मतदानाच्यावेळी लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये नसते डुकराची चरबी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०२४ साठीचे मतदान सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारची माहिती प्रसिद्ध केली जात आहे. एका सोशल मीडिया युजरने एक्स वर नुकताच एक दावा केला आहे. त्यात म्हणाले आहे की, " एका तपासणीतून असे आढळले आहे की, निवडणूक आयोगाकडून निवडणुकांदरम्यान बोटाला लावणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी मिसळलेली असते. मात्र The Healthy Indian Project (THIP) ने केलेल्या तथ्य तपासणीत हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.

नेमका दावा काय?
'बिग ब्रेकिंग' असे सांगत एका एक्स पोस्ट युजरने एक्स वर नुकताच एक दावा केला आहे. त्यात म्हणाले आहे की, " एका तपासणीतून असे आढळले आहे की, निवडणूक आयोगाकडून निवडणुकांदरम्यान बोटाला लावणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी मिसळलेली असते. 'ही माहिती जनहितार्थ जाहीर' करण्यात येत आहे असेही त्या व्यक्तीने लिहिले आहे. २८ एप्रिल रोजी त्या व्यक्तीने अश्या प्रकारचा दावा केला आहे.

तथ्य तपासणीत काय आढळले?
सर्वात आधी हे पाहूया की निवडणुकीत शाई का वापरली जाते?
भारतातही निवडणुकांदरम्यन मतदान केलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या एका बोटावर ही शाई लावण्यात येते. ही शाई पुसली जात नाही. किंवा कोणत्या रिमूव्हरने काढता येत नाही. मतदाराचा अधिकार अबाधित राहावा तसेच या दरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्याच्या हेतूने बोटाला ही शाई लावण्यात येते. गेल्या अनेक दशकांपासून भारतीय निडणुकांमध्ये अशा प्रकारे बोटावर शाई लावली जाते.

१९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यात (RoPA) शाईचा उल्लेख आहे. कलम ६१ नुसार "मतदान केंद्रावर मतदान करण्याच्या उद्देशाने मतपत्रिका किंवा बॅलेट पेपरसाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या अंगठ्याला किंवा इतर कोणत्याही बोटावर न पुसल्या जाणाऱ्या शाईने चिन्हांकित करावे " या कायद्यानुसार नियम केला गेला आहे.

निवडणुकीच्या शाईचा इतिहास काय आहे?
'म्हैसूर पेंट्स अँड वार्निश लिमिटेड' या देशातील एकमेव कंपनीने ही शाई तयार केली आहे. लोकशाहीचे प्रतीक असलेल्या या शाईचा इतिहास अनेक दशके जुना असून म्हैसूर राजघराण्याशी जोडलेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, वाडियार घराण्याने म्हैसूर, कर्नाटकावर राज्य केले. वाडियार घराण्याच्या कृष्णराजाने १९३७ मध्ये 'म्हैसूर लाख आणि पेंट्स' नावाने पेंट आणि वार्निश कारखाना उघडला. स्वातंत्र्यानंतर काही काळानंतर हा कारखाना कर्नाटक सरकारने ताब्यात घेतला आणि येथे निवडणुकीच्या शाईचे उत्पादन सुरू झाले. १९८९ मध्ये या कारखान्याचे नाव म्हैसूर पेंट आणि वार्निश लिमिटेड (MPVL) होते. MPVL मार्फत ही शाई फक्त निवडणूक आयोग किंवा निवडणुकीशी संबंधित एजन्सींना पुरवली जाते. ही कंपनी इतर अनेक प्रकारचे पेंट्स बनवते, पण कंपनीची मुख्य ओळख निवडणुकीसाठी ही न पुसली जाणारी शाई बनविण्याची आहे. सार्वत्रिक निवडणुकीत या निळ्या शाईचा समावेश करण्याचे श्रेय देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांना जाते.

निवडणुकीच्या शाईमध्ये कोणते रसायन वापरले जाते?
या न पुसल्या जाणाऱ्या शाईचा शोध राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेत १०५२ मध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) शास्त्रज्ञांनी लावला होता. ही शाई बनवण्यासाठी सिल्व्हर नायट्रेट AgNO3 नावाचे रसायन निवडणुकीच्या वेळी वापरले जाते. हे एक रंग नसणारे संयुग आहे, जे सूर्यप्रकाश आणि किरणांच्या संपर्कात आल्यावरच दिसते.

'युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम' च्या अहवालानुसार, सिल्व्हर नायट्रेटचे प्रमाण जितके जास्त तितकी शाईची गुणवत्ता जास्त असते. शाई लावल्यानंतर त्यावर ७२ तास साबण आणि डिटर्जंटचा यावर परिणाम होत नाही.

सरकारच्या 'माय गव्हर्नमेंट' या वेबसाइटनुसार, “या पाण्यावर आधारित शाईमध्ये अल्कोहोलसारखे सॉल्व्हेंट देखील असते, ज्यामुळे शाई लवकर सुकते. पण ही शाई बनविण्याची प्रक्रिया, त्यातील रासायनिक रचना आणि प्रत्येक घटकाचे प्रमाण हे अनेकांना माहिती नाहीये."

CSIR चा हा प्रयोग इतका यशस्वी झाला आहे की, ही न पुसली जाणारी शाई कॅनडा, घाना, नायजेरिया, मंगोलिया, मलेशिया, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि मालदीवसह २५ पेक्षा अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. पण विविध देश शाई लावण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असल्याने कंपनी ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार शाई तयार करते.

निवडणुकीच्या शाईमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो का?
एका संशोधनात असे दिसून आले आहे की, एका ३० वर्षीय पुरुषाला दोन्ही हाताच्या बोटांवर वेदना, सूज, जळजळ आणि काळे डाग पडणे असा त्रास झाला होता आणि त्याने तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधला होता. या व्यक्तीने निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून काम केले होते. मतदारांच्या बोटांवर ही शाई लावणे हे त्याचे काम होते.

जेव्हा त्यांनी मतदारांच्या बोटांवर शाई लावली तेव्हा त्यांच्या बोटांनाही शाई लागली कारण त्या ब्रशची लांबी कमी होती. मतदान संपले तेव्हा त्याच्या जावपास सर्वच बोटांना शाई लागली होती. संध्याकाळपर्यंत रुग्णाला बोटांवर जळजळ जाणवू लागली. दुसऱ्या दिवशी त्याची सर्व बोटे सुजलेली आणि लाल झाली होती तसेच एक छोटासा फोड येऊन वेदना देखील होत होत्या.

१० ते १८ टक्के सिल्व्हर नायट्रेट हे त्वचेसाठी सुरक्षित मानले जाते. जर शाई जुनी असेल तर अल्कोहोल उडून जाऊन ते आणि त्यामुळे त्वचेवर जळजळ होते. सिल्व्हर नायट्रेट असलेली शाई बोटांवर वारंवार लावल्याने चांगलीच जळजळ होऊ शकते. त्वचेशी रसायनाचा वारंवार संबंध आल्याने एक्सोथर्मिक ही रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते, ज्यामुळे फोड येऊ शकतात.

निवडणुकांच्या आधी प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान निवडणूक शाईची कोणतीही प्रतिक्रिया किंवा जळजळ झाल्याची नोंद नसल्याने रुग्णाने कोणतीही खबरदारी घेतली नव्हती. पण या प्रकरणावरून हे दिसून आले की, शाईच्या वापराने जळजळ होऊ शकते. त्यामुळेच बोटांवर डाग पडू नयेत म्हणून शाई लावण्याचा ब्रश किंवा काडी ही लांब असलायला हवी तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी सवयीचा भाग म्हणू सर्वानीच हातमोजे वापरणे आवश्यक आहे.

निवडणुकीच्या शाईत डुकराची चरबी मिसळली आहे का?
याचे उत्तर 'नाही' असेच आहे. ही शाई सिल्व्हर नायट्रेट नावाच्या रसायनापासून बनविली जाते. २०१९ मध्ये देखील ओम चौहान नावाच्या प्रोफाइलवरून असेच खोटे दावे करण्यात आले होते. तथापि, असे दावे अनेकदा फेटाळले गेले आहेत.

निष्कर्ष
या तपासणीनंतर असे म्हणता येईल की, निवडणुकीच्या शाईमध्ये डुकराची चरबी सापडल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. असे निदर्शनास आले आहे की असे दावे निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकदा मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी केले जातात ज्यामुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. केवळ निवडणुकाच नाहीत, या आधी सडलेले पीठ आणि डुकराचे मांस असलेल्या नूडल्ससारखे तथ्य तपासलेले दावेही आम्ही तपासले असल्याचे 'द हेल्दी इंडियन प्रोजेक्ट' ने सांगितले.