भारतीय तिरंदाजांनी 'असा' रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 16 d ago
भारताच्या तिरंदाज
भारताच्या तिरंदाज

 

भारताच्या तिरंदाजांनी शांघाय येथे पार पडलेल्या विश्‍वकरंडकात इतिहास रचला. धीरज बोम्मादेवरा, तरुणदीप राय व प्रवीण जाधव या भारतीयांनी ऑलिंपिक विजेत्या दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना पराभूत करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताने रिकर्व्ह प्रकारात १४ वर्षांनंतर सुवर्णपदकावर मोहर उमटवली हे विशेष.

भारतीय तिरंदाजांनी तिरंदाजी विश्‍वकरंडकातही देदीप्यमान यश संपादन केले. पाच सुवर्ण, दोन रौप्य व एक ब्राँझ अशा एकूण आठ पदकांची माळ आपल्या गळ्यात घालताना भारतीय खेळाडूंनी बाजी मारली.

अखेरच्या दिवशी पुरुषांनी रिकर्व्ह प्रकारातील सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकतानाच दीपिकाकुमारी हिने रिकर्व्ह प्रकारातील महिलांच्या वैयक्तिक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. अंकिता भकत व धीरज बोम्मादेवरा या जोडीने रिकर्व्ह प्रकारातील मिश्र विभागात ब्राँझपदकावर नाव कोरले.

अंतिम फेरीत ५-१ने यश
पुरुषांच्या सांघिक विभागात भारतीयांसमोर दक्षिण कोरियाचे बलाढ्य आव्हान होते. पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांना ५७-५७ अशा बरोबरीवर समाधान मानावे लागल्यामुळे १-१ असा गुण मिळाला. पुढल्या सेटमध्ये ५७-५५ असे यश मिळवण्यात भारतीय तिरंदाजांना यश मिळाले. अखेरच्या सेटमध्ये प्रवीण, तरुणदीप व धीरज यांनी ५५-५३ अशा फरकाने वर्चस्व राखले व सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

सुवर्णपदकापासून दूर
दीपिकाकुमारी ही भारताची अनुभवी नेमबाज होय. तिच्याकडे सुवर्णपदक जिंकण्याची सुवर्णसंधी होती. दीपिकाकुमारीने उपांत्य फेरीच्या लढतीत नाम सुहयिओन हिच्यावर ६-० असा विजय संपादन केला.

अंतिम फेरीत मात्र तिला पराभवाला सामोरे जावे लागले. लिम सिहयिओन हिने तिच्यावर ६-० अशी मात केली. लिम हिने पहिला सेट २७-२६ असा, दुसरा सेट २९-२७ असा आणि तिसरा सेट २८-२७ असा जिंकला व पहिले स्थान मिळवले. दीपिकाकुमारीने रौप्यपदक जिंकले. लि जियामन हिने ब्राँझपदक पटकावले.

अंकिता - धीरजचा तिसरा क्रमांक
मिश्र प्रकारात अंकिता भकत - धीरज बोम्मादेवरा या जोडीने ब्राँझपदक पटकावले. भारताच्या या जोडीने मतियास ग्रँड - ॲलेक्झँड्रा वॅलेंसिया या जोडीवर ६-० असा विजय मिळवला. भारतीय जोडीने पहिला सेट ३५-३१ असा जिंकला. दुसरा सेट ३८-३५ असा जिंकण्यात यश मिळवले. तसेच शेवटच्या सेटमध्ये ३९-३७ असे वर्चस्व राखले. तीन सेटचे मिळून सहा गुण त्यांना मिळाले. यामुळेच तिसरा क्रमांक पटकावता आला.