आतिर खान
आपल्या धावपळीच्या आयुष्यात काही माणसे समाजात आश्वासक बदल घडवण्यासाठी शांतपणे, सातत्याने पण खंबीरपणे राबत असतात. ही माणसे प्रसिद्धी किंवा लोकमान्यतेपासून दूर राहून आपल्या समुदायाच्या भल्यासाठी स्वतःला वाहून घेतात. ते आपल्या कृतीतून, मूल्यांमधून जगाला उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवतात,त्यांना प्रेरणा देतात.
‘आवाज–द व्हॉईस’ येत्या रविवारपासून देशभरातील अशाच भारतीय मुस्लिम परिवर्तनकर्त्यांच्या, चेंजमेकर्सच्या यशोगाथा सांगणारी विशेष मालिका सुरू करत आहे. या प्रेरक कथांमधून आम्ही अशा व्यक्तींची ओळख करून देणार आहोत ज्यांनी आपल्या कार्यातून समाजाप्रती करुणा, समर्पण आणि नव्या कल्पनांचे दर्शन घडवले. आमच्या संपादकांनी या व्यक्तींचे कार्यातील सातत्य आणि समाजाला दिशा देण्यात बजावलेली भूमिका या आधारे त्यांची चेंजमेकर्सची म्हणून निवड केली आहे.
ही माणसे रोजच्या आयुष्यातील नायक आहेत. कमी संसाधने, मात्र दृढ निश्चयाने ही मंडळी सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत आहेत. शिक्षण, आरोग्यसेवा आणि स्वच्छता क्षेत्राला अधिक भक्कम करत आहेत. या व्यक्ती महिला सक्षमीकरण, पर्यावरण रक्षण आणि आपल्या समुदायांचा उत्थानासाठी अव्याहतपणे काम करत आहेत. हे सारे ते कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता करतात. निस्वार्थपणे उत्तम समाजोपयोगी कार्य करत राहणे हीच बाब त्यांना समाधान देण्यासाठी पुरेशी असते.
छोटी वाटणारी त्यांची कृती खूप मोठा परिणाम घडवते. थेंबे थेंबे तळे साचे असे आपण म्हणतो. हा प्रत्येक परिवर्तनकर्ता भारताला हळूहळू बदलवणाऱ्या प्रगतीच्या प्रवाहातील महत्त्वाचा घटक आहे. ही मंडळी खरेच समाजपरिवर्तनात योगदान देताहेत किंवा इतरांना त्यासाठी प्रेरणा देताहेत हाच त्यांच्या निवडीचा खरा निकष होता. नवकल्पना, प्रभावी नेतृत्व आणि माणसांचे आयुष्य सुधारण्याच्या निश्चयातून ही मंडळी जगात सकारात्मकत बदल घडवतात यावर आमचा ठाम विश्वास आहे.
जग मोठमोठ्या याशोगाथांचा उदोउदो करते. पण दुसरीकडे माणुसकीची उच्च मूल्ये जपणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे आम्हाला वाटते. ही माणसे आपल्याला समाजाप्रती आणि एकमेकांप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात.
आपल्या या मालिकेचा शुभारंभ उत्तर प्रदेशातील परिवर्तनकर्त्यांपासून होत आहे. यात कॅप्टन सारीया अब्बासी यांची यशोगाथा आहे. लहानपणापासून त्यांना भारतीय सैन्यात सामील होण्याचे स्वप्न होते. अभियांत्रिकीची पदवी मिळवल्या नंतर अनेक नोकरीच्या संधी मिळाल्या, पण त्यांनी स्वप्नाला प्राधान्य दिले. भारतीय सैन्यात प्रवेश करून त्या देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य मुस्लिम महिलांसाठी प्रेरणा बनल्या. १०२१ मध्ये तवांग येथील भारत-चीन सीमेवर त्यांनी कठीण मोहीम यशस्वी केली.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या परिसरात राहणाऱ्या रुबिना रशीद अली गरीब घरातील महिलांना कापडावर सजावटीचे शिवणकामातून उपजीविका मिळवण्यासाठी लढतात. या महिलांना योग्य मोबदला मिळावा यासाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.
अलीगढच्या डॉ. फरहा उस्मानी वैद्यकीय तज्ज्ञ आहेत. २००७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या जनसंख्या निधीत करिअर करण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. कुटुंबापासून दूर जाणे त्यांच्यासाठी कठीण होते. युएनएफपीएच्या संचालकपदापर्यंत पोहोचलेल्या त्या एकमेव मुस्लिम महिला आहेत. आज त्या जागतिक स्तरावर महिलांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी धोरणे आखतात. SAFAR या संस्थेच्या उपाध्यक्षा म्हणून त्या भारतातील अल्पसंख्याक आणि उपेक्षित महिलांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत.
बुलंदशहरातील व्यापारी बब्बन मियाँ शेकडो गायींची काळजी घेणारी मोठी गौशाळा चालवतात. त्यांच्या आईच्या प्राण्यांवरील प्रेमाने त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांचे कार्य सामाजिक समजुतींना आव्हान देते आणि मुस्लिम समुदायाच्या प्राणी काळजीबद्दल नवा दृष्टिकोन मांडते.
या काही परिवर्तनकर्त्यांच्या कथा भारतीय लोककथा आणि स्थानिक साहित्यातील पात्रांची आठवण करून देतात. करुणा आणि निःस्वार्थीपणाच्या भारतीय मूल्यांनी ही माणसे वाढली आहेत.
या आणि अशा अनेक कथांमधून आम्ही वाचकांना प्रेरणा देऊ इच्छितो. शांतपणे चालणारी ही क्रांती भारताला अधिक समावेशक बनवत आहे. या मालिकेबद्दल तुमचे विचार आम्हाला ऐकायला आवडतील. आम्हाला [email protected] वर लिहा किंवा सोशल मीडियावर संपर्क साधा.
- आतिर खान
(लेखक ‘आवाज–द व्हॉईस’चे मुख्य संपादक आहेत.)