भक्ती चाळक
वाढदिवस म्हटला की मित्र-मंडळींसोबत मौजमजा असेच समीकरण ठरलेले असते. परंतु साताऱ्यातील समाजसेवक आसिफ खान यांनी खास दिनी एका लेकराला जीवनदान देण्याला प्राधान्य दिलेय. त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा सर्व खर्च बाजूला सारून तो निधी थेट चार वर्षांच्या पारसच्या उपचारासाठी सुपूर्द केलाय.
पारसचा एसएमए आजाराशी संघर्ष
सातारा जिल्ह्यातील हा तीन वर्षांचा चिमुरडा म्हणजेच पारस बागल. त्याचे वडील शासकीय कार्यालयात स्टेनोग्राफर आहेत. बागल कुटुंब हे सर्वसामान्य. या कुटुंबातील चिमुरडा सध्या एका मोठ्या संकटाशी झुंजत आहे. पारसला ‘एसएमए टाईप टू’ (SMA Type 2) नावाचा अतिशय दुर्मिळ आणि गंभीर आजार जडला आहे.
पारस जेव्हा दोन वर्षांचा झाला, तेव्हा त्याच्या हालचालींमध्ये बदल जाणवू लागला. तो नीट उठून बसू शकत नव्हता, कायम थकवा जाणवणे आणि शरीरातली ताकद कमी होत चालल्याचे त्याच्या आई-वडिलांच्या लक्षात आले. पुणे आणि इतर ठिकाणच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला हा दुर्धर आजार असल्याचे निदान झाले.
या आजारावर मात करण्यासाठी त्याला परदेशातून जीन थेरपीचे एक इंजेक्शन आणावे लागणार आहे, ज्याची किंमत तब्बल सव्वा ते दीड कोटी रुपयांच्या घरात आहे. एका सामान्य कुटुंबाला हा खर्च उचलणे अशक्यप्राय आहे. पण, म्हणतात ना, माणुसकी जिवंत असेल तर अशक्यही शक्य होते.
संपूर्ण महाराष्ट्रभरातील नागरिक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरच्या मदतीने आतापर्यंत ७२ लाख रुपये जमा झाले आहेत, आणि पारसला वाचवण्यासाठी अजून काही निधीची गरज आहे.
आसिफ खान यांची भावनिक साद
पारसच्या या कठीण प्रवासात खिदमत-ए-खल्क संस्थेचे उपाध्यक्ष आसिफ खान यांनी घेतलेला निर्णय खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरला आहे. स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी स्वतः पारसला मदत करून समाजाला भावनिक साद घातली आहे.
आपल्या या निर्णयाबद्दल बोलताना आसिफ खान म्हणाले, “आपण दरवर्षीच वाढदिवस साजरा करत असतो, पण यावर्षी मी ठरवले की स्वतःचा वाढदिवस साजरा न करता तो खर्च पारससाठी द्यायचा. आपल्याला प्रत्येक धर्माने दान आणि पुण्यकर्म शिकवले आहे. जकात काढून आपला उत्पन्नाचा एक भाग गरजूंच्या मदतीसाठी सत्कारणी लावलाच पाहिजे, तरच आपले आयुष्य सार्थक होते.”
हताश आईची विनवणी
पारसच्या आईची घालमेल शब्दांत मांडता येणार नाही. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी ती आज घराघरांचे उंबरठे झिजवत आहे.
पारसच्या प्रकृतीबद्दल सांगताना त्याची आई सायली बागल भरल्या डोळ्यांनी म्हणतात, “माझ्या तीन वर्षांच्या बाळाला वाचवण्यासाठी आता सव्वा कोटींचे इंजेक्शन हवे आहे. एक सामान्य कुटुंब म्हणून आम्ही हा खर्च उचलू शकत नाही. आसिफ भाईंनी त्यांच्या वाढदिवसाला आम्हाला जी मदत केली, ती आमच्यासाठी देवाच्या रूपाने आली आहे.”
भावनिक साद घालत त्या पुढे म्हणतात, “आमच्या पारसला या संकटातून बाहेर काढण्यासाठी साधी छोटीशी मदत करा. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. तुमच्या छोट्याशा मदतीने माझ्या बाळाला नवीन आयुष्य मिळेल.”
‘खिदमत-ए-खल्क’चा ६ वर्षांचा अखंड सेवाकाल
केवळ पारसचीच मदत नव्हे, तर खिदमत-ए-खल्क ही संस्था गेल्या सहा वर्षांपासून साताऱ्यात निस्वार्थपणे समाजाची सेवा करत आहे. कोरोनाच्या काळापासून या संस्थेच्या कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
संस्थेचे अध्यक्ष सादिक शेख आणि उपाध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली या टीमने कोविड काळात बेसहारा रुग्णांना औषधोपचार मिळवून दिलेत. तसेच अनाथ रुग्णांचे त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी देखील पार पाडली.
संस्थेच्या कार्याविषयी आसिफ खान सांगतात, “कोरोनाच्या काळात रुग्णांना बेड आणि रेमडेसिव्हिर मिळत नव्हते. अशा वेळी आम्ही रात्रंदिवस एक केला. आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने साताऱ्यात ऑक्सिजन बँक उभी केली, जी आजही गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.”
पुढे जाऊन ही संस्था अधिकृतपणे नोंदणीकृत करण्यात आली. आज या संस्थेच्या माध्यमातून साताऱ्यातील वेगवेगळ्या लॅबसोबत टायअप करून अल्पदरात वैद्यकीय चाचण्या करून दिल्या जातात. तसेच रस्त्यावर आढळणाऱ्या मतिमंद किंवा बेघर व्यक्तींना यशोधन संस्थांसारख्या पुनर्वसन केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे काम खिदमत-ए-खल्कचे स्वयंसेवक अगदी तन्मयतेने करत आहेत.
शिवीमुक्त महाराष्ट्र अभियानाचा वसा
वैद्यकीय मदतीसोबतच सामाजिक स्वास्थ्यासाठी आसिफ खान यांनी १ जानेवारी २०२४ पासून ‘शिवीमुक्त महाराष्ट्र अभियान’ सुरू केले आहे. शाळा-कॉलेजमध्ये जाऊन ते तरुणांना माता-भगिनींचा सन्मान राखण्याचे आणि भाषेचा सुसंस्कृत वापर करण्याचे धडे देत आहेत.
या अभियानाबद्दल बोलताना आसिफ खान म्हणतात, “आपण बोलताना नकळत कितीतरी शिव्या देतो, ज्याचा संबंध आपल्या आई-बहिणीशी नसतानाही आपण त्यांचा अनादर करत असतो. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिवसंस्कार दिले आहेत. त्यामुळे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे. एमआयडीसीचे कामगार असोत किंवा गावोगावचे तरुण, आम्ही सगळ्यांना एकत्र करून एक संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम करत आहोत.”
एका बाजूला सामाजिक प्रबोधनाचे कठीण व्रत आणि दुसऱ्या बाजूला संकटात सापडलेल्या चिमुरड्याच्या मदतीसाठी धावून जाणारी ही माणसे खऱ्या अर्थाने समाजाची खरी ताकद आहेत. पारस लवकर बरा व्हावा आणि हसत-खेळत पुन्हा उभा राहावा, यासाठी सातारकर नक्कीच आपली शिदोरी या कार्यात ओततील, यात शंका नाही.