भारतीय कुस्तीपटूंची निराशाजनक कामगिरी

Story by  Awaz Marathi | Published by  [email protected] • 11 d ago
 विनेश फोगट
विनेश फोगट

 

भारताच्या कुस्तीगिरांनी ग्रीको रोमन प्रकारात निराशाजनक कामगिरी केली. येथे सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरीत भारताच्या एकाही कुस्तीपटूला पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवता आली नाही.

ग्रीको रोमन प्रकारात सुनीलवगळता एकाही भारतीय कुस्तीपटूला पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडता आला नाही. सुनीलने ८७ किलो वजनी गटात जपानच्या सोह साकावे याच्यावर ५-१ असा विजय मिळवला; पण उपांत्यपूर्व फेरीत त्याला उझबेकिस्तानच्या जालगासबे बर्डिमुरातोव याच्याकडून ४-२ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पात्रता मिळवण्याच्या त्याच्या आशांना सुरुंग लागला.

उझबेकिस्तानच्या अबरोर अताबायेव याच्याकडून आशू याला ६७ किलो वजनी गटात पराभव पत्करावा लागला. तसेच सुमीत (६० किलो वजनी गट), विकास (७७ किलो वजनी गट), नीतेश (९७ किलो वजनी गट) व नवीन (१३० किलो वजनी गट) या भारतीय कुस्तीपटूंना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. याआधी २०१६मधील ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ग्रीको रोमन प्रकारात पात्रता मिळवली होती. रवींदर खत्री व हरदीप सिंग यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

आशियाई पात्रता फेरीतील सुमार कामगिरीमुळे भारतीय कुस्ती संघटनेकडून जागतिक ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. तुर्की येथे नऊ मेपासून पॅरिस ऑलिंपिकसाठीच्या अखेरच्या पात्रता फेरीला सुरुवात होणार आहे. त्याआधी एप्रिलअखेरच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवड चाचणीचे आयोजन करण्यात येण्याची शक्यता आहे. महिला विभागात ६२ व ६८ किलो वजनी गटांत निवड चाचणी होणार असून फ्रीस्टाईल व ग्रीको रोमन या दोन प्रकारांत प्रत्येकी सहा गटांत निवड चाचणी घेण्यात येणार आहे.

याबाबत भारतीय महिला कुस्तीपटू, विनेश फोगाट यांनी सांगितले कि, "ऑलिंपिक मध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्या आकार करावी लागली. आता पॅरिस ऑलिंपिक सुरू होईपर्यंत मला वजनावर नियंत्रण राखायचे आहे. मी ५० किंवा ५३ कोणत्या वजनी गटात सहभागी होईन हे आगामी निवड चाचणीमध्ये ठरेल. मात्र मी ५० किलो वजनी गटात देशाला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला, याचा अभिमान आहे.