मरियम यांची ‘पाक’वाणी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 13 d ago
मरियम शरीफ
मरियम शरीफ

 

दहशतवादाला पोसणे आणि काश्‍मीरचे तुणतुणे वाजवणे पाकिस्तानने सोडल्याशिवाय भारताबरोबरील संबंधात सुधारणा होण्याची शक्यता नाही, तरीदेखील मरियम शरीफ यांच्या विधानाची नोंद घ्यायला हवी.

पाकिस्तानात गेल्या महिन्यांत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लिग (नवाज) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांचे परराष्ट्रधोरण आणि विशेषतः भारताबाबत भूमिका याबाबत हवी तितकी स्पष्टता येत नव्हती.

पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री, नवाज शरीफ यांच्या कन्या आणि त्यांच्याच पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम शरीफ यांनी पित्याच्याच, ‘शेजाऱ्यांशी झगडू नका, मित्रत्वासाठी दरवाजे खुले करा’ या विधानाचा संदर्भ देत भारताबरोबर संबंध सुधारण्याची तयारी दाखवली आहे, याची नोंद घ्यायला हवी. बैसाखीनिमित्ताने पाकिस्तानातील कर्तापूर साहिब येथे तीन हजारांवर भारतीय शीख भाविकांसमोर भावूक होऊन मरियम बोलत होत्या.

‘अमृतसरजवळील जत्ती उमरा आपल्या पूर्वजांची भूमी. तेथील माती आपण आजोबांच्या कबरीवर अर्पण केली. पंजाब विभागला असला तरी आपण सगळे पंजाबीच आहोत’, अशा शब्दांत मातीचे नाते सांगत मरियम यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधातील तणाव दूर व्हावा, ते शक्य तितक्या लवकर सुधारावेत, अशी व्यक्त केलेली इच्छा स्वागतार्ह आहे.

पण या इच्छेला ठोस प्रयत्नांची जोड त्या आणि त्यांचा पक्ष देणार का, हा प्रश्न आहे. खरे तर भारताने पाकिस्तानशी नेहमीच सौहार्दाचे राहावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तानसह शेजारील देशांच्या प्रमुखांना खास आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी परदेश वारीवरून परतताना अचानकपणे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची आवर्जून भेट घेतली होती. पण त्या देशाची तिरकी चाल फारशी बदलली नाही.

पाकिस्तानकडून दहशतवाद पोसणे सुरूच होते. पठाणकोट हवाई तळावरील हल्ला, नंतर काश्‍मीरातील पुलवामामध्ये भारतीय लष्करावर झालेला निंदनीय हल्ला, बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक अशा घटनांमुळे उभय देशांच्या संबंधातील कटुता अधिकाधिक वाढतच गेली. राजनैतिक संबंधही दुराव्याचेच बनले. हे संबंध दुरावण्यामागे पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या एकीकडे मैत्रीचे हात आणि दुसऱ्या हाताने पाठीत सुरा खुपसणे ही वृत्ती कारणीभूत आहे.

पाकिस्तानचे धोरण दहशतवाद पोसण्याचे, त्याला खतपाणी घालण्याचे आहे. गतवर्षी पाकिस्तानात तीन हजारांवर लोक दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. पाकिस्तानी राज्यकर्ते आणि त्यांचे लष्कर या दोघांनाही दहशतवादाची डोकेदुखी भेडसावत असली तरी ते त्यातून धडा घेत नाहीत. दहशतवादाला जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यांत थारा मिळू नये, यासाठी भारतही सातत्याने रास्त भूमिका मांडत आहे.

राज्यघटनेतील जम्मू-काश्‍मीरबाबतचे कलम ३७० रद्द करणे हा भारताचा सार्वभौम अधिकार आहे. तरीही सातत्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर काश्‍मीरचे तुणतुणे वाजवणाऱ्या पाकिस्तानने त्याचेही भांडवल केले. उभय देशांतील संबंध त्यामुळेच नीचांकी पातळीवर पोहोचले. या पार्श्‍वभूमीवर मरियम शरीफ यांनी प्रकट केलेल्या इच्छेचे स्वागत केले पाहिजे.नवाज शरीफ यांनीही भारताबरोबरील संबंधात सुधारणांची इच्छा प्रकट केली होती.

तेथील निवडणुकीत इम्रान खान यांच्या अपक्ष लढलेल्या उमेदवारांनी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तरीही शरीफ-भुट्टो आघाडीचे सरकार सत्तेवर आले. यामागील लष्कराची कर्त्याधर्त्याची भूमिका लपून राहिलेली नाही. त्यामुळेच मरियम यांच्या विधानाचे स्वागत केले तरीही ओठात एक आणि पोटात दुसरे असे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे धोरण राहिले आहे, हे विसरता येणार नाही.

भारताबरोबरील संबंधांचा देशांतर्गत राजकारणासाठी सोयीनुसार वापर करायचा, हे त्यांचे धोरण. इम्रान खान पंतप्रधान असताना मरियम यांनीच उभय देशांत गुप्तपणे सुरू असलेल्या वाटाघाटींवर आगपाखड केली होती. पाकिस्तानच्या अर्थकारणापासून ते धोरणात्मक बाबींपर्यंत चीनचा प्रचंड प्रभाव आहे. चिनी कर्जाच्या ओझ्यासह अनेक कारणांनी अर्थव्यवस्था जराजर्जर आहे.

पाकिस्तानातील सरकार किती स्थैर्य प्राप्त करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी भारतात लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. जूनमध्ये नवे सरकार सत्तेवर येईल. त्यामुळे त्यानंतरच उभय देशांमधील संबंध सुधारण्यासाठी ठोस कृती आणि धोरणात्मक पावले पडू शकतात. भारताची नेहमीच सकारात्मकतेची भूमिका राहिलेली आहे. भारताने चर्चेची दारे बंद केली नाहीत आणि ठेवताही कामा नयेत.

तथापि,अशा प्रयत्नांना सुरुंग लावण्याचे काम पाकिस्तानी लष्कर आणि संधिसाधू राज्यकर्त्यांनी वेळोवेळी केले आहे. त्यांनी त्यांच्या भूमिकेत आमूलाग्र बदल केल्याशिवाय, दहशतवादाला पोसणे थांबवल्याशिवाय संबंधात सुधारणा होणे कठीण आहे. त्यामुळेच मरियम यांचे ताजे वक्तव्य पाकात घोळलेले वाटत असले तरी त्यांच्या सुविचारांना कृतिशील पाया लाभत नाही, तोवर ते पोकळच म्हणावे लागेल.