पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात एका बाजूला तुर्कस्तानच्या इस्तंबूल शहरात शांतता चर्चा सुरू असतानाच, दुसऱ्या बाजूला ड्युरंड रेषेवर (Durand Line) दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार चकमक उडाली आहे. गुरुवारी झालेल्या या ताज्या संघर्षात ३ पाकिस्तानी सैनिकांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २ अफगाणी नागरिकही ठार झाले आहेत.
हा संघर्ष खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्याला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांताच्या सीमेवर झाला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केल्याचे वृत्त आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, हा संघर्ष अशा वेळी झाला, जेव्हा दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी तुर्कस्तानच्या मध्यस्थीने इस्तंबूल येथे उच्चस्तरीय शांतता चर्चा सुरू होती.
गेल्या महिन्यात (ऑक्टोबर) पाकिस्तानने काबूलमध्ये केलेल्या वादग्रस्त हवाई हल्ल्यानंतर (९ ऑक्टोबर) आणि त्यानंतर ११-१२ ऑक्टोबर रोजी झालेल्या रक्तरंजित चकमकीनंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानची भूमी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) च्या दहशतवाद्यांकडून पाकिस्तानवर हल्ले करण्यासाठी वापरली जात आहे. तर, तालिबानने हे आरोप फेटाळत, पाकिस्तानच त्यांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असल्याचा आणि ISKP ला आश्रय देत असल्याचा पलटवार केला आहे.
इस्तंबूलमधील शांतता चर्चेतून हा वाद मिटण्याची आशा निर्माण झाली असतानाच, या नव्या संघर्षामुळे शांतता प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.