Cockroach Janata Party: 'सीजेपी' संस्थापक अभिजित दिपके यांच्या घराला पोलीस संरक्षण

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपी पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त

 

छत्रपती संभाजीनगर : २५ मे 

सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजित दिपके यांच्या छत्रपती संभाजीनगरमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एमआयडीसी वाळूज (MIDC Waluj) परिसरातील त्यांच्या घराजवळ गर्दी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

'कॉकरोच जनता पार्टी' हा पक्ष गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर डिजिटल स्वरूपात समोर आला होता. बेरोजगारी, स्पर्धा परीक्षांचे पेपर फूट आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मिम्स (Memes) आणि राजकीय भाष्यांद्वारे या ग्रुपने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले असून सोशल मीडियावर या पक्षाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे.

गर्दी रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्त

पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सोशल मीडियावर सीजेपी (CJP) हा विषय मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके यांच्या एमआयडीसी वाळूज येथील निवासस्थानी लोकांची गर्दी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी २४ तास सामान्य पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

दरम्यान, दिपके यांना कोणत्याही प्रकारची धमकी आल्यामुळे हे संरक्षण देण्यात आलेले नाही, असे पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केले. त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यात या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडिया अकाऊंट्स बंद झाल्याचा आरोप

या पोलीस संरक्षणाच्या घडामोडींदरम्यान, अभिजित दिपके यांनी शनिवारी आपल्या डिजिटल चळवळीवर मोठी कारवाई झाल्याचा आरोप केला आहे. कॉकरोच जनता पार्टीची सर्व अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्स आणि Website बंद करण्यात आले असून, त्यांचा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रवेश पूर्णपणे रोखण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला आहे. या प्रकरणाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.