डॉ. श्रीमंत कोकाटे
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि संवर्धनाचे महान कार्य छत्रपती संभाजीराजांनी केले. त्यांच्या त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही.
छत्रपती संभाजीराजे शूर, पराक्रमी, बुद्धिमान तर होतेच; पण त्याचबरोबर ते प्रजावत्सल आणि नीतिमान होते. त्यांचे जीवन संघर्षमय आहे. बालपणापासून अनेक संकटे आली, पण अशा कठीण प्रसंगीदेखील त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला राजनैतिकतेचा पाया ढासळू दिला नाही. मातोश्री सईबाईचे निधन झाले, त्या वेळेस शंभूराजे फक्त दोन वर्षांचे होते. दूरदृष्टीच्या जिजाऊमाँसाहेबांनी आपला नातू शंभूराजांना राजनीती, युद्धकेलेचे शिक्षण दिले. वडील शिवाजीराजे यांच्या पराक्रमाचे बाळकडू शंभूराजांना मिळाले. वयाच्या आठव्या वर्षी ते पुरंदर तहाच्या पूतिसाठी मोगल छावणीत गेले. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांबरोबर आम्ग्याला गेले. आठ्यावरून सुटल्यानंतर त्यांना वाटेतच थांबावे लागले. अशा जीवघेण्या प्रसंगी शंभूराजे विचलित झाले नाहीत. ते कणखर आणि निर्भीड होते.
त्यांच्या शौर्याचे, धैर्याचे आणि औदार्याचे वर्णन समकालीन फ्रेंच पर्यटक अॅबे करे करतात. ते म्हणतात, "शिवाजीराजांनी दहा हजार सैनिकांचा विभाग आपल्या शूर अशा पुत्रास (संभाजीराजे) दिलेला आहे. ते वडिलांप्रमाणेच युद्धकलेत तरबेज आहेत. ते निष्णात सैनिकाप्रमाणेच कुशल असून मजबूत बांध्याचे आणि अतिस्वरूपवान आहेत. सैनिकांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. संभाजीराजे कर्तबगारी दाखविणाऱ्या सैनिकांचे कौतुक करतात व त्यांना बक्षीसही देतात."
१६६८ ते १६७२ अशी फक्त चार वर्षेच भारतात आलेल्या फ्रेंच पर्यटक अँबे करे याने छत्रपती संभाजीराजांचे अचूक वर्णन केलेले आहे. १६७३मध्ये रायगडावर आलेल्या टॉमस निकल्स या इंग्रज प्रतिनिधीशी आणि १६७५ मध्ये आलेल्या सॅम्युअल ऑस्टिनशी संभाजीराजांनी शिवाजीराजांच्या सूचनेवरून चर्चेत सहभाग घेतला होता. कुमारवयातच आंतरराष्ट्रीय मुत्सद्यांशी चर्चा करण्याइतकी राजकीय प्रगल्भता संभाजीराजांकडे होती, हे स्पष्ट होते. छत्रपती शिवाजीराजांनी संभाजीराजांना हे शिक्षण बालपणापासून दिलेले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहणारे देशी विदेशी समकालीन छत्रपती संभाजीराजांच्या गुणांचे कौतुक करतात.
छत्रपती संभाजीराजे जसे तलवारबाजीमध्ये निपुण होते, तसेच ते साहित्य क्षेत्रातही प्रज्ञावंत होते. त्यांचे संस्कृतवर प्रभुत्व होते. त्यांनी संस्कृत भाषेत 'बुधभूषण' नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हिंदी भाषेतही ते निष्णात होते, हिंदी भाषेत त्यांनी नखशिख, नायिकाभेद आणि सातसप्तक हे ग्रंथ लिहिले, त्यांनी इंग्रजी भाषेची उत्तम जाण होती. मराठी भाषेचे ते तारणहार होते. सतराव्या शतकात अनेक भाषांवर प्रभुत्व असणारे छत्रपती संभाजीराजे भाषाप्रभू होते, तसेच ते बहुश्रुत होते. वेद, पुराण, सहा शास्खे आणि महाकाव्यांचे त्यांनी शृंगारपुरात असताना वाचन केले होते. शाक्तपंथीय छांदोगामात्य कविकुलेश हा त्यांचा जिवलग मित्र होता. त्याच्याशी त्यांचा शास्वार्थ (वादविवाद) चालत असे. छत्रपती संभाजीराजे महाविद्वान आणि महापराक्रमी होते. छत्रपती शिवाजीराजांना संभाजीराजांच्या ज्ञानाचा, कार्याचा आणि सद्गुणांचा अभिमान वाटत असे.
वयोवृद्ध सैनिकांना ते सन्मानाने वागवत असत. शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी त्यांना दरबार भरविला. शिवाजीराजांनी संभाजीराजांना सिंहासनाजवळ बसण्याचा आग्रह केला असता संभाजीराजांनी शिवाजीराजांच्या पायावर डोके ठेवून वंदन केले व सिंहासनाजवळ न बसता दूर जाऊन बसले. ते सत्ताभिलाषी नव्हते. सत्तेसाठी काहीही करायचे, अशी त्यांची विचारसरणी नव्हती. राजकारणात राहून त्यांनी नीतिमूल्यांचे पालन केले. सावत्र मातांना अत्यंत सन्मानाने सांभाळले. सोयराबाईंना ते स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माता, असे संबोधत असत. सावत्र बंधू राजाराम महाराजांना त्यांनी जिवापाड जपले. परंतु स्वराज्यद्रोह्यांना त्यांनी कठोर शिक्षा केली. ते जसे कनवाळू होते, तसेच ते कर्तव्यकठोर होते.
कडवा प्रतिकार
शिवाजीराजांना मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाचा त्यांनी कडवा प्रतिकार केला. बुन्हाणपुरावर आक्रमण करून त्यांनी मोगलांशी झुंज दिली. जंजिरा, गोवा, कर्नाटक जिंकण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. अखंडपणे ते लढत होते. औरंगजेब हा त्या काळातील जगातील सर्वात मोठा सम्राट होता. त्याचा वार्षिक महसूल सुमारे पन्नास कोटी आणि सुमारे आठ लाखाचे सैन्य होते. तर संभाजीराजांचा वार्षिक महसूल सुमारे एक कोटी आणि सुमारे एक लाख सैन्य होते, तसेच औरंगजेब हा पाताळयंत्री, क्रूर असा बादशहा होता. त्याला संभाजीरांनी सुमारे नऊ वर्षे सळो की पळो करून सोडले. त्याने जंग जंग पछाडले, परंतु शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य त्याला नेस्तनाबूत करता आले नाही. त्याचे कारण संभाजीराजांनी प्रतिकूल काळात दिलेला निर्णायक लढा होय. संभाजीराजे स्वतः सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मोगलांविरुद्ध लढले. छत्रपती संभाजीराजांच्या पराक्रमाचे वर्णन करताना मोगलांचा दरबारी इतिहासकार खाफीखान म्हणतो, "संभाजी हे मोगलांसाठी वडिलांपेक्षा (शिवरायांपक्षा) दहापटीने तापदायक होते. शिवाजीराजांनी जसा मोगलांविरुद्ध रणसंग्राम केला, त्यापेक्षा दहा पटीने संभाजीराजांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले, जैसे समकालीन मोगल इतिहासकार काफीखान लिहितो.
या सर्व रणसंग्रामात संभाजीराजांनी प्रजेला न्याय दिला, दुष्काळग्रस्तांना मदत केली. भाषा, धर्म आणि संस्कृतीचे रक्षण केले. महिलांचा आदर, सन्मान आणि सुरक्षितता दिली. शिवाजीराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यरक्षणासावी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. औरंगजेबातें त्यांना पकडून हाल हाल करून मारले. त्याने सुमारे ३९ दिवस संभाजीराजांचा छळ केला. परंतु संधामीराजे त्याला शरण गेले नाहीत. त्यांनी आपली निष्ठा आणि स्वाभिमान अभंग ठेवला. मरण पत्करले, पण ते औरंगजेबाला शरण गेले नाहीत. छत्रपती संभाजीराजांच्या समर्पणाला, निष्ठेला आणि वलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. मृत्यूसमयी ते केवळ बत्तीस वर्षे वयाचे होते. त्यांना आणखी आयुष्य मिळाले असते तर दिल्ली जिंकण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. त्यांच्या बलिदानाने शिवस्वराज्य अजरामर झाले.