इतर देशांत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली, तरी भारतात आणि महाराष्ट्रात या रुग्णांची संख्या अद्याप वाढलेली दिसून येत नाही. दरम्यान, परदेशातील आढळत असलेल्या रुग्णांमधील विषाणू हा कोरोना विषाणूच्या दोन उपप्रकारांपासून नवीन तयार झाला आहे. त्याला 'एन.१.८.१' असे नाव दिले असून, तो सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत नाही. भारतात जरी याचे रुग्ण वाढले, तरी त्यामुळे रुग्ण गंभीर होणार नसल्याचा विश्वास साथरोगतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सिंगापूर, हाँगकाँग येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भारतासह राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तसेच नागरिकांच्या मनातही याबाबत धाकधूक निर्माण झाली असली, तरी याबाबत साथरोग तज्ज्ञांनी फारशी काळजी करण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले. याबाबत 'भारतीय सार्स कोविड जिनोमिक्स कंसोर्टियम' (इन्साकॉग) संस्थेचे सदस्य डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, सिंगापूर, हाँगकाँग येथील रुग्णांमध्ये 'एन.१.८.१' हा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला उपप्रकार आढळून येत आहे. तो 'एक्सडीव्ही' व 'जेएन. १' या कोरोनाच्या आधीच्या दोन उपप्रकारांच्या संयोगाने तयार झाला आहे. तो सौम्य असून, रुग्णांना भरती होण्याची गरज पडत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले की, "विषाणू हा सौम्य स्वरूपाचा आहे. तो गंभीर नाही. तो आपल्याकडे आला, तरी आपल्याकडे झालेल्या लसीकरणामुळे त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. कोरोनाचा विषाणू हा स्वतःचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी तो सातत्याने उत्परिवर्तन करत असतो, ही बाब सामान्य आहे."
मुंबईत अधिक रुग्णसंख्या
साथरोगाच्या २१ मे रोजीच्या अहवालानुसार, मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या १२६ झाली आहे, तर पुण्यात दोन, कोल्हापुरात तीन, तसेच आणखी एका ठिकाणी १ अशा रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या १३२ वर आहे. मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या ही परदेशातील 'एन. १.८.१' हा 'व्हेरियंट' मुळे वाढत आहे का, असे विचारले असता, डॉ. कार्यकर्ते म्हणाले की, गेल्या वर्षभरापासून राज्यातील कोरोना रुग्णांचे जनुकीय क्रमनिर्धारण करण्यात येत नाही. त्यामुळे सध्या आपल्याकडे असणारा विषाणू हा कोणत्या स्वरूपाचा आहे, हे सांगणे कठीण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.