भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने संसदेच्या दोन्ही सभागृहात एका विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, ८ डिसेंबरपासून लोकसभेत या ऐतिहासिक विषयावर सविस्तर चर्चा सुरू होईल. या विशेष सत्राची सुरुवात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२ वाजता लोकसभेत 'वंदे मातरम'वरील चर्चेला औपचारिक सुरुवात होईल. पंतप्रधान मोदी या चर्चेचा श्रीगणेशा करतील. तर, चर्चेचा समारोप संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने होईल.
या ऐतिहासिक विषयावरील चर्चेसाठी एकूण १० तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला (भाजप) आपली बाजू मांडण्यासाठी ३ तासांचा वेळ देण्यात आला आहे.
राज्यसभेत मंगळवारी चर्चा
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही यावर चर्चा होणार आहे. मंगळवारी (९ डिसेंबर) वरिष्ठ सभागृहात या विषयावर चर्चा होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत या चर्चेची सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे. 'वंदे मातरम'चा वारसा आणि त्याच्या १५० वर्षांच्या प्रवासाचे स्मरण करण्यासाठी संसदेने हे विशेष सत्र आयोजित केले आहे.
किरेन रिजिजू यांची माहिती
तत्पूर्वी, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्वपक्षीय बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांनी लिहिले, "लोकसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत असा निर्णय घेण्यात आला आहे की, सोमवारी ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता लोकसभेत राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम'च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त चर्चा होईल. तसेच, मंगळवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता निवडणूक सुधारणांवर चर्चा केली जाईल."