माउंट एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 14 h ago
माउंट एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू
माउंट एव्हरेस्टवरून उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू

 

जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करून खाली परतताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. अरुण कुमार तिवारी आणि संदीप आरे अशी या मृत्यूमुखी पडलेल्या गिर्यारोहकांची नावे असून, नेपाळच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

थकव्यामुळे ओढवला मृत्यू

 

नेपाळमधील 'एक्सपिडिशन ऑपरेटर्स असोसिएशन'चे सरचिटणीस ऋषी भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिखरावरून खाली उतरत असताना या दोन्ही गिर्यारोहकांना प्रचंड थकवा आला होता. त्यांच्यासोबत असलेल्या मार्गदर्शकांनी (Guides) त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना यश आले नाही. संदीप आरे यांनी बुधवारी तर अरुण तिवारी यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एव्हरेस्ट सर केल्याचे समजते.

 

विक्रम रचल्यानंतर दुःखद बातमी

 

संदीप आरे यांचा गुरुवारी मृत्यू झाला, तर अरुण कुमार तिवारी यांच्या मृत्यूची नेमकी वेळ अद्याप समजू शकलेली नाही. विशेष म्हणजे, बुधवारी एकाच दिवशी तब्बल २७४ गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करून नवा जागतिक विक्रम रचला होता. या मोहिमेत संदीप आरे यांच्यासह तुळसी रेड्डी पाल्पुनुरी आणि अजय पाल सिंग धालीवाल या तीन भारतीयांचा समावेश होता. त्यानंतर गुरुवारी भारताच्या लक्ष्मीकांत मंडल यांनीही जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवले होते. या ऐतिहासिक यशानंतर आता गिर्यारोहकांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली जात आहे.