पाकिस्तानमधील अहमदिया समुदायाचे एक कब्रस्तान. फोटो सौजन्य - न्यूयॉर्क टाईम्स
हरजिंदर
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात भारताच्या क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोन्सनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य केले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानी सैन्य काही क्षेपणास्त्रांची आतिषबाजी करण्यात व्यस्त असताना पाकिस्तानातील कट्टरपंथीय कशात व्यस्त असतील? उत्तर अगदी साधे आहे. ते त्यातच व्यस्त होते ज्यात त्यांचा हातखंडा आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला होता तेव्हा पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खुशाब जिल्ह्यातील रोधा नावाच्या ठिकाणी हे कट्टरपंथीय एका कब्रस्तानात घुसले आणि त्यांनी तोडफोड सुरू केली.
तेथील अहमदिया समुदायाच्या या कब्रस्तानात शिरून त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल ९० कबरी उध्वस्त केल्या. त्यावर लावलेल्या मृतांच्या नावाच्या पाट्याही फोडल्या. या कट्टरपंथीयांची संख्या किती होती याचा उल्लेख तिथून येणाऱ्या कोणत्याही बातमीत नाही; पण ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात तोडफोड झाली, त्यावरून हे स्पष्ट होते की त्यांनी अगदी निवांतपणे कोणत्याही अडथळ्याविना हे दुष्कृत्य केले.
याच कब्रस्तानावर गेल्या वर्षी १ आणि २ एप्रिलच्या रात्रीही असाच हल्ला झाला होता. तेव्हाही अनेक कबरींची नासधूस करण्यात आली होती. त्यात विडंबना म्हणजे पोलिसांनी या कृत्याला जबाबदार असणाऱ्यांना पकडण्याऐवजी अहमदिया समुदायाच्या नेत्यांना कबरींवरील नामफलक काढून टाकण्याचा ‘सल्ला’ दिला.
मात्र त्या नेत्यांनी हा सल्ला मान्य करण्यास नकार दिला. त्याचा ‘परिणाम’ एका वर्षानंतर झालेल्या या हल्ल्यातून दिसला. यावेळी ह्ल्लातून कदाचित एकही कब्र वाचली नाही.
पाकिस्तानातील अहमदिया समुदायावर किंवा त्यांच्या कब्रस्तानांवर झालेला हा काही पहिला हल्ला नाही. २०२५ मध्ये आतापर्यंत अशा तब्बल ११ घटना घडल्या असून त्यात एकूण २६९ कबरींचे नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानात अशा २१ घटना घडल्या होत्या. आणि त्यात कट्टरपंथीयांनी जवळपास ३१९ कबरींची नासधूस केली होती.
अहमदिया समुदायावरील हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. प्रशासनाने या समुदायाच्या सुरक्षेची कोणतीही तजवीज केलेली नाही. या हल्ल्यांसाठी आजवर कुणी पकडले गेल्याची बातमीही समोर आलेली नाही.
अल्पसंख्याक अहमदिया समुदायावर होणाऱ्या अशा अत्याचारांची यादी खूप मोठी आहे. पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून लगेचच या हल्ल्यांना सुरुवात झाली. १९७४ मध्ये त्यांना गैर-इस्लामी घोषित केल्यानंतर त्यांच्याविरोधात भेदभाव आणि अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली.
केवळ अहमदीच नव्हे तर पाकिस्तानच्या सरकारच्या लेखी अजूनही मुस्लीम मानल्या जाणाऱ्या इतर अल्पसंख्याक समुदायांसोबतही तितकेच वाईट वर्तन केले गेले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात राहणारा हजारा समुदाय.
जानेवारी २०१३ मध्ये क्वेटा येथे झालेला तो दहशतवादी हल्ला कोण विसरू शकेल ज्यामध्ये या समुदायाच्या १२६ लोकांचा बळी गेला होता! असाच आणखी एक समाज म्हणजे पाकिस्तानातील शिया पंथीय मुस्लीम. हा समुदायही कट्टरपंथीयांच्या अत्याचारांचा कायमच बळी ठरत आला आहे.
पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना स्वतः शिया होते. मात्र, क्रिश्चियन सायन्स मॉनिटरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जुन्या लेखातील आकडेवारीनुसार १९८७ ते २००७ या काळात पाकिस्तानमध्ये ४००० हून अधिक शिया सांप्रदायिक हिंसेत मारले गेले.
२००७ नंतर अशा घटना आणखी वाढल्या असल्या तरी त्याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. पाकिस्तानात वाढणाऱ्या अतिरेकी प्रवृत्तीचे बळी केवळ तिथले अल्पसंख्याकच ठरलेत असे नाही. इतरांनाही त्याची झळ सोसावी लागत आहे.
तिथल्या बरेलवी आणि देवबंदी कट्टरपंथीयांमधील रक्तरंजित संघर्षाच्या बातम्या वरचेवर येतच असतात. आणि हे तेच कट्टरपंथीय आहेत ज्यांचा उपयोग पाकिस्तानी सैन्य भारताविरुद्ध काश्मीर आणि इतर ठिकाणी दहशतवाद पसरवण्यासाठी करत असतो.
- हरजिंदर
(लेखक दिल्लीस्थित वरिष्ठ पत्रकार आहेत.)