पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमाता अहिल्यादेवी  होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त भोपाळातील ‘महिला सशक्तीकरण महासम्मेलन’ मध्ये ३०० रुपये किमतीचे स्मृती नाणे आणि टपाल तिकिट प्रकाशित केले. जंबूरी मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी इंदूर मेट्रोच्या सुपर प्रायोरिटी कॉरिडॉरचे, तसेच दतिया आणि सतना येथील नवनिर्मित विमानतळांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. याशिवाय, त्यांनी मध्य प्रदेशातील विविध विकास प्रकल्पांचा पायाभरणी समारंभही केला.
	
	
	सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “हे सर्व प्रकल्प मध्य प्रदेशातील सुविधा वाढवतील, विकासाला गती देतील आणि अनेक नवीन रोजगार संधी निर्माण करतील.” अहिल्यादेवी  होळकरांचा गौरव करताना ते म्हणाले, “त्यांचे नाव ऐकताच श्रद्धेची भावना जागृत होते. लोकांची इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अप्रतिम कार्य करता येते, यांचे त्या प्रतीक आहेत." त्यांनी सांगितले की, गुलामगिरीच्या काळात अहिल्यादेवी ंनी अनेक मंदिरे आणि तीर्थक्षेत्रांचे पुनरुज्जन केले, ज्यात काशी विश्वनाथ मंदिराचा समावेश आहे. “काशीमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली, हा माझा सौभाग्य आहे,” असे मोदी म्हणाले.
	
	
	पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना अहिल्यादेवींनी २५०-३०० वर्षांपूर्वी दिलेल्या सल्ल्याचे पालन करत फळबागायती आणि मसाला पिकांकडे वळण्याचे आवाहन केले. “शेतकऱ्यांनी केवळ भात किंवा उसावर अवलंबून न राहता पिकांचे वैविध्य स्वीकारावे,” असे ते म्हणाले. इंदूर मेट्रोच्या ६ किमी लांबीच्या सुपर प्रायोरिटी कॉरिडॉरमध्ये ५ स्थानके असून, देशातील सर्वात स्वच्छ शहराला प्रदूषणमुक्त आणि जलद वाहतूक सुविधा मिळेल. दतिया विमानतळ ६० कोटी रुपये आणि सतना विमानतळ ३७ कोटी रुपये खर्चून विकसित झाले आहेत, जे विंध्य प्रदेशातील पर्यटन आणि उद्योगांना चालना देतील. 
	
	
	लोकमाता अहिल्यादेवींनी महिला शिक्षण, सामाजिक आणि धार्मिक सहभागाला प्रोत्साहन दिले. त्यांनी माहेश्वरी साड्यांच्या विणकरांना पाठबळ दिले आणि पाणवठे, रस्ते, धर्मशाळा, मंदिरांचे पुनरुज्जन यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या. या कार्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशावर अमिट छाप सोडली आहे. 
	
	
		'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -
	
		Awaz Marathi WhatsApp Group 
		Awaz Marathi Facebook Page
	
		Awaz Marathi Twitter