पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल सकाळी १०.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवनियुक्त तरुणांना एक लाखांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतील "कर्मयोगी भवन"च्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी केली.
देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन, 'या' विभागांमध्ये होणार नियुक्त्या
देशभरात ४७ ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत, केंद्र सरकारच्या विभागांमध्ये भरती होत आहे आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांचा या उपक्रमाला पाठींबा आहे.
नवनियुक्त तरुण महसूल विभाग, गृह मंत्रालय, उच्च शिक्षण विभाग, अणुऊर्जा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये कार्यरत आहेत. संरक्षण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, आदिवासी व्यवहार मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयातील विविध पदांवर भरती झाल्यानंतर सरकारसोबत काम करतील.
रोजगार मेळाव्यात आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत सरकारमध्ये तरुणांना नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वेगान वाढत आहे. पूर्वीच्या सरकारांमध्ये नोकरीच्या जाहिराती देण्यापासून ते नियुक्तीपत्र देण्यापर्यंत बराच वेळ लागत असे. या वेळेचा फायदा घेत त्या काळात लाचखोरी होत होती, असे ते म्हणाले.
भरती वेळेवर पूर्ण करण्यासाठी सरकार कसं काम करत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. ते म्हणाले की, भरती प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण व्हावी, यावर आमच्या सरकारचा भर आहे. त्यामुळे प्रत्येक तरुणाला आपली क्षमता सिद्ध करण्याची समान संधी मिळू लागली आहे.
ते म्हणाले की, आज प्रत्येक तरुणाच्या मनात विश्वास आहे की, मेहनत आणि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर तो आपले स्वत:चे स्थान निर्माण करू शकतो. 2014 पासून, तरुणांना भारत सरकारशी जोडण्याचा आणि त्यांना राष्ट्र उभारणीत सहभागी करण्याचा आमचा प्रयत्न आहे.