स्वातंत्र्यासाठी शब्दांची शस्त्रे परजणारे शायर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जाहिद खान

मजाज यांचा काळ हा देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ होता. ब्रिटिश सरकारची साम्राज्यवादी धोरणे आणि सरंजामशाही व्यवस्थेमुळे देशातील प्रत्येक नागरिक त्रस्त होता. मजाज यांची 'आवारा' ही कविता संपूर्ण पिढीच्या अस्वस्थतेची कविता बनली. 

'आवारा'वर बारकाईने नजर टाकल्यास, या कवितेतील प्रतिमा आणि काव्यात्मकता दोन्ही रोमँटिक आहेत, परंतु त्यात विरोध आणि बंडखोरीचे सूरही आहेत. यामुळेच ही कविता तरुणांची आवडती बनली. आजही ही कविता तरुणांना तितकीच आकर्षित करते.

शहर की रात और मैं नाशाद ओ नाकारा फिरूँ
जगमगाती जागती सड़कों पे आवारा फिरूँ।

(अर्थ: शहराची रात्र आहे आणि मी दुःखी व निरुपयोगी भटकत आहे, या झगमगत्या आणि जाग्या रस्त्यांवर मी 'आवारा' फिरत आहे.)

'आवारा' कवितेने केवळ त्या काळातील तरुण पिढीलाच वेड लावले नाही, तर मजाज यांचे सहकारी कवीही या कवितेची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांचे जिवलग मित्र अली सरदार जाफरी यांनी लिहिले आहे, "ही कविता तरुणांचा जाहीरनामा होती आणि 'आवारा' हे पात्र उर्दू शायरीमध्ये बंडखोरी आणि स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून उदयास आले आहे." विश्वास बसत नसेल, तर कवितेच्या या ओळी स्वतःच पाहा—

ले के इक चंगेज़ के हाथों से ख़ंजर तोड़ दूँ
ताज पर उस के दमकता है जो पत्थर तोड़ दूँ।

(अर्थ: एखाद्या चंगेज खानाच्या हातातून खंजीर घेऊन तो तोडून टाकावा आणि त्याच्या मुकुटावर जो दगड चमकतो आहे, तोही फोडून टाकावा, अशी इच्छा आहे.)

या कवितेव्यतिरिक्त मजाज यांच्या 'शहर-ए-निगार', 'एतिराफ़' इत्यादी कविताही अप्रतिम आहेत. विशेषतः जेव्हा ते आपल्या 'नौ-जवान से' या कवितेत तरुणांना संबोधित करताना म्हणतात:

जलाल-ए-आतिश-ओ-बर्क़-ओ-सहाब पैदा कर
अजल भी काँप उठे वो शबाब पैदा कर
तू इंक़लाब की आमद का इंतिज़ार न कर
जो हो सके तो अभी इंक़लाब पैदा कर।

(अर्थ: तू अग्नी, वीज आणि ढगांचा प्रकोप निर्माण कर, मृत्यूही हादरेल असे तारुण्य निर्माण कर. तू क्रांतीच्या आगमनाची वाट पाहू नकोस, शक्य असेल तर आत्ताच क्रांती घडवून आण.)

तेव्हा ही कविता, तरुणांमध्ये एक जोश, एक नवीन भावना निर्माण करत असे. त्यांच्यात आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची भावना जागृत होत असे. ते आपल्या देशावर प्राण अर्पण करण्यास तयार होत असत. 

मजाज इंग्रजी साम्राज्यवाद आणि देशी सरंजामशाही या दोन्हींना आपले शत्रू मानत होते. त्यांच्या मते, या दोन्हींनी मानवतेला समान नुकसान पोहोचवले आहे. मजाज यांनी आपल्या कवितांमधून इंग्रजी सरकारच्या प्रत्येक प्रकारच्या जुलूम आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला-

बोल! अरी ओ धरती बोल!
राज सिंघासन डाँवाडोल।

(अर्थ: बोल! हे धरतीमाते बोल! राजाचे सिंहासन डळमळीत होत आहे.)

कैफी आझमी

शायर आणि गीतकार कैफी आझमी यांना कोण नाही ओळखत. त्यांनीही आपल्या साहित्याच्या माध्यमातून माणसाचे हक्क आणि न्यायासाठी मोठा लढा दिला. देशाच्या सामायिक संस्कृतीला लोकांपर्यंत पोहोचवले. आपल्या कवितांमधून त्यांनी विरोधाचा आवाज बुलंद केला. 

कैफी आझमी जेव्हा शेतकरी आणि कामगारांच्या सभांमध्ये आपली कविता वाचत, तेव्हा लोक आंदोलित होत असत. विशेषतः जेव्हा ते आपली दीडशे ओळींची मस्नवी (दीर्घ कविता) ‘खानाजंगी’ (गृहयुद्ध) ऐकवत, तेव्हा हजारो लोकांचा जमाव श्वास रोखून ऐकत असे.

कैफी आझमी यांनी ब्रिटिश साम्राज्यवाद, सरंजामशाही, भांडवलशाही आणि सांप्रदायिकतेविरोधात जोरदार लिहिले. स्वातंत्र्याच्या चळवळीदरम्यान भूमिगत राहिलेल्या कैफी यांनी साम्राज्यवादचा उघड विरोध केला. ‘तरबियत‘ (प्रशिक्षण) शीर्षकाच्या कवितेत ते लिहितात:

लुटने वाला है दम भर में हुकूमत का सुहाग
लगनी ही वाली है जेलों, दफ़्तरों, थानों में आग
मिटने ही वाला है ख़ूॅं—आशाम देवज़र का राज
आने ही वाला है ठोकर में उलट कर सर से ताज।

(अर्थ: काही क्षणांतच या सरकारचे सौभाग्य लुटले जाणार आहे, तुरुंग, कार्यालये आणि पोलीस ठाण्यांना आग लागणारच आहे. रक्तपिपासू राक्षसाचे (सोन्याच्या देवाचे) राज्य मिटणारच आहे, आणि डोक्यावरील मुकुट ठोकर लागून उलटणारच आहे.)

कैफी आझमी यांनी आपल्या शायरीची सुरुवात रोमँटिक गझलांमधून केली, पण नंतर ते पूर्णपणे कवितांकडे वळले. देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत त्यांनी देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या क्रांतिकारी कविता लिहिल्या. त्याबदल्यात त्यांना अनेक निर्बंध आणि त्रास सहन करावा लागला. पण त्यांनी आपले बंडखोर विचार बदलले नाहीत.

मजरूह सुलतानपुरी

मजरूह सुलतानपुरी मुशायऱ्यांमधील यशस्वी कवी होते. त्यांचा आवाज गोड असल्यामुळे, जेव्हा ते आपल्या गझल सुरात सादर करत, तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होत असत. मजरूह यांच्या अनेक गझलांमध्ये त्यांनी सामाजिक आणि राजकीय विषयांना यशस्वीपणे मांडले आहे. त्यात त्यांचे बंडखोर विचार स्पष्ट दिसतात. स्वातंत्र्याच्या चळवळीत या गझला घोषणांप्रमाणे वापरल्या गेल्या.

सितम को सर-निगूॅं, जालिम को रुसवा हम भी देखेंगे
चल ऐ अज़्म—ए—बग़ावत चल, तमाशा हम भी देखेंगे।

(अर्थ: अत्याचाराला मान खाली घालायला लावणारे आणि जुलमीला अपमानित करणारे दृश्य आम्हीही पाहू. हे बंडखोरीच्या निर्धारा, चल पुढे, हा तमाशा आम्हीही पाहणार आहोत.)

मजरूह सुलतानपुरी यांच्या सुरुवातीच्या गझलांवर स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा स्पष्ट प्रभाव दिसतो. या गझला थेट जनतेला संबोधित करून लिहिल्या आहेत.

आह—ए-जां-सोज़ की महरूमी-ए-तासीर न देख
हो ही जाएगी कोई जीने की तद्बीर न देख
देख ज़िंदॉं से परे, रंग—ए-चमन, जोश—ए-बहार
रक्स करना है तो फिर पांव की ज़ंजीर न देख।

(अर्थ: हृदय जाळणाऱ्या आक्रोशाचा प्रभाव पडत नाही म्हणून निराश होऊ नकोस, जगण्याचा काहीतरी मार्ग निघेलच, फक्त बघत राहा. तुरुंगाच्या पलीकडे बघ, बागेचे रंग आणि वसंताचा उत्साह बघ. जर नाचायचे असेल, तर पायांतील साखळ्यांकडे पाहू नकोस.)

सार्वजनिक मुशायऱ्यांमध्ये जेव्हा प्रगतिशील कवी अशा प्रकारच्या गझला आणि कविता वाचत, तेव्हा संपूर्ण वातावरण देशाच्या प्रेमाने भारून जात असे. अप्रत्यक्षपणे, हे मुशायरे जनतेला जागृत करण्याचे काम करत होते. शायरी त्यांच्यावर खोलवर परिणाम करत असे.

तक़दीर का शिकवा बेमानी, जीना ही तुझे मंज़ूर नहीं
आप अपना मुक़द्दर बन न सके, इतना तो कोई मजबूर नहीं।

(अर्थ: नशिबाची तक्रार करणे व्यर्थ आहे, जणू तुला जगायचेच नाही. तू स्वतःचे नशीब घडवू शकला नाहीस, इतका तर कोणीही लाचार नसतो.)

मोठ्या संघर्षानंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा मजरूह सुलतानपुरी यांनी या स्वातंत्र्याचे स्वागत करताना लिहिले:

अहद—ए-इंक़लाब आया, दौर—ए-आफ़ताब आया
मुन्तज़िर थीं ये आंखें जिसकी एक ज़माने से।

(अर्थ: क्रांतीचे युग आले, सूर्याचे (प्रगतीचे) युग आले, ज्याची हे डोळे अनेक काळापासून वाट पाहत होते.)

साहिर लुधियानवी

साहिर लुधियानवी यांचा सुरुवातीचा काळ देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ होता. देशातील सर्व लेखक, कलाकार आणि संस्कृतिकर्मी आपल्या रचनांमधून स्वातंत्र्याची ज्योत पेटवत होते. साहिरही आपल्या शायरीतून हेच काम करत होते. त्यांच्या अनेक गझला लोकांना इंग्रजी सरकारविरोधात उभे राहण्याचे आवाहन करतात. एका गझलमध्ये ते म्हणतात:

सरकश बने हैं गीत बग़ावत के गाये हैं
बरसों नए निज़ाम के नक़्शे बनाये हैं।

(अर्थ: आम्ही बंडखोर बनलो आहोत, आम्ही बंडाची गाणी गायली आहेत. आम्ही अनेक वर्षे नव्या व्यवस्थेची स्वप्ने रंगवली आहेत.)

साहिर लुधियानवी यांच्या सुरुवातीच्या कविता पाहिल्यास, इतर क्रांतिकारी कवींप्रमाणेच त्यांच्या कवितांमध्येही ब्रिटिश सरकारविरोधात एक राग, एक आग आहे. साहिर यांच्या अनेक कविता त्या काळी देशभक्त तरुणांना आंदोलित करत होत्या. तरुण या कविता गात असताना अटक होत असत.

तुमने जिस ख़ून को मक़्तल में दबाना चाहा
आज वह कूचा-ओ-बाज़ार में आ निकला है।

(अर्थ: ज्या रक्ताला तुम्ही वधस्तंभावर दाबून टाकू इच्छित होता, तेच रक्त आज गल्ली आणि बाजारात उतरले आहे.)

गुलाम हिंदुस्थानात एकीकडे क्रांतिकारक आपल्या सशस्त्र कारवायांनी क्रांतीची ज्योत पेटवत होते, तर दुसरीकडे पत्रकार, कथाकार आणि कवी या क्रांतिकारी कार्यांना वैचारिक धार देत होते. 

इंग्रज सरकारच्या लाखो दडपशाही आणि निर्बंधांनंतरही, त्यांनी आपली शस्त्रे (लेखणी) सोडली नाहीत. जेवढे निर्बंध लादले जात, तेवढेच त्यांचे लेखन अधिक धारदार आणि प्रखर होत असे. आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची भावना अशी होती की ते प्रत्येक धोका पत्करण्यास तयार होते. साहिर आपल्या एका गझलमध्ये लिहितात:

लब पे पाबन्दी तो है, एहसास पर पहरा तो है
फिर भी अहल—ए-दिल को एहवाल—ए-बशर कहना तो है।

(अर्थ: ओठांवर बंदी आहे, भावनांवर पहारा आहे, तरीही, सहृदयी लोकांना माणसाची व्यथा सांगावीच लागेल.)
 
लेखकाबद्दल:

भारतीय साहित्यातील प्रगतिशील चळवळीवर लेखक, पत्रकार जाहिद खान यांचे विस्तृत कार्य आहे. या चळवळीशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांवर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘तरक्कीपसंद तहरीक के हमसफर’, ‘तरक्कीपसंद तहरीक की रहगुजर’, ‘तहरीक-ए-आझादी और तरक्कीपसंद शायर’ आणि ‘आधी आबादी अधूरा सफर’ ही त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत. 

जाहिद खान यांनी कृश्न चंदर यांच्या 'पौदे' या ऐतिहासिक रिपोर्ताजचे, अली सरदार जाफरी यांच्या 'यह किसका खून है' या नाटकाचे आणि हमीद अख्तर यांच्या 'रूदाद-ए-अंजुमन' या पुस्तकाचे उर्दूमधून हिंदीत लिप्यंतरण केले आहे. इतकेच नाही, तर ‘शैलेन्द्र हर जोर-जुल्म की टक्कर में’ आणि ‘बलराज साहनी एक समर्पित और सृजनात्मक जीवन’ या पुस्तकांचे संपादनही त्यांच्या नावावर आहे.

लैंगिक संवेदनशीलतेवरील उत्कृष्ट लेखनासाठी ‘पॉपुलेशन फर्स्ट’ संस्थेने जाहिद खान यांना सहा वेळा ‘लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा प्रादेशिक पुरस्कार आणि २०१८मध्ये ‘साउथ एशिया लाडली मीडिया अँड ॲडव्हर्टायझिंग अवॉर्ड फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी’ हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. 

त्यांचे चर्चित 'तरक्कीपसंद तहरीक के हमसफर' हे पुस्तक मराठी आणि उर्दू भाषेत अनुवादित होऊन प्रकाशित झाली आहे. या पुस्तकासाठी त्यांना ‘मध्य प्रदेश हिंदी साहित्य संमेलन’ च्या प्रतिष्ठित ‘वागीश्वरी पुरस्कारा’नेही सन्मानित करण्यात आले आहे. संपर्कासाठी त्यांचा ईमेल ॲड्रेस आहे- [email protected]
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter