रस्ते मंत्रालयाचा मोठा निर्णय; २०३० पासून प्रत्येक नवीन कारमध्ये इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम बंधनकारक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
एआय निर्मित इमेज
एआय निर्मित इमेज

 

नवी दिल्ली 

रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रस्ते मंत्रालयाने देशात विक्री होणाऱ्या सर्व नवीन कार मॉडेलमध्ये ऑक्टोबर २०३० पासून 'अॅडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम' (AEBS) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव जाहीर केला आहे.

कधीपासून लागू होणार नियम?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) १९ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या प्रारूप अधिसूचनेनुसार, ऑक्टोबर २०३० नंतर उत्पादित होणाऱ्या नवीन कार मॉडेलसाठी AEBS बसवणे बंधनकारक असेल. तसेच, २०३० पूर्वीपासून उत्पादनात असलेल्या इतर सर्व मॉडेल्ससाठी हा नियम ऑक्टोबर २०३२ पासून लागू केला जाईल.

इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम कशी काम करते?

ड्रायव्हरने आणीबाणीच्या प्रसंगी वेळेत ब्रेक न दाबल्यास AEBS सिस्टीम स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) ब्रेक लावून अपघात टाळण्यास किंवा गाड्यांची धडक होण्यापासून रोखण्यास मदत करते. AIS-185 मानकांचे पालन करणाऱ्या या सिस्टीममुळे महामार्गांवरील अपघात मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ट्रक आणि जड वाहनांसाठी नवे मानक

केवळ कारच नव्हे, तर मध्यम आणि जड वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठीही सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. ट्रकची ब्रेक कामगिरी सुधारण्यासाठी १ ऑक्टोबर २०२७ पासून सुधारित ब्रेक मानक लागू करण्यात येणार आहेत. तसेच, वळणावर ब्रेक लावताना स्थिरता मिळावी यासाठी ट्रकसाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सिस्टीम (AIS 162) देखील अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रारूप नियमांवर जनतेकडून आक्षेप मागवण्यात आले असून, राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांनी यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.