दहशतवादी विरोधी मोर्चेबांधणीची 'अशी' झाली आश्वासक सुरुवात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 12 h ago
 शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल मीडिया ऑफिसचे महासंचालक जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांच्या शिष्टमंडळाला 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने संयुक्त अरब अमिरातीच्या नॅशनल मीडिया ऑफिसचे महासंचालक जमाल मोहम्मद ओबैद अल काबी यांच्या शिष्टमंडळाला 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती दिली.

 

दहशतवादावर कठोर प्रहार करण्याच्या हेतूने 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात जागतिक स्तरावर संदेश देण्यासाठी पाठविण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी आज संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि जपान येथे गाठीभेटी घेतल्या. जपान येथे पोहोचलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) खासदार संजय झा यांनी केले, तर 'यूएई' येथे गेलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले. दोन्ही देशांमध्ये शिष्टमंडळाने तेथील मंत्री, सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्ती, 'थिक टँक'मधील सदस्य यांच्या भेटी घेतल्या आणि 'ऑपरेशन सिंदूर 'बाबत माहिती दिली. भारतातून गेलेले सर्वपक्षीय शिष्टमंडळ 'यूएई' येथील भारताच्या दूतावासात पोहोचले. 'ऑपरेशन सिंदूर 'बाबत माहिती देण्यासाठी भारताबाहेर पोहोचलेले हे पहिले शिष्टमंडळ ठरले. 

'यूएई' मध्ये काय घडले ?
'दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारत आणि यूएई एकत्र आहेत. अबू धाबी येथे श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शेख नहयान बिन मुबारक अल नहयान यांची भेट घेतली. दहशतवादाचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सांगितले,' असे 'यूएई'तील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. भारत आणि यूएई यांनी या वेळी ऐक्य व सहिष्णुतेची मूल्ये अधोरेखित केली, असेही दूतावासाने नमूद केले आणि बैठकीतील काही छायाचित्रे प्रसिद्ध केली. शिष्टमंडळाने संरक्षण व्यवहार, गृह व परराष्ट्र व्यवहार समितीचे अध्यक्ष डॉ. अली अलनुआयमी यांची भेट घेऊन दहशतवादविरोधी लढाईच्या सामायिक निर्धारावर भर दिला, असेही दूतावासाने स्पष्ट केले. 

याआधी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अबू धाबी येथे 'यूएई'च्या 'फेडरल नॅशनल कौन्सिल'चे सदस्य अहमद मीर खोरी यांची भेट घेतली. पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादाला होणाऱ्या साह्याबद्दल या वेळी खोरी यांना माहिती देण्यात आली. 'ऑपरेशन सिंदूर' या भारताच्या निर्णायक यशाची आम्ही अभिमानाने माहिती दिली आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला दिलेल्या पाठिंब्याची माहितीही आम्ही दिली, असे शिंदे यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

शिष्टमंडळातील सदस्य 
श्रीकांत शिंदे यांच्यासह शिष्टमंडळात मननकुमार मिश्रा (भाजप), सस्मित पात्रा (बीजेडी), ई. टी. महंमद बशीर (इंडियन युनियन मुस्लिम लीग), एस. एस. अहलुवालिया (भाजप), अतुल गर्ग (भाजपा), बांसुरी स्वराज (भाजप), माजी राजनैतिक अधिकारी सुजन आर. चिनॉय आणि 'यूएई'तील भारताचे राजदूत
संजय सुधीर यांचा समावेश आहे.

जपानमध्येही गाठीभेटी
सदार संजय झा यांच्यासोबत जपानमध्ये गेलेल्या खा शिष्टमंडळात भाजप खासदार अपराजिता सारंगी, ब्रिजलाल, प्रधान बरुआ, हेमांग जोशी, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास, माजी राजदूत मोहनकुमार यांचा समावेश आहे. सर्वपक्षीय मंडळाने जपानचे परराष्ट्रमंत्री टाकेसी इवाया यांची भेट घेतली. सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढा देण्याबाबत एकत्र राहण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. 

'दहशतवादाविरुद्ध भारताने सुरू केलेल्या लढ्यामध्ये जपान भारतासोबत असून, सर्व ते साह्य करण्यास तयार आहे,' असे भारतीय दूतावासाने 'एक्स'वर म्हटले आहे. शिष्टमंडळाने माजी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांची भेट घेतली. ते जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सुगा यांनी 'ऑपरेशन सिंदूर 'बाबत माहिती घेतली आणि भारताला पाठिंबा दिला. याआधी शिष्टमंडळाने टोकियोमधील आघाडीच्या 'जपानी थिंक टँक'सोबत संवाद साधला आणि दहशतवादाविरोधात भारताच्या भूमिकेची त्यांना माहिती दिली. 

शिष्टमंडळाने जपानच्या संसदेच्या प्रतिनिधीगृहाचे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे अध्यक्ष टाकाशी एंडो यांचीही भेट घेतली. "दहशतवादविरोधी लढ्यात भारतासोबत राहणार आहे," असे टाकाशी यांनी सांगितल्याचे
भारताच्या दूतावासाने एक्सवर म्हटले आहे.

महात्मा गांधी यांना अभिवादन
जपानमध्ये गेलेल्या भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने टोकियो येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. दहशतवादाविरोधी लढ्यामध्ये भारताची सर्वपक्षीय शिष्टमंडळे जगभरातील विविध देशांच्या ३३ राजधानी शहरांना भेटी देणार असून, 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणार आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter