकांनी एक खोली भरत चालल्याने वडील चिडायचे. "ही पुस्तकं कुठंतरी दुसरीकडं घेऊन जा," असं ते म्हणायचे. बी.ए. ला असताना असाच एकदा तिरमिरीत इर्शाद ५-६ पोती पुस्तकम घेऊन घराबाहेर पडला आणि ती पुस्तकम मित्रांच्या, प्राध्यापकांच्या घरी ठेवली. मधली अनेक वर्षं तो अशी कुठं कुठं आपल्या आप्तेष्टांकडं पुस्तकं ठेवत राहिला. अलीकडे लग्नानंतर जेव्हा त्याने मोठं घर घेतलं तेव्हा स्वतः रॅक बनवून ती सगळी पुस्तकं त्याने परत आणली आणि आपली घरची लायब्ररी स्वतःच्या हाताने सजवली. गेल्या वर्षी त्याने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. धार्मिक कर्मकांडांना फाटा देत कुटुंबातील हे पहिलेच रजिस्टर लग्न ठरले.
 
अनेक भाषा बोलणारा इर्शाद
इर्शादच्या घरी दखनी मराठी बोलली जाते. त्याची पत्नी परभणीची आहे. त्यांच्याकडेही दखनीच बोलतात. पण कोल्हापूर आणि परभणीमधल्या दखनीतही कितीतरी फरक आहे. त्यामुळे हे दोघं एकमेकांशी मराठीतच बोलतात असं तो सांगतो. “यामुळे आम्ही आंतरधर्मीय विवाह केलंय की काय असंही अनेकांना वाटतं. पण मराठी ही आमची दोघांचीही मातृभाषा आहे”, असं तो अभिमानाने सांगतो.
 
इतक्या भाषांमध्ये चौफेर भरारी घेणाऱ्या इर्शादचं भाषेबद्दल एक सुंदर निरीक्षण आहे. "भाषा ही फक्त पुस्तकांतून नाही, तर माणसांमधून, त्यांच्या संस्कृती, इतिहास आणि अगदी जेवणातूनही शिकावी लागते. रशियन भाषा शिकताना मला रशियन संस्कृती आणि सोव्हिएतचा इतिहास गवसला. रशियाबद्दलचे लेनिन, स्टॅलिन, लाल चौक किंवा युद्ध आणि पुतीन या रशियाच्या मर्यादित ओळखीबद्दलचे पूर्वग्रह गळून पडले." असं तो सांगतो.
 
रशियन भाषेने इर्शादच्या आयुष्यात पॉझिटिव्ह बदल घडवला. एक लाजरा-बुजरा आणि स्वतःतच राहणारा तरुण रशियन भाषेमुळे चीअरफुल आणि मनमोकळेपणाने लोकांशी संवाद साधू लागला. "माणसाच्या पोटात जायचा मार्ग त्याच्या भाषेतून जातो," असे तो हसत हसत सांगतो. कोल्हापूरच्या लुगडी ओळ गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज रशियन साहित्याच्या दालनात मराठीचा झेंडा अभिमानाने रोवत आहे!
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter