कोलकाता
भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने आपल्या फिटनेस आणि राष्ट्रीय संघात पुनरागमाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात स्थान मिळाले नसले, तरी आपला फिटनेस अजूनही सर्वोच्च स्तरावर असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
बंगालकडून रणजी करंडक सामना खेळल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ३६ वर्षीय शमीने स्पष्ट केले की, तो अजूनही पूर्णपणे फिट आहे. तो म्हणाला, "सर, आज भी हम peak पर ही hain. माझ्या फिटनेसबाबत खोटे बोलण्यात काहीच अर्थ नाही." देशांतर्गत क्रिकेट खेळणे आणि स्वतःला सर्व आगामी मालिकेसाठी तयार ठेवणे हाच आपला मुख्य उद्देश असल्याचे त्याने सांगितले. संघात निवड न होण्याबाबत बोलताना तो म्हणाला की, खेळाडू म्हणून आपण केवळ आपल्या हातात असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो.
शमीने त्याचा समकालीन खेळाडू भुवनेश्वर कुमार याच्या जवळपास चार वर्षांनंतरच्या भारतीय संघात झालेल्या पुनरागमनाचे स्वागत केले. भुवनेश्वरच्या सध्याच्या कामगिरीचा विचार करता त्याचे पुनरागमन आणखी आधी व्हायला हवे होते, असे मत शमीने व्यक्त केले. तसेच, राष्ट्रीय निवडकर्त्यांशी संवाद साधण्याबाबत विचारले असता, तो म्हणाला की, "मी सध्या भारतीय संघात नाही, मग माझ्याशी कोण आणि कशासाठी चर्चा करेल?"
मागील संपूर्ण देशांतर्गत हंगामात सर्व सामने खेळल्याचे सांगत शमीने सांगितले की, कारकीर्द संपेपर्यंत बंगाल संघाशी असलेली निष्ठा आणि समर्पण कायम राहील.