साकिब सलीम
'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण झाल्याचा उत्सव देश साजरा करत आहे. मात्र ज्यांना विनाकारण राजकीय वाद निर्माण करण्याची कला अवगत आहे ते ही संधी कसे दवडतील. मुंबईत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी म्हटले, "जसे तुम्ही माझ्यासोबत नमाज अदा करू शकत नाही, तसेच मी वंदे मातरम म्हणू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही व्यक्तीला राष्ट्रगीत गाण्यास भाग पाडणे हे त्यांच्या धर्म आणि विवेकाच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.”
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी एका कार्यक्रमात आझमी यांना 'वंदे मातरम'साठी दिलेल्या आमंत्रणावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
१९७३ मध्ये अशाच एका वादानंतर लेखक आणि विचारवंत ए. जी. नूरानी यांनी या वादाला ‘हिंदू आणि मुस्लिमांमधील जातीयवादी शक्तींचा प्रचार’ असल्याचे म्हटले होते. 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात त्यांनी लिहिले होते, "हा विषय मुळातच स्फोटक आहे. राष्ट्रगीत लोकांच्या भावनांना आवाहन करणारे असते. 'वंदे मातरम'ने हे काम अनेक दशके केले आणि आजही ते करत आहे. म्हणूनच, या गाण्याशी सुरुवातीपासूनच जोडल्या गेलेल्या वादाच्या मुद्द्यांचे शांतपणे आणि वस्तुनिष्ठपणे मूल्यांकन करणे अधिक गरजेचे आहे. हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी भूतकाळात राष्ट्रीय चळवळीवर परिणाम केला, आणि ते आजही राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेत समर्पक आहेत.”
तर, हा वाद नेमका आहे तरी काय? अनेक मुस्लिमांचा दावा आहे की, 'वंदे मातरम' हे एका मातृदेवतेची स्तुती करणारे हिंदू भजन आहे आणि त्यामुळे ते त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या विरोधात आहे. त्यांच्यासाठी, ही एक प्रकारची मूर्तिपूजाच आहे ज्याला त्यांच्या धर्मात पूर्णपणे मनाई आहे. दुसरी समस्या अनेकदा निदर्शनास आणली जाते, ती म्हणजे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या 'आनंदमठ' या कादंबरीचा संदर्भ. त्यात मुस्लिम शासकांना खलनायक म्हणून चित्रित केले होते. या कादंबरीत मुस्लिमविरोधी सूर होता आणि त्यामुळे हा समुदाय अस्वस्थ झाला होता.
दुसरीकडे, या गाण्याचे समर्थक असा दावा करतात की, हे गाणे विशेषतः त्यातील पहिले दोन कडवी त्या कादंबरीपासून, तसेच इतर कोणत्याही धार्मिक अर्थापासून स्वतंत्र मानले पाहिजे. कारण अनेक दशके या गाण्याने लोकांना देशासाठी प्राणार्पण करण्याची प्रेरणा दिली. हे गाणे संगीतबद्ध केले रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यांनीच हे गाणे पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गायले. यावेळी ते म्हणाले होते, "माझ्यासाठी या गीताच्या पहिल्या भागात व्यक्त झालेली कोमलता आणि भक्तीची भावना, मातृभूमीच्या सुंदर आणि कल्याणकारी पैलूंवर दिलेला भर या गोष्टींनी मला विशेष आकर्षित केले. इतके की, मला ते कवितेच्या उर्वरित भागापासून आणि पुस्तकापासून वेगळे करण्यात कोणतीही अडचण आली नाही. माझ्या वडिलांच्या एकेश्वरवादी आदर्शांमध्ये वाढलेलो असल्याने त्या भागातील भावनांशी माझी कोणतीही सहानुभूती असू शकत नव्हती."
'वंदे मातरम'चा वाद १९३७ मध्ये सुरू झाला. तेव्हा मोहम्मद अली जिना यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांची टीका सातत्यपूर्ण नव्हती. पण १९३७ नंतर हा एक राजकीय मुद्दा बनला. जिना यांनी १९३८मध्ये एका भाषणात म्हटले, "काँग्रेसने विधानमंडळात 'वंदे मातरम' या गाण्याने सुरुवात केली. ते केवळ मूर्तिपूजकच नव्हे तर मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवणारे भजन आहे."
काँग्रेसमधील मुस्लिम नेते मात्र जीनांच्या या दाव्याशी सहमत नव्हते. रफी अहमद किडवाई यांनी निदर्शनास आणून दिले की, जिना काँग्रेसचे सदस्य होते तेव्हा त्यांना या गीताचा सन्मानार्थ उभे राहण्यात किंवा ते गाण्यात कोणतीही अडचण नव्हती. अनेक वेळा ते व्यासपीठावर, पक्षाच्या बड्या नेत्यांमध्ये, कामकाजादरम्यान उपस्थित असत. किडवाई यांच्या मते जीनांचा हा आक्षेप केवळ एक बहाणा होता. त्यांचे अंतस्थ हेतू लपवणारा. १९३७ मध्ये दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात किडवाई म्हणाले होते, "श्री. जिना यांनी काँग्रेस सोडली ती 'वंदे मातरम' हे इस्लामविरोधी गाणे आहे असे त्यांना वाटल्यामुळे नव्हे, तर 'स्वराज्या'ची कल्पनाच त्यांना अस्वीकार्य वाटल्यामुळे."
१९३७ मध्ये जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, अबुल कलाम आझाद आणि नरेंद्र देव यांची या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक उपसमिती स्थापन करण्यात आली. आझाद स्वतः त्यांच्या काळातील सर्वात आदरणीय इस्लामिक विद्वानांपैकी एक होते. त्या समितीने असा निर्णय दिला की, गाण्याची पहिली दोन कडवी कोणत्याही समुदायाच्या विरोधात नाहीत आणि ती गायली जावीत.
महात्मा गांधींनी समितीच्या शिफारशीचा अहवाल 'हरिजन'मध्ये दिला: "तथ्य असलेल्या आक्षेपांची समितीने नोंद घेतली आहे. समिती हे निदर्शनास आणू इच्छिते की, राष्ट्रीय चळवळीने आकार घेण्यापूर्वी एका ऐतिहासिक कादंबरीत गीताची पार्श्वभूमी असण्यापेक्षा, राष्ट्रीय जीवनाचा भाग म्हणून या गाण्याच्या वापराचे आधुनिक उत्क्रांतीचे महत्त्व अनंत पटीने अधिक आहे. सर्व बाबींचा विचार करता, समिती अशी शिफारस करते की, जेव्हा कधी राष्ट्रीय मेळाव्यांमध्ये 'वंदे मातरम' गायले जाईल, तेव्हा फक्त पहिली दोन कडवीच गायली जावीत. तसेच, आयोजकांना 'वंदे मातरम' गाण्याव्यतिरिक्त किंवा त्याऐवजी, कोणतेही आक्षेपार्ह नसलेले दुसरे गाणे गाण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल."
हे लक्षात घेतले पाहिजे की, काँग्रेसने विधानसभांमध्ये 'वंदे मातरम' गाण्यास ब्रिटिश सरकारने आक्षेप घेतल्यानंतर जिना यांनी हा मुद्दा उचलला होता. सब्यसाची भट्टाचार्य लिहितात, "व्हाईसरॉय लिनलिथगो मद्रासच्या गव्हर्नरला 'मुस्लिम भावनांना निःसंशयपणे आक्षेपार्ह' असलेले हे गाणे थांबवण्याच्या प्रयत्नात, 'चतुराई आणि मन वळवण्याच्या प्रत्येक युक्तीचा' वापर करण्याचे निर्देश देत आहेत."
बंगालमध्ये, रेझाउल करीम यांनी 'वंदे मातरम'च्या समर्थनार्थ लिहिले. बिहार विधानसभेत सय्यद महमूद यांनी गाण्याचे समर्थन केले. हे विसरता कामा नये की, मौलाना अबुल कलाम आझाद एकटे नव्हते; डॉ. एम.ए. अन्सारी, हकीम अजमल खान, शौकत अली, मोहम्मद अली किंवा अगदी मोहम्मद अली जिना यांच्यासह प्रत्येक मुस्लिम काँग्रेस नेत्याने या गाण्याचा आदर केला होता.
खिलाफत चळवळीदरम्यान 'वंदे मातरम'बद्दल मुस्लिमांची भूमिकाएका अहवालातून स्पष्ट होते, जिथे महात्मा गांधींनी शौकत अली यांच्या लोकांस केलेल्या आवाहनाबद्दल लिहिले होते. त्यांनी लिहिले, "हिंदू-मुस्लिम ऐक्य असूनही त्यांनी (शौकत अली) पाहिले होते की, हिंदू 'वंदे मातरम'च्या घोषणा देत होते, तर मुस्लिम 'अल्लाहो अकबर'च्या, आणि याउलट. हे कानांना खटकत असल्याचे त्यांनी बरोबरच म्हटले. लोक अद्यापही एकमताने वागत नाहीत, हे त्याचेच द्योतक आहे. त्यामुळे, फक्त तीनच घोषणांना मान्यता दिली पाहिजे: 'अल्लाहो अकबर', जे हिंदू आणि मुस्लिमांनी आनंदाने गायले पाहिजे, हे दाखवण्यासाठी की फक्त देवच महान आहे आणि दुसरे कोणी नाही; दुसरी घोषणा 'वंदे मातरम' (मातृभूमीला वंदन) किंवा 'भारत माता की जय' असावी. तिसरी 'हिंदू-मुसलमान की जय' असावी, ज्याशिवाय भारताचा विजय शक्य नाही आणि देवाच्या महानतेचे खरे प्रदर्शन होणार आन्ही. माझी खरोखर इच्छा आहे की, वृत्तपत्रे आणि सार्वजनिक व्यक्तींनी मौलानांचा हा सल्ला स्वीकारावा आणि लोकांना फक्त याच तीन घोषणा वापरण्यास प्रवृत्त करावे."
आपल्याला गरज आहे ती परस्पर सामंजस्य आणि आदराची. काही लोकांनी निष्ठा तपासण्यासाठी घोषणा लादण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्राला मदत होणार नाही, तर विश्वासाने केलेला आदराने भरलेला संवादच आपल्याला महात्मा गांधींनी दाखवलेल्या मार्गावर घेऊन जाईल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -