मुंबई / बेंगळुरू
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या त्याच्या दिग्दर्शकीय पदार्पणामुळे चर्चेत आहे. त्याची पहिली वेब सीरिज 'द बॅस्टर्ड्स ऑफ बॉलिवूड' नुकतीच प्रदर्शित झाली असून, तिला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सीरिजच्या निमित्ताने आर्यनने एक रंजक खुलासा केला आहे. या शोमध्ये सलमान खानच्या एका संवादासाठी खुद्द आर्यननेच डबिंग केले आहे.
'जीक्यू इंडिया'ला दिलेल्या एका मुलाखतीत आर्यनने सांगितले की, तो लोकांची हुबेहूब नक्कल करू शकतो. तो म्हणाला, "एक गंमत सांगतो (Fun fact), शोमध्ये जेव्हा सलमान खान म्हणतो, 'व्हॉट पार्टी? बुलशिट पार्टी,' तेव्हा तो आवाज खरं तर माझा आहे!" आर्यनच्या या खुलाशामुळे चाहते थक्क झाले आहेत.
वडिलांना दिग्दर्शित करणे सोपे की कठीण?
या सीरिजमध्ये शाहरुख खानचीही एक झलक पाहायला मिळते. आपल्याच वडिलांना दिग्दर्शित करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना आर्यन म्हणाला, "ते काम करायला जगातील सर्वात सोपी व्यक्ती आहेत. त्यांना नेमके माहित असते की काय करायचे आहे आणि ते कसे करायचे आहे."
आर्यनने पुढे सांगितले की, "जेव्हा ते (शाहरुख) सेटवर असतात, तेव्हा इतर सर्वजण आपोआप शिस्तीत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने वागू लागतात."
या शोमध्ये बॉबी देओल, लक्ष्य, राघव जुयाल, मोना सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच करण जोहर, रणवीर सिंग, आमिर खान, रणबीर कपूर आणि इम्रान हाश्मी यांसारख्या अनेक बड्या कलाकारांनी यात पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली आहे.
दुसरीकडे वाढल्या अडचणी
एकीकडे आर्यनच्या कामाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे तो एका नवीन वादात अडकला आहे. २८ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील एका पबमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी त्याच्याविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
आर्यनने पबमध्ये गर्दीच्या दिशेने बघून मधले बोट दाखवून अश्लील हावभाव केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता.
सँकी रोडचे रहिवासी असलेले वकील ओवेस हुसेन एस. यांनी पोलीस महासंचालक, बेंगळुरू पोलीस आयुक्त आणि कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी आर्यन खानवर एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.