ज्येष्ठ पटकथालेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी नेहमीच मनमोकळेपणाने आपले मत मांडले आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी पुन्हा एकदा आपली स्पष्टवक्तेपणा दाखवला. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात जावेद अख्तर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या टीकेवर मोकळेपणाने भाष्य केले.
यावेळी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “दोन्ही बाजूंचे लोक मला शिव्या देतात. एक गट मला ‘काफिर’ म्हणतो, नरकात जाशील असे सांगतो. दुसरा गट मला ‘जिहादी’ म्हणतो, पाकिस्तानात जा असे सुनावतो.”
आपल्या खास शैलीत ते पुढे म्हणाले, “जर मला नरकात जाणे किंवा पाकिस्तानात जाणे यापैकी एकच पर्याय असेल, तर मी नरकात जाणेच पसंत करेन.”
टीका फक्त एकाच बाजूकडून होत नाही, यावर त्यांनी आपले स्पष्ट मत मांडले. “दोन्ही बाजूंनी मला शिव्या मिळतात. हे एकतर्फी नाही. मला अनेकजण पाठिंबा देतात, कौतुक करतात, प्रोत्साहन देतात. हे नाकारणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल."
ते पुढे म्हणतात, “टोकाच्या विचारसरणीचे लोक मला शिव्या देतात. एका बाजूचेही आणि दुसऱ्या बाजूचेही. ही वास्तविकता आहे. जर यापैकी एकाने तरी मला शिव्या देणे बंद केले, तर मला वाटेल काहीतरी चूक झाली, मी कुठे तरी चूक केली,” असे त्यांनी गमतीने सांगितले.
जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. २२ एप्रिलला जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा बळी गेला. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले.
दोन्ही देशांमधील ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या मालिकेनंतर १० मे रोजी शस्त्रसंधी जाहीर झाली. पण पाकिस्तानने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे दिसते. याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले. लवकरच नवी दिल्ली आणि इस्लामाबादमधील लष्करी संचालक (डीजीएमओ) चर्चा करतील, अशी माहिती मिळत आहे.