मोहल्ला ग्रंथालय चालविणारी औरंगाबादची मरियम मिर्झा

Story by  test | Published by  Pooja Nayak • 1 Years ago
Mariyam mirza
Mariyam mirza

 

कोरोना काळात गल्ली-मोहल्ल्यातील मुलांसाठी स्वतः च्या पुस्तकांपासून औरंगाबादच्या बायजीपुरा गल्ली येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नावाने एका मुलीने बालवाचनालय सुरू केले. एकीकडे दिवसेंदिवस मुलं वाचनापासून लांब जात असताना मुलांना पुन्हा पुस्तकांच्या जगात नेण्यासाठी ‘पैसा वाचवा, पुस्तक वाचा’ असे म्हणत ग्रंथालयाचे साकडे घालणारी ही १४ वर्षीय मुलगी आहे मरियम मिर्झा.
-छाया काविरे 

मरियम सध्या औरंगाबादच्या इकरा उर्दू गर्ल्स हायस्कूल येथे शिकत आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी तीने मोहल्ला बालवाचनालय अभियानाची सुरवात केली. तीच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची दखल घेण्यात आली.  नुकतेच ‘अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम्स ऑफ इंडियन ओरिजिन (एएफएमआय) यूएसए आणि कॅनडा’ यांच्या वतीने ‘विशेष सामाजिक पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. दिल्ली नगर निगम सिवेक सेंटरच्या दीनानाथ सभागृहामध्ये आयोजित ३३ व्या आंतरराष्ट्रीय वार्षिक समारोहात दिल्लीचे माजी राज्यपाल लेफ्टनंट जनरल नजीब जंग यांच्या हस्ते तीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. 


विद्यार्थ्यांना वाचनाची आवड कशी निर्माण करता येईल? यासाठी तिचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पुस्तकांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही वेळा विद्यार्थ्यांना मोफत गल्ले वाटप केले जातात, ज्यामध्ये मुले पैसे गोळा करतात आणि या पैशातून त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करतात. तर, कधी ‘घर घर किताब, हर घर में किताब’ या मोहिमेअंतर्गत परिसरात अभ्यासासाठी पुस्तके देखील वाटली जातात. शहरातील विविध गल्ली मोहल्ला व झोपडपट्टीतील गरीब व कामगारांच्या मुलांसाठी ‘रीड अॅण्ड लीड फाउंडेशन’च्या सहकार्याने व ‘फेडरेशन ऑफ ऑल मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन’च्या मार्गदर्शनाने तीने दीड वर्षात ३० बालवाचनालये सुरू केली आहेत.


मरियमचे वडील मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी यांचे पुस्तकांचे दुकान आहे. त्यामुळे लहानपणापासूनच ती पुस्तकांच्या सहवासात आहे. मरियम इ. ५ वीच्या वर्गात असताना तिने एका ग्रंथालयाला भेट दिली. त्यावेळेस मित्र शेरखान पठाण याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ग्रंथालय सुरु करण्याची कल्पना तिच्या बालमनात आली आणि तिने तिच्या वडिलांकडे हट्ट सुरू केला. तिचे वडील लगेच तयार झाले. त्यावेळेस तिच्याकडे फक्त १५० पुस्तके होती. तिच्या वडिलांनी तिला अजून १५० पुस्तके दिली आणि अशा ३०० पुस्तकापासून सुरू झाले ‘बालग्रंथालय’. 


ग्रंथालय सुरू करताना तिला अनेक अडचणी आल्या. नवीन पुस्तके खरेदी करायला पैसे नव्हते. ग्रंथालय सुरू करायला जागाही नव्हती. शिवाय, जागा भाड्याने घ्यायची कुवतही नव्हती. मात्र, या सर्व प्रश्नांवर मरियमने मात करत जागा व पुस्तकही मिळवली. तिच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी तिला जागा आणि पुस्तकही दिली. घरातील रिकाम्या खोल्या, ओटा, इतकंच काय तिच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तिला ग्रंथालयासाठी मशिदीतदेखील जागा मिळाली. आता तिच्या तीस ग्रंथालयात दोन हजार पेक्षाही जास्त पुस्तके आहेत. तिची शाळा सुटली की ती ग्रंथालयाला भेट देते व दिवसभराचा आढावा घेते. बालग्रंथालय चालवायला तिचे वडील तिला मदत करतात. 


आताची पिढी वाचत नाही हे मरियमच्या वडीलांना मान्य नाही. ते म्हणतात, ‘‘बरेच पालक बाजारात जाऊन मुलांसाठी पुस्तके खरेदी करत नाहीत. पालक म्हणून आपण त्यांच्या हातात कधी पुस्तक देणार नसाल तर मुलं वाचत नाही हा त्यांच्यावर आरोपही लावायला नको. शहरांमध्ये अनेक ग्रंथालये आहेत पण ते फक्त तरुण आणि प्रौढांसाठी. आपल्याकडे बालग्रंथालय ही संकल्पना या आधी साकारण्यात आली नाही. बऱ्याच ग्रंथालयात तर मुलांना प्रवेशही नसतो.’’ तिच्या मैत्रिणींनासुद्धा तिचे कौतुक वाटते. त्यांना शाळेतल्या ग्रंथालयांऐवजी मरियमच्या ग्रंथालयातील पुस्तके जास्त आवडतात. तिच्या शालेय मैत्रिणी म्हणतात, ‘‘इथे आम्हाला नावनोंदणी करणे किंवा ओळखपत्र दाखवणे बंधनकारक नाही. पूर्ण शाळेला तिच्यावर गर्व आहे.’’ शहरातील या ग्रंथालय चळवळीची माहिती आता अनेकांना होत आहे. अनेक दात्यांनी तिला स्वतः हून मदतही केली आहे. ही चळवळ फक्त औरंगाबाद किंवा महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्याचा विस्तार देशभर व्हावा, असे मरियमला वाटते.


मरियमचा छोटासा प्रयत्न तिचे मोठे विचार दर्शवितात. गरजेचे नाही की समाजासाठी काहीतरी करायला खूप पैसे हवे. काहीतरी करायची जिद्द असेल तर आपोआप रस्ते खुले होत जातात.
- इम्तियाज जलील, खासदार.

ग्रंथालयाचे वैशिष्ट्य
ग्रंथालयाला कधीही कुलूप लावले जात नाही. मुलं येतात, पुस्तकं घेतात आणि वाचून झाली की प्रामाणिकपणे जागेवर परत आणून ठेवतात. पुस्तकं चोरीला गेली तरी तिला वाईट वाटत नाही कारण ज्ञानाची भूक असणारेच पुस्तकांची चोरी करतात, असं ती म्हणते. हजारो मुलांना या बालग्रंथालयाचा फायदा होत आहे. मुलं म्हणतात, ‘‘इथे आम्हाला शाळेच्या पुस्तकांव्यतिरिक्त महापुरुषांच्या जीवनकथा, विज्ञानाच्या गोष्टी, थोरांच्या गोष्टी, कॉमिक्स वाचायला मिळतात. त्यामुळे वाचायची आवड निर्माण होते व सवयही लागते. आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त मुलांना या ग्रंथालयाचा फायदा झाला आहे.