नवी दिल्ली
इंडिगो एअरलाईन्सची सेवा कोलमडल्याने प्रवाशांचे जे हाल झाले, त्यामागे व्यवस्थापनाचा मोठा हलगर्जीपणा आणि चुकीची रणनीती असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेली ४ सदस्यांची समिती आता एका गंभीर प्रश्नाचा तपास करत आहे: "इंडिगोने नवीन नियमांची तयारी करण्याऐवजी ऑक्टोबर अखेरपर्यंत ते नियम टाळण्यासाठी किंवा सवलती मिळवण्यासाठी वेळ वाया घालवला का?"
वैमानिकांच्या ड्युटीच्या वेळा निश्चित करणारे नवीन 'फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन' (FDTL) नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार होते. पण इंडिगोने तयारी करण्याऐवजी 'लॉबिंग' करण्यातच वेळ घालवला का, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नेमका तपास कशाचा होणार?
सरकारची समिती खालील मुद्द्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार आहे:
१. लॉबिंगमध्ये वेळ गेला? ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत इंडिगो व्यवस्थापन DGCA कडे नवीन नियमांतून सूट मिळवण्यासाठी किंवा मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते का? विशेषतः वैमानिकांच्या 'नाईट लँडिंग'च्या संख्येवर मर्यादा घालणाऱ्या कलमांबद्दल त्यांची चर्चा सुरू होती का?
२. सॉफ्टवेअर अपडेट नाही: नियमांच्या अंमलबजावणीबद्दल साशंकता असल्याने इंडिगोने बोईंगच्या मालकीचे 'झेपसेन' (Jeppesen) हे क्रू रोस्टरिंग सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही, असा संशय आहे. जर हे खरे असेल, तर सॉफ्टवेअर जुन्या पद्धतीवर आणि नियम नवीन, अशा विसंगतीमुळे हा गोंधळ उडाला असण्याची शक्यता आहे.
३. मुद्दाम ड्युटी लावली नाही? एअरलाईन्सने वैमानिक आणि क्रू मेंबर्सना मुद्दाम ड्युटी दिली नाही (willfully didn't assign duty), अशाही काही तक्रारी आहेत.
DGCA अधिकारीही रडारवर
केवळ इंडिगोच नाही, तर विमान वाहतूक नियामक 'DGCA' ची भूमिकाही संशयास्पद आहे. हायकोर्टाने नवीन FDTL नियम लागू करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, DGCA च्या अधिकाऱ्यांनी ऑक्टोबरपर्यंत इंडिगोच्या विनंत्या आणि सादरीकरणे (representations) का ऐकून घेतली? जेव्हा इतर प्रतिस्पर्धी एअरलाईन्स आपल्या तयारीचा अहवाल देत होत्या, तेव्हा इंडिगोने अहवाल न देऊनही त्यांच्यावर कारवाई का झाली नाही, हे देखील तपासले जाणार आहे.
रोस्टरचा सावळागोंधळ
एरवी इंडिगो दर महिन्याच्या २५ तारखेला पुढील महिन्याचे वैमानिकांचे वेळापत्रक (Roster) जाहीर करते. पण नोव्हेंबरमध्ये हा नियम मोडला गेला. २९ ऑक्टोबरला अर्ध्या महिन्याचे आणि त्यानंतर १३-१४ नोव्हेंबरला उरलेल्या महिन्याचे रोस्टर काढले गेले. डिसेंबरमध्येही तसेच झाले.
सध्याचे संकट निभावण्यासाठी कंपनी 'शॉर्ट-टर्म रोस्टर्स' जारी करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विमाने उडवता येतील. जोपर्यंत नवीन FDTL नियमांना १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगिती मिळत नाही किंवा परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत हा 'जुगाड' सुरू राहण्याची शक्यता आहे.