संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख समीर व्ही. कामत.
काल संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) प्रमुख समीर व्ही. कामत यांनी सांगितले की, भारताच्या स्वदेशी ‘आकाशतीर’ हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणालीने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अप्रतिम कामगिरी केली. ६ - ७ मे 2025 रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांविरुद्ध राबवलेल्या या कारवाईत ‘आकाशतीर’ प्रणालीने नव्या युद्धक्षमतेची अदृश्य शक्ती म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. “आमच्या हवाई संरक्षण प्रणालीने उत्कृष्ट कामगिरी केली आहे ,” असे कामत यांनी नागपूर येथे पीटीआयला सांगितले.
नागपूर येथे ड्रोन, मिसाइल आणि रॉकेट निर्मितीच्या सुविधांचा दौरा करताना कामत यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आम्ही संरक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. पण पूर्ण आत्मनिर्भरतेसाठी अजून काही काम बाकी आहे. पुढील काही वर्षांत आम्ही पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ.”
‘आकाशतीर’ प्रणालीचे वैशिष्ट्य
‘आकाशतीर’ ही पूर्णपणे स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणाली आहे. शत्रूची विमाने, ड्रोन आणि मिसाइल्स शोधणे, त्यांचा मागोवा घेणे आणि त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी विविध रडार, सेन्सर आणि संचार तंत्रज्ञानांचा एकत्रित वापर आकाशतीरच्या माध्यमातून करण्यात येतो. ही प्रणाली प्रतिकूल परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करते. ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘आकाशतीर’ची क्षमता भारताच्या संरक्षण सामर्थ्याचा आधार ठरली.
ड्रोन आणि सिग्नल जॅमिंगसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे पारंपरिक शस्त्रास्त्रे मागे पडतील का, या प्रश्नावर कामत यांनी सांगितले की, “भविष्यातील युद्धे ही पारंपरिक उपकरणे आणि ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्ध यासारख्या नव्या तंत्रज्ञानाची जोड असेल. आपण दोन्हींसाठी तयार राहायला हवे.”
अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट (AMCA)
स्वदेशी 5.5 पिढीच्या स्टेल्थ फायटर विमान ‘अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट’ (AMCA) च्या प्रगतीबाबत कामत म्हणाले, “AMCA प्रकल्प गेल्या वर्षी सुरू झाला आहे. 2034 पर्यंत तो पूर्ण होईल आणि 2035 पर्यंत त्याची लष्करात समावेश होईल. फेब्रुवारी २०२५ मध्ये बेंगळुरू येथील एअरो इंडियामध्ये AMCA चे पूर्ण-आकाराचे मॉडेल प्रदर्शित करण्यात आले होते. DRDO ची वैमानिक विकास एजन्सी (ADA) सध्या AI-आधारित पायलट, नेट-सेंट्रिक युद्ध प्रणाली, एकीकृत वाहन आरोग्य व्यवस्थापन आणि अंतर्गत शस्त्रास्त्र कक्ष यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करत आहे.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter