नवी दिल्ली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाची घडामोडी घडली आहे. अमेरिकेच्या 'राजकीय घडामोडींच्या उपपरराष्ट्र मंत्री' ॲलिसन हुकर रविवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत.
या दौऱ्यात त्या नवी दिल्ली आणि बंगळुरूला भेट देणार आहेत. ॲलिसन हुकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांच्या बैठका होणार आहेत.
दौऱ्याचा उद्देश काय?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, "उपसचिव हुकर यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश अमेरिका-भारत धोरणात्मक भागीदारी पुढे नेणे हा आहे. तसेच आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक घट्ट करणे, अमेरिकन निर्यातीत वाढ करणे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व अंतराळ संशोधन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये सहयोग वाढवणे यावर भर दिला जाईल."
दिल्लीत महत्त्वाच्या चर्चा
नवी दिल्लीतील वास्तव्यादरम्यान, उपसचिव हुकर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत परराष्ट्र कार्यालयाच्या चर्चासत्रात सहभागी होतील.
अधिकृत घोषणेनुसार, त्यांच्या चर्चेत प्रादेशिक सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील 'सामायिक प्राधान्यक्रम' यांचा समावेश असेल. श्रीमती हुकर यांनी या वर्षाच्या सुरुवातीला उपसचिवपदाचा कार्यभार स्वीकारला होता. तेव्हापासून त्यांनी या क्षेत्रातील अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत.
'क्वाड'बाबत अनिश्चितता
२०२५ मध्ये भारताने 'क्वाड' (Quad) शिखर परिषदेचे आयोजन करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप या परिषदेचे वेळापत्रक ठरलेले नाही आणि त्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
बंगळुरू आणि इस्रो भेट
बंगळुरूमध्ये, श्रीमती हुकर 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थे'ला (ISRO) भेट देतील. तसेच भारताच्या अंतराळ, ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींची त्या भेट घेणार आहेत.
"अमेरिका-भारत संशोधन भागीदारीमध्ये नावीन्यतेला (Innovation) प्रोत्साहन देणे आणि सहकार्याच्या वाढीव संधी शोधणे," हे या भेटीचे उद्दिष्ट असल्याचे अधिकृत घोषणेत म्हटले आहे.
टॅरिफ आणि रशिया कनेक्शन
परराष्ट्र कार्यालयाची ही चर्चा अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेने भारतावर दंड स्वरूपातील टॅरिफ (Penalty Tariffs) सुरूच ठेवले आहेत. भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी केल्यामुळे अमेरिकेने हे पाऊल उचलले होते.
ताज्या वृत्तानुसार, भारताने रशियन ऊर्जेची खरेदी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. तरीही रशियासोबतचे संबंध सुरळीत आहेत. ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियासोबतच्या द्विपक्षीय संबंधांचे वर्णन 'ध्रुव ताऱ्या'सारखे महत्त्वाचे असल्याचे केले होते.