लाहोर बनले जगातील सर्वात प्रदूषित शहर; हवेचा दर्जा 'धोकादायक' श्रेणीत

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 1 h ago
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक; AQI पोहोचला ४१० वर
पाकिस्तानच्या लाहोरमध्ये प्रदूषणाचा उच्चांक; AQI पोहोचला ४१० वर

 

लाहोर 

पाकिस्तानची सांस्कृतिक राजधानी असलेले लाहोर शहर जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे. येथील हवेचा दर्जा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचला असून, एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) थेट ४१० वर नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती एका एअर क्वालिटी मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मने दिली आहे.

हवेच्या प्रदुषणाचे मोजमाप करणाऱ्या स्विस प्लॅटफॉर्म IQAir च्या अहवालानुसार, ३०० पेक्षा जास्त AQI असणारी हवा 'धोकादायक' मानली जाते. लाहोरमधील PM2.5 प्रदूषकांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) वार्षिक मार्गदर्शक तत्त्वांच्या तुलनेत तब्बल ४५.२ पटीने अधिक असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

लाहोरमध्ये दरवर्षी वाढते स्मॉगचे संकट

PM2.5 म्हणजे २.५ मायक्रोमीटर किंवा त्यापेक्षा लहान व्यासाचे सूक्ष्म हवेतील कण असतात, जे श्वासावाटे थेट फुफ्फुसांमध्ये आणि रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करू शकतात. यामुळे दीर्घ संपर्कात राहिल्यास आरोग्याशी संबंधित गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. प्रांतीय सरकारच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान लाहोर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील इतर भागात स्मॉग आणि हवेचे प्रदूषण गंभीर समस्या बनत असते.

तज्ज्ञांकडून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी आणि हवामान प्राधिकाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याचे वारंवार आवाहन केले आहे. घराबाहेर व्यायाम करणे टाळणे, प्रदुषित हवा रोखण्यासाठी खिडक्या बंद ठेवणे, घराबाहेर जाताना संरक्षक मास्क वापरणे आणि घरातील इनडोअर एअर प्युरिफायरचा वापर करण्याचा सल्ला IQAir ने दिला आहे. लाहोरमधील ही बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.