डोनाल्ड ट्रम्प पुन्हा इराणवर मोठ्या लष्करी हल्ल्याच्या तयारीत; व्हाइट हाऊसमध्ये आपत्कालीन बैठक

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 14 h ago
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प

 

अमेरिका आणि इराणमधील शांतता कराराच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर पुन्हा एकदा नवे आणि मोठे लष्करी हल्ले करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत. जर चालू असलेल्या वाटाघाटींमधून कोणताही तोडगा निघाला नाही, तर अमेरिका इराणविरुद्ध निर्णायक लष्करी कारवाई करेल, असे संकेत अमेरिकन प्रसारमाध्यम 'अॅक्सिओस'ने (Axios) दिलेल्या अहवालात मिळाले आहेत.

 

या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शुक्रवारी सकाळी व्हाइट हाऊसमध्ये आपल्या उच्चस्तरीय राष्ट्रीय सुरक्षा पथकासोबत एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेतली. दुसरीकडे, पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेहरानच्या दौऱ्यावर असून कतारचे एक शिष्टमंडळही या शेवटच्या प्रयत्नांमध्ये सामील झाले आहे.

 

व्हाइट हाऊसमध्ये हालचालींना वेग; ट्रम्प यांचा वॉशिंग्टनमध्येच मुक्काम

 

शुक्रवारी सकाळी व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या या बैठकीला अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स, संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, सीआयए (CIA) संचालक जॉन रॅटक्लिफ आणि व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ सुझी वाईल्स यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यू जर्सी येथील आपला वीकेंडचा दौरा रद्द केला असून ते वॉशिंग्टनमध्येच थांबले आहेत. इतकेच नाही तर शासकीय परिस्थिती आणि देशहिताचा हवाला देत ट्रम्प यांनी या आठवड्यात होणाऱ्या आपल्या मुलाच्या (डॉन ज्युनिअर) विवाह सोहळ्यालाही न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

व्हाइट हाऊसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, "इराण करार करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. आता पुढे काय होते ते आपण पाहू. आम्ही त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे आणि आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, कारण इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत."

 

राजनैतिक प्रयत्न सुरू मात्र ट्रम्प यांचा संयम सुटला

 

दुसरीकडे, स्वीडनमध्ये असलेल्या अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी सांगितले की, इराणसोबतच्या चर्चेत किंचित प्रगती झाली आहे, परंतु या प्रगतीचा अतिरेक करणे योग्य ठरणार नाही. पाकिस्तानचे लष्करप्रमुख शनिवारी इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'चे (IRGC) कमांडर जनरल अहमद वाहिदी यांची भेट घेणार आहेत.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून इराणसोबत सुरू असलेल्या संथ वाटाघाटींमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कमालीचे नाराज झाले आहेत. मंगळवारी त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी चर्चा करताना राजनैतिक मुत्सद्देगिरीला आणखी एक संधी देण्याचे मान्य केले होते, मात्र गुरुवारपर्यंत त्यांचा कल पुन्हा लष्करी हल्ल्याकडे झुकला आहे. इराणवर एक अंतिम आणि 'निर्णायक' लष्करी कारवाई करून युद्ध संपवण्याची घोषणा करावी, असा विचार ट्रम्प करत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.