मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी आयझॉल येथील मिझोरम विद्यापीठाच्या सभागृहात काल ऐतिहासिक घोषणा केली. मिझोरम हे भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य ठरले आहे. ही कामगिरी उल्लास - नव भारत साक्षरता कार्यक्रम (न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम) अंतर्गत साध्य झाली आहे. या सोहळ्याला केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी, मिझोरमचे शिक्षणमंत्री डॉ. व्हॅनलालथलाना, मुख्य सचिव खिल्ली राम मीणा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मिझोरमला १९८७ मध्ये राज्याचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासून शिक्षण क्षेत्रात या राज्याने सातत्याने प्रगती केली. २०११ च्या जनगणनेनुसार, मिझोरमचा साक्षरता दर ९१.३३ टक्के होता. हा साक्षरता दर देशात तिसऱ्या क्रमांकावर होता.
यानंतर उल्लास योजनेने उर्वरित निरक्षर लोकांना शिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले होते. २०२३ मध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यातर आले. यात ३०२६ निरक्षर व्यक्ती आढळल्या. त्यापैकी १६९२ जणांनी शिक्षण घेण्यास तयारी दाखवली. २९२ स्वयंसेवी शिक्षकांनी या मोहिमेत भाग घेतला. यात विद्यार्थी, शिक्षक आणि समन्वयकांचा समावेश होता. मिझो संस्कृतीतील ‘त्लावमंगायहना’ (निःस्वार्थ सेवा) आणि कर्तव्य भावनेने प्रेरित होऊन या स्वयंसेवकांनी प्रत्येक गावात शिक्षण पोहोचवले.
मिझोरमने ९८.२ टक्के साक्षरता दर गाठला असून हा दर शिक्षण मंत्रालयाने ठरवलेल्या ९५ टक्के च्या निकषापेक्षा जास्त आहे. यासाठी शाळा, सामुदायिक सभागृह, ग्रंथालये आणि घरोघरी जाऊन वर्ग घेण्यात आले होते. मिझो आणि इंग्रजी भाषेत ‘वर्तियन’ नावाचे शिक्षण साहित्य तयार करण्यात आले होते. लॉंगतलाई जिल्ह्यासाठी विशेष इंग्रजी साहित्य बनवले गेले.
उल्लास योजना ही राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी जोडलेली आहे. २०२२ ते २०२७ या कालावधीत ती राबवली जात आहे. १५ वर्षांवरील ज्यांना शालेय शिक्षण मिळाले नाही, अशा व्यक्तींसाठी ही योजना आहे. यात साक्षरता, गणित, जीवन कौशल्ये, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सतत शिक्षण यांचा समावेश आहे. देशभरात १.७७ कोटी नवसाक्षरांनी मूलभूत साक्षरता आणि गणित चाचणी (FLNAT) दिली आहे. २.३७ कोटी विद्यार्थी आणि ४०.८४ लाख स्वयंसेवी शिक्षक उल्लास ॲपवर नोंदणीकृत आहेत. यापूर्वी लडाखने पूर्ण साक्षर प्रशासकीय एककाचा मान मिळवला होता.
मुख्यमंत्री लालदुहोमा म्हणाले, “हा केवळ आकडा नाही, तर मिझोरमच्या इच्छाशक्ती आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे. आता आपण डिजिटल साक्षरता, आर्थिक साक्षरता आणि उद्योजकता यावर लक्ष केंद्रित करू.” जयंत चौधरी यांनी मिझोरमच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले आणि हे यश देशासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
मिझोरमचे हे यश सामुदायिक सहभाग आणि सरकारी पाठबळाचे प्रतीक आहे. स्थानिकांनी दाखवलेली एकजूट आणि निःस्वार्थ भावना इतर राज्यांसाठी आदर्श आहे. ही केवळ साक्षरतेची कहाणी नाही, तर शिक्षणाने समाजाला सक्षम करण्याची प्रेरणा आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter