आमिर खानने सांगितला तणावमुक्तीचा कानमंत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 2 d ago
आमिर खान
आमिर खान

 

बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने नुकतच नेटफ्लिक्सवरील एका संवादा भाग घेतला होता. यावेळी त्याने झोपेचं महत्व सांगितलं. वयाच्या ६० व्या वर्षीही निरोगी आणि उत्साही असलेल्या आमिरने त्याची मुलगी इरा खान यांच्यासोबत झालेल्या या चर्चेत सांगितलं की, “झोप हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. 8 तास किंवा तुमच्या शरीराला आवश्यक तेवढी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. झोपेची कमतरता तुमच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यावर परिणाम करते.” 

आमिर यांनी झोपेबरोबरच ध्यानधारणा, व्यायाम आणि संतुलित आहार यावरही भर दिला. आमिरने सांगितलं, “जीवनात कोणत्याही समस्यांना तोंड देत असाल, तर सर्वप्रथम तुमच्या शरीराला आवश्यक तेवढी झोप घ्या. तुम्ही काय खाता ते महत्वाच आहे. काही ना काही शारीरिक व्यायाम आणि ध्यानधारणा यामुळे मला खूप फायदा झाला आहे.” याला सहमती दर्शवताना इरा खान म्हणाली, “झोप, पौष्टिक आहार, पाणी आणि तुमच्या व्हिटॅमिन तपासणीवर लक्ष द्या.”
  
झोप का आहे महत्त्वाची?
दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे सल्लागार वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अंकित बन्सल यांनी आमिर यांच्या मताशी सहमती दर्शवली. “झोप ही स्मरणशक्ती मजबूत करण्यात, भावनिक संतुलन राखण्यात आणि शारीरिक पुनर्प्राप्तीसाठी महत्त्वाची आहे. ती संज्ञानात्मक कार्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक आहे,” असं ते म्हणाले. झोपेच्या REM (रॅपिड आय मूव्हमेंट) आणि खोल झोप या अवस्था शरीराच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावतात.

मुंबईतील ग्लेनइगल्स हॉस्पिटल परेलच्या डॉ. आरती उल्लाल यांनी सांगितलं, “झोपेच्या कमतरतेमुळे तुम्ही चिडचिडे, निराश आणि तणावग्रस्त होऊ शकता. झोपेदरम्यान कॉर्टिसॉलसारख्या तणाव हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं आणि तणाव कमी होतो. चांगली झोप तुमचा मूड सुधारते, तणाव कमी करते, विविध आजारांचा धोका कमी करते आणि एकाग्रता वाढवते.”

डॉ. उल्लाल यांनी झोपेला औषध संबोधलं. “जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता, तेव्हा शरीर पेशींची दुरुस्ती करतं, स्नायूंची पुनर्बांधणी होते आणि ऊती बरे होतात. झोप ही शरीराच्या विविध कार्यांना आधार देणारी महत्त्वाची प्रक्रिया आहे,” असं त्या म्हणाल्या. तज्ज्ञांच्या मते, प्रौढ व्यक्तीने दररोज 7-8 तास झोप घेणं आवश्यक आहे, यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखलं जाऊ शकतं. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter