बुधवारी संध्याकाळी धनुषच्या चाहत्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली. भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आहे. भारताचे ११वे राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ. कलाम यांच्यावरील हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित करणार आहेत.
धनुष साकारणार मुख्य भूमिका
धनुष या चित्रपटात डॉ. कलाम यांची भूमिका साकारणार आहे. अभिषेक अग्रवाल यांच्या अभिषेक अग्रवाल आर्ट्स आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरिज या बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे. सायविन क्वाड्रास यांनी पटकथा लिहिली आहे. त्यांनी यापूर्वी नीरजा, मैदान आणि परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण यांसारखे यशस्वी चित्रपट लिहिले आहेत.
डॉ. कलाम यांना मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाते. साध्या परिस्थितीतून त्यांनी वैज्ञानिक, दूरदृष्टीचा नेता आणि जनतेचे राष्ट्रपती अशी ओळख निर्माण केली. हा चित्रपट डॉ. कलाम यांच्या मूल्यांवर आधारित आहे. कवी, शिक्षक आणि उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व यांचा जीवनातील विज्ञान आणि अध्यात्म यांचा समतोल या चित्रपटात दिसेल.
अधिकृत निवेदन
ओम राऊत म्हणाले, "आजच्या काळात खरे नेते दुर्मीळ आहेत. डॉ. कलाम राजकारणापासून दूर राहिले. शिक्षण, उत्कृष्टता आणि स्वदेशी संशोधन यांच्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांचा जीवनप्रवास चित्रपटात आणणे हे कलात्मक आव्हान आहे. ही सांस्कृतिक आणि नैतिक जबाबदारी आहे. हा प्रवास जागतिक युवकांसाठी, विशेषतः ग्लोबल साउथच्या युवकांसाठी प्रेरणादायी आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा अनुभव आहे. त्यांचे जीवन हे सर्वांना जोडणारे धडे आहे."
निर्माते अभिषेक अग्रवाल म्हणाले, "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा महान जीवनप्रवास मोठ्या पडद्यावर आणणे हा भावनिक क्षण आहे. ओम राऊत, धनुष आणि टी-सीरिजच्या भूषण यांच्यासोबत काम करण्याचा सन्मान मिळाला. हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित प्रकल्प आहे. आम्ही सर्वजण कलाम यांचा प्रवास जिवंत करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत. हा चित्रपट जागतिक पातळीवर भव्य दृश्य अनुभव असेल."
निर्माते भूषण कुमार म्हणाले, "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जीवनप्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो. टी-सीरिजला या चित्रपटाचा भाग होण्याचा सन्मान आहे. ओम राऊत यांच्यासोबत हा तिसरा सिनेमा आहे. धनुष आणि अभिषेक अग्रवाल यांच्यासोबत हा प्रकल्प खास बनला आहे. हा फक्त चित्रपट नाही, तर स्वप्ने, समर्पण आणि नम्रता यांनी राष्ट्राचा भविष्य कसे घडवले, याचा सन्मान आहे."