नवी दिल्ली
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने संगीतकार आणि गायक पलाश मुच्छल याच्यासोबतचे तिचे लग्न मोडल्याची घोषणा केली आहे. स्मृतीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक अधिकृत निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली. तिने चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली आहे की, या कठीण काळात तिला आणि तिच्या कुटुंबाला "गोपनीयता आणि स्वतःला सावरण्यासाठी वेळ" देण्यात यावा.
पलाश मुच्छल याने देखील इन्स्टाग्राम स्टोरीवर निवेदन देऊन लग्न रद्द झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काय म्हणाली स्मृती मानधना?
सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना स्मृती म्हणाली, "गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबद्दल अनेक चर्चा आणि अंदाज वर्तवले जात आहेत. मला वाटते की या वेळी मी बोलणे महत्त्वाचे आहे. मी खूप खाजगी व्यक्ती आहे आणि मला तसेच राहायला आवडेल. पण मला हे स्पष्ट करणे गरजेचे वाटते की, लग्न रद्द करण्यात आले आहे."
ती पुढे म्हणाली, "मला हा विषय इथेच संपवायचा आहे आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करते की तुम्हीही तसेच करावे. कृपया यावेळी दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी थोडा वेळ द्या."
"देशासाठी खेळणे हेच ध्येय"
भविष्यातील आपल्या वाटचालीबद्दल सांगताना स्मृती म्हणाली की, तिचे संपूर्ण लक्ष भारतासाठी खेळणे आणि जिंकणे यावरच असेल. "माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांना चालवणारा एक मोठा उद्देश असतो आणि माझ्यासाठी तो उद्देश नेहमीच माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे हा राहिला आहे. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत खेळत राहणे आणि भारतासाठी ट्रॉफी जिंकणे हेच माझे ध्येय असेल आणि माझे लक्ष कायम तिथेच असेल. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे," असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वडिलांचे आजारपण आणि अफवा
भारताने नुकताच महिला विश्वचषक जिंकला होता, त्या आनंदात स्मृती आणि पलाशचे लग्न हा एक मोठा सोहळा असणार होता. मात्र, स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने लग्नाचे विधी थांबवण्यात आले होते.
त्यानंतर सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. पलाश मुच्छलवर फसवणुकीचे आरोपही करण्यात आले होते. मात्र, पलाशच्या कुटुंबाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संगीतकाराबद्दल पसरवल्या जाणाऱ्या बातम्या बिनबुडाच्या आणि बदनामीकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या सर्व घडामोडींनंतर, स्मृती मानधना आणि तिच्या टीम इंडियाच्या मैत्रिणींनी, ज्या लग् समारंभाला उपस्थित होत्या, त्यांनी सोशल मीडियावरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो काढून टाकले आहेत.