पूजा नायक
तब्बल पाच पिढ्यापासून चालत आलेला देश सेवेचा वारसा असाच टिकून ठेवण्याचा वसा ही शेख कुटुंबांनी घेतला.
समाजामध्ये मुस्लिम, आणि देशसेवा हे समीकरण समाजाला आश्चर्य व्यक्त कराव एवढ अवास्तव होऊन बसले आहे. परंतु हा मोठा आश्चर्याचा काम पुण्यातील एका शेख कुटुंबाने केल आहे. न्याय समाज निर्माण करणे हे महमंद पैगंबरांच्या जीवित कार्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट होते. याच त्यांच्या उद्देशांवर फुल ना फुलाची पाकळी म्हणून काम करता यावं या दृष्टीने पुण्यातील एका मुस्लिम कुटुंबातील तब्बल पाच पिढ्या पोलीस क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची पोलीस खात्यातील कारकीर्द पाहून जणू त्यांनी देश सेवेचा वसाच घेतला आहे याची प्रचीती आल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे या कुटुंबाचा इतिहास?
सध्या पुण्यातील शुक्रवार पेठेत पोलीस लाईन मध्ये राहणारे हे शेख कुटुंब. तसं पाहायला गेल तर गेल्या ४०० वर्षांपासून पुणे येथे राहणाऱ्या या कुटंबाची ही १४ वी पिढी शासकीय सेवेत आहे आणि पाचवी पिढी पोलीस खात्यात आहे. याची सुरुवात होते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुफी संत हजरत चिमण शहा पीर कादरी यांच्या पासून. हजरत चिमणशहा पुण्याच्या पर्वती गावठाणात राहणारे सुफी संत होते. त्यांचे पुत्र काझी हैदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात वकील होते. तेथे ते फारसी आणि उर्दू कागदपत्रांच मराठीत भाषांतर करायचे. पिढी बदलत गेली परंतु वेगवेगळ्या कारकिर्दीत प्रत्येक पिढीतील लोकांनी देश सेवेचा वसा सोडला नाही.
पोलीस खात्यातील ५ पिढ्यांचा इतिहास कसा घडला?
पहिली पिढी या क्षेत्रात आली ती ब्रिटीश काळात म्हणजेच १८६२ साली. १८६२ साली काझी निजाम शेख पोलीस दलात दाखल झाले. पुणे पोलिसांच्या तोफखाना आणि घोडदळ विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. हे सर्व करत असताना तब्बल २३ वर्षांनी त्यांना १८८५ साली शनिवारवाड्यातल्या एका समारंभात त्यांना सुभेदार म्हणून बढोन्नती मिळाली. विशेष म्हणजे काझी निझाम हे ब्रिटीश राजवटीचे पुण्यातील पहिले सुभेदार होते. यांच्या नंतर काझी निझाम शेख यांचे सुपुत्र करीम पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांना तर त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इग्लंडचे राजे जॉर्ज सहा आणि राणी एलीझाबेथ यांच्या कडून पदकेही मिळाली.
तद्नंतर करीम यांची सात मुले पोलीसदलात आले. त्यांचा कार्यकाल पाहता ते निम्मा काळ ब्रिटीश राजवटीत आणि निम्मा काळ स्वतंत्र भारतात आपली देश सेवा देत राहिले. या सात पैकी इब्राहीम शेख हे मुख्य कवायत निरीक्षक होते, शिवाय पोलीस हॉकी संघाचे कर्णधार होते. त्यांचे दुसरे बंधू मोहम्मद शेख पुण्यामध्ये पोलीस निरीक्षक होते तसेच पुण्याच्या गुप्तचर विभागात मुस्लिम शाखेचे ही प्रमुख होते. इब्राहिम आणि मोहम्मद यांच्याव्यतिरिक्त तिसऱ्या पिढीतील बाकी मुलांनीही ३० ते ३५ वर्षं पोलीस सेवेत योगदान दिलं. पुणे शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांत त्यांनी काम केलं.
तिसऱ्या पिढीतील मोहम्मद शेख यांच्या नऊ मुलांपैकी सात मुलांनी पोलीस दलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. यामध्ये युसूफ शेख हे पोलीस मुख्यालयात कंपनी कमांडर होते. रझ्झाक शेख हे या कुटुंबातील उच्चपदस्थ पोलीस अधिकारी होय. त्यांनी पुणे, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये काम केलेले ते कुटुंबातील पहिलेच अधिकारी आहेत. मुंबई पोलिसांना मदत करणाऱ्या श्वानपथकातील जंजिर या कुत्र्याला प्रशिक्षित करण्याचं काम रझ्झाक यांनी केलं. मुंबई गुन्हे शाखेच्या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. शमशुद्दीन हे रझ्झाक यांचे लहान भाऊ. त्यांनीही पुणे पोलीस आयुक्तालयात उपनिरीक्षक म्हणून काम केले आहे. वरील तीन भावंडाव्यतिरिक्त चौथ्या पिढीतील उर्वरित सहा भावंडे यांनीही पोलीस सेवेत आपलं योगदान दिले आणि यापैकी काहीजण अजून सेवेत आहेत.
सध्या शेख कुटुंबाची पाचवी पिढी पोलीस दलात काम करतेय. यामध्ये युसूफ शेख यांचा मुलगा शाहिद शेख, अजीज शेख यांचा मुलगा सलमान, फिरोज शेख यांचा मुलगा शाहरुख आणि शमशुद्दीन शेख यांचा मुलगा सोहेल यांचा समावेश होतो.
सोहेल यांच्याशी बोलताना, त्यांनी त्यांच्या १४ वर्षे पूर्ण झालेल्या प्रवासाची सुरुवात २००९ पासून पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथून सुरु झाल्याचे सांगितले. सोहेल शेख यांना उर्दू आणि अरबी भाषेचं ज्ञान आहे. वाचन आणि लिखाणाची आवड असलेले सोहेल हे त्यांचा वंश परंपरागत कादरी शुत्तारी सुफी पंथही चालवतात. याशिवाय जंगली महाराज यांची एक गादी त्यांच्या घरातून चालवली जाते. स्वतःच्या दोन मुलींनी ही पोलीस खात्यात अधिकारी व्हाव अस त्यांच स्वप्न आहे. विशेष म्हणजे त्यांना या मुलीना पोलीस अधिकारी बनवून पूर्वी पासून चालत आलेला वसा तर चालू ठेवायचाय शिवाय रूढीवादाला छेद द्यायचा हा त्यांचा मानस आहे. शेख सोहेल शमसुद्दीन आणि त्यांच्या पिढ्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणारा आहे.
पोलीस खात्यात येण्याची प्रेरणा काय आहे?
सोहेल यांना पोलीस खात्यात येण्यामागची प्रेरणा विचारली असता त्यांनी अत्यंत नम्र भाषेत खाकी वर्दीविषयी त्यांना असणारे आकर्षण आणि देशसेवा हे या सेवेत येण्याचं एक कारण आहे असे सांगितले. पोलीस क्षेत्रात कार्यरत राहण्याची प्रेरणा सुफी परंपरेच्या शिकवणूतुन आलेली असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. कारण वर्षानुवर्षे चालत आलेलं सुफी परंपरा शिकवणुकीचं कामही शेख कुटुंब करत आलेले आहे. धर्माचा योग्य अभ्यास आणि त्यातील संशोधन करून मानवतेचा संदेश देण्याचं काम ते या पोलीस खात्यातून चोखपणे करत आहे. याच उदाहरण द्यायचं झाल्यास कोविड काळात त्यांनी ८५० लोकांना जेवण पोहचवण्याच काम केले.
मुस्लिम शिक्षण आणि समाजासाठी संदेश?
सोहेल हे मुस्लिम शिक्षण आणि शासकीय नोकऱ्या यांवर बोलत असताना त्यांनी मुस्लिम लोकांची मानसिकता यावर भाष्य केले. ते म्हणतात कि, मुस्लिम लोकांमध्ये आधीच वेगवेगळ्या कारणास्तव शिक्षण घेण्याचे प्रमाण कमी आहे. त्यात भर पडते ते त्यांच्या मानसिकतेची. ‘मुस्लिम लोकांना नोकरीच आकर्षण कमी आहे, कारण सरकारी नोकरी म्हणजे त्यांना एक प्रकारची गुलामी वाटते'. सुफी परंपरा आणि शिकवणीवर बोलताना त्यांनी मानवतेचा संदेश दिला. शिवाय हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील आपुलकीची, प्रेमाची भावना ठेऊन एकोप्याने राहावे अशी इच्छा व्यक्त केली.
यातून एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, एकीकडे धर्मपरंपरा किंवा त्या विरोधात संघर्ष तर दुसरीकडे राष्ट्रीय प्रवाहाशी समरस होण्यास अडथळा निर्माण करणारे पृथकतेच राजकारण अशा शृंगापत्तीत भारतीय मुस्लिम समाज अडकून पडलेला असताना, शेख कुटुंब यांनी एक देश सेवेचा मोठा इतिहास रचला आहे.
देशभरात चालणाऱ्या हिंदू मुस्लिम ऐक्य आणि देशभक्तीच्या चर्चवर शेख कुटुंब एक प्रेरणादायी इतिहास आणि वर्तमान उभा करत आहे.