भारताने 'असा' उधळला सुवर्णमंदिर हल्ल्याचा कट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले. सीमेवर गोळीबार सुरू असताना पाकिस्तानने अमृतसरमधील सुवर्णमंदिरावर क्षेपणास्त्र डागले होते. पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले. या हल्ल्यासोबतच ड्रोनचा ढीगही पाडण्यात आला. भारतीय लष्कराने याचे छायाचित्र आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. या कारवाईने भारताच्या संरक्षण सामर्थ्याची आणि दृढनिश्चयाची झलक जगाला दिसली.

पाकिस्तानने ८-९  मे च्या रात्री अचानक गोळीबार सुरू केला होता. त्याचवेळी घुसखोरीचाही प्रयत्न झाला होता. पंजाब सीमेवर तैनात एका जवानाने सांगितले, “पाकिस्तानचा हा डाव आम्ही हाणून पाडला. रात्रभर चाललेल्या गोळीबारानंतर पहाटेपर्यंत पाकिस्तानी लष्कराला गुडघ्यावर आणले.” भारतीय लष्कराच्या 'वेस्टर्न कमांड'ने शेअर केलेल्या व्हिडीओत ड्रोन पाडण्याची कारवाई स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे, या कारवाईसाठी भारताला फक्त दहा टक्के दारूगोळा वापरावा लागला. पाडलेले ड्रोन तुर्की बनावटीचे असल्याचेही लष्कराने उघड केले.

सुवर्णमंदिरावर हल्ल्याचा कट
पाकिस्तानने सुवर्णमंदिरासारख्या पवित्र स्थळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ७  मे रोजी भारताने लष्करे तैयबाच्या मुरिदके येथील मुख्यालयावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य करेल, असे वाटले होते. पण त्यांनी थेट नागरी भाग आणि धार्मिक स्थळाला लक्ष्य केले. सुवर्णमंदिरावर डागलेले क्षेपणास्त्र आणि कामीकेझ ड्रोन भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने नष्ट केले. या यंत्रणेच्या ताकदीमुळे पाकिस्तानचा हा कट पूर्णपणे फसला.

या संघर्षादरम्यान अमृतसर आणि आसपासच्या गावांतील स्थानिकांनी भारतीय लष्कराला खंबीर साथ दिली. स्थानिक गटांनी सुवर्णमंदिरासह इतर धार्मिक स्थळांचे रक्षण केले. लष्कराला अन्न, निवारा आणि माहिती पुरवून स्थानिकांनी आपली देशभक्ती दाखवली. अमृतसरमधील रहिवासी जसबीर सिंग म्हणाले, “आमचे लष्कर हा देशाचा अभिमान आहे. त्यांच्यामुळेच आमच्या सीमा आणि शहरे सुरक्षित आहेत. गेल्या काही दिवसांत आम्हाला जवानांसोबत काम करण्याची संधी मिळाली. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

'ऑपरेशन सिंदूर'ने भारताच्या संरक्षण यंत्रणेची ताकद आणि सज्जता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. भारतीय लष्कराने केवळ सीमेवरच नव्हे, तर हवेतही शत्रूचा कट उधळला. वेस्टर्न कमांडने नमूद केले की, जमिनीपासून अवकाशापर्यंत संरक्षणाची जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडली आहे. तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर करून पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या अचूक रणनीतीमुळे तो अपयशी ठरला. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter