भक्ती चाळक
स्वप्न पूर्ण करायला पैशांची नाही तर जिद्दीची गरज असते, हे परभणीच्या एका ३३ वर्षीय तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. सर्वसामान्य मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या झीनत परवीन मोहम्मद अख्तर यांनी थेट दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित 'पुसान नॅशनल युनिव्हर्सिटी'मध्ये पोस्ट डॉक्टरेटसाठी स्थान मिळवले आहे. २५ डिसेंबरला त्या आपल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेणार आहेत.
उर्दू माध्यम ते विद्यापीठात प्रथम
झीनत परवीन यांचे मूळ गाव परभणी. त्यांचे १०वी पर्यंतचे शिक्षण फातिमा हायस्कूल या उर्दू माध्यमाच्या शाळेत झाले. इंग्रजी माध्यमाचे वलय नसतानाही त्यांनी विज्ञानाची आवड जोपासली. ११वी आणि १२वी सायन्स पूर्ण केल्यानंतर त्यांना एसजीजीएस (SGGS) या नामांकित ऑटोनॉमस कॉलेजमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळाला. मात्र घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्यांना त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणे शक्य झाले नाही.
या कठीण प्रसंगाने खचून न जाता त्यांनी परभणीच्याच डीएसएम कॉलेजमध्ये बी.एस्सी. ला प्रवेश घेतला. विशेष म्हणजे स्वतःच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी त्यांनी बी.एस्सी. आणि एम.एस्सी. करत असताना प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी केली. अभ्यास आणि नोकरीची कसरत करत त्यांनी एम.एस्सी. मध्ये विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवत ‘सुवर्णपदक’ पटकावले.
'मुलीचे लग्न करू नका, तिला शिकू द्या'
एम.एस्सी. मध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतर झीनत यांच्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. डीएसएम कॉलेजचे प्राध्यापक सरोदे सर आणि पडसकर सर यांनी त्यांच्या वडिलांना, चुलत्यांना आणि मामांना बोलावून घेतले. त्यांनी निक्षून सांगितले की, “मुलीचे लग्न करून आताच तिला अडकवू नका. तिच्यात क्षमता आहे, तिला पुढे शिकू द्या.”
.jpg)
झिनत परवीन यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व संचालक डॉ. राजाराम माने
शिक्षकांच्या या आग्रहामुळे पालकांनी लग्नाचा विचार बाजूला सारून झीनत पीएच.डी.साठी प्रोत्साहित केले. केंद्र सरकारची 'डीएसटी इन्स्पायर फेलोशिप' मिळाल्यानंतर त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात प्रा. आर.एस. माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन सुरू केले.
झीनत यांनी 'ऊर्जा क्षेत्र' आणि 'सुपर कॅपॅसिटर' या विषयावर काम केले. यात बिस्मथ ऑक्साईड, मँगनीज ऑक्साईड आणि अँटीमनी ऑक्साईड यांसारख्या मेटल ऑक्साईड्सचे नॅनो कंपोजिट बनवून डिव्हाइस तयार करण्यावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
कौटुंबिक संघर्ष
झीनत यांचे एकत्र कुटुंब पद्धतीचे आहे. त्यांचे वडील परभणीतील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांनी काम थांबवले. कुटुंबाचा गाडा आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांचे चुलते मोहम्मद अक्रम यांनी उचलली. ते ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहेत.
झीनत सांगतात, “चाचांचीच जिद्द होती की मी माझ्या सगळ्या मुलांना शिकवीन. आणि आमच्या चाचांनीच आम्हाला शिकवलं आहे. जसं पप्पा शिकवतात, तसं आमचं सगळं चाचांनीच केलं आहे. ते आम्हाला घरात अभ्यासाला घेऊन बसायचे. त्या काळी काही ट्युशन वगैरे नव्हतं. घरातच आमच्या चाचांनी आम्हाला शिकवलं. त्यामुळेच ११ वी-१२ वीत आम्हाला कधीच क्लासची गरज भासली नाही."
झीनत यांची इतर भावंडे देखील उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांचा एक भाऊ सर्जन डॉक्टर आहे, तर दुसऱ्याचे स्वतःचे मेडिकल आहे. त्यांची चुलत बहीण निखत परवीन हिने पहिल्याच प्रयत्नात TET परीक्षा पास करून शिक्षिकेची नोकरी मिळवली. त्यांची एक बहिण इस्लामिक अभ्यासाकडे वळाली. तिने आलिमा कोर्स पूर्ण करून आता ती आलिमा आहे. कुटुंबातील आणखी एक मुलगी एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहे. हे यश मुस्लिम समाजातील मुलींच्या शिक्षणाबाबतचे गैरसमज दूर करणारे आहे.
.jpg)
डावीकडून झीनत यांचे चुलते मोहम्मद अकरम आणि वडील मोहम्मद अख्तर
समाजातून दबाव परंतु, कुटुंबाचा पाठींबा
झीनत यांच्या या प्रवासात त्यांना कुटुंबातून पूर्ण आधार मिळाला. परंतु समाजातून त्यांना टीकेचा सामना करावा लागला. याविषयी त्या सांगतात, “आमच्या शिक्षणावेळी आमचे खूप सारे नातेवाईक आमच्या चाचांना, पप्पांना म्हटले होते की, तुम्ही पोरीला शिकवून-सवरून तीचं नशीब काळं करत आहात. हिचं वय झालंय लग्न करून द्या. अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण समाजातून येत असलेला तो दबाव आमच्या आई-वडिलांनी सहन केला. आणि तरीही आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. त्यांचं एकच म्हणणं होतं तू शिक. तू जे काही करशील आम्ही तुझ्या सोबत आहोत. तू या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस.”
लग्नानंतर नवऱ्याचे सहकार्य
२०२३ सालात झीनत यांचा निकाह मामून राशीद यांच्यासोबत झाला. निकाहानंतरही त्यांचे शिक्षण थांबले नाही. त्यांना कुटुंबाप्रमाणेच पाठींबा देणारा जोडीदार मिळाला. त्या सांगतात, “जसे आमचे पप्पा आणि चाचांनी शिक्षणासाठी मला सपोर्ट केला, तसेच माझे पती सुद्धा मला खूप सपोर्ट करतात. ते नेहमी मला प्रोत्साहन देत असतात. त्यांच्याकडून मला कधीच कोणतंच बंधन आलं नाही. पोस्ट डॉक्टरेटसाठी मी खूपदा इंटरव्ह्यू दिले होते, पण निकाल पॉझिटिव्ह येत नव्हता, तेव्हा तेच मला मोटिव्हेट करायचे. आणि आत्ता सुद्धा मी साऊथ कोरियासाठी एकटीच जाणार आहे आणि ते मला नंतर तिथे जॉईन करणार आहेत.”
त्या पुढे म्हणतात, “कोणतीही परिस्थितीत ते माझ्या सोबत असतात आणि माझ्यापेक्षाही जास्त ऍक्टिव्ह असतात. मला व्हिसाच्या मेडिकल चेकअपसाठी जायचं होतं, तेव्हा सुद्धा ते माझ्यासोबत आले होते. फॉर्म भरण्यापासून ते इंटरव्ह्यूपर्यंत ते प्रत्येकवेळी माझ्या सोबत राहिले.”
त्या भावूक स्वरात म्हणतात, “माझे पती 'फिजिक्स वाला' आयआयटी लीड मॅनेजर आहेत. आता अगदी माझ्यासोबत कोरियाला जाण्यासाठी त्यांना इथली नोकरी सोडावी लागणार आहे. तर ते त्याबद्दल सुद्धा सकारात्मक विचार करत आहेत. त्यांना फक्त याच गोष्टीचा आनंद आहे की, मला तिथे साऊथ कोरियामध्ये मोठी संधी मिळाली आहे. माझ्या पप्पा आणि चाचांनंतर ते माझ्यासाठी उभे राहिले आहेत. या गोष्टीसाठी अल्लाहचे जितके एहसान मानावे तितके कमी आहेत.”
.jpg)
झीनत परवीन आणि त्यांचे पती मामून राशीद
“आई-वडिलांचा विश्वास जपा”
आजच्या तरुण पिढीला, विशेषतः मुलींना संदेश देताना झीनत परवीन म्हणतात, “जेव्हा आई-वडील तुम्हाला विश्वासाने घराबाहेर शिक्षणासाठी पाठवतात, तेव्हा तो विश्वास सार्थ ठरवणे ही तुमची जबाबदारी असते. आजकाल मुले विविध लोभांमुळे भरकटत आहेत. अशा गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू नका.”
त्या पुढे म्हणतात, “एक स्वप्न ठरवा आणि त्याचा पाठलाग करा. परभणी ते कोरिया हा प्रवास माझ्यासाठीही एक स्वप्नच होते, पण ते सत्यात उतरले. पालकांचा पाठिंबा असेल तर मुली काहीही करू शकतात, फक्त तुम्ही तो पाठिंबा गमावू नका.”
दक्षिण कोरियाचा प्रवास
पीएच.डी. करत असतानाच प्रा. माने यांनी त्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी प्रोत्साहित केले. दक्षिण कोरियातील पुसान नॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक किम यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे. ही निवड प्रक्रिया अत्यंत कठीण होती.
झीनत यांनी केलेले संशोधन, नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले शोधनिबंध आणि त्याचा 'इम्पॅक्ट फॅक्टर' तपासल्यानंतर ऑनलाईन मुलाखत झाली. यात सादरीकरण आणि भविष्यातील योजनांवर चर्चा झाली. त्यानंतर त्यांची निवड निश्चित होऊन त्यांना कराराचे पत्र मिळाले आहे. येत्या २५ डिसेंबरला त्या दक्षिण कोरियासाठी रवाना होणार आहेत.
.jpg)
इस्लामची शिकवण आणि ईश्वराचे आभार
झीनत यांना मिळालेल्या यशानंतर ईश्वराचे आभार मानताना त्या म्हणतात, “ज्यांनी आम्हाला इतकं चांगलं आणि सुंदर आयुष्य दिलं आणि एक यशस्वी माणूस बनवलं, त्या आमच्या परवरदिगार अल्लाह तालाची खूप खूप ऋणी आहे.”
त्या पुढे म्हणतात, “अल्लाह तालानंतर मी माझे पप्पा, चुलते, आई आणि माझी चुलती या सर्वांचे मनापासून आभार मानते. त्यांनी आमचं अतिशय चांगलं पालनपोषण केलं आणि प्रत्येक पावलावर आम्हाला भक्कम साथ दिली. आणि माझी सर्व भावंडे माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगात माझ्या सोबत उभी होती. तसेच माझे सर्व शिक्षक आणि मित्रमंडळी मलाच नेहमीच प्रोत्साहन देत राहिले, त्यांचेही मनोमन आभार.”
इस्लामच्या शिकवणीविषयी त्या म्हणतात, “आपल्या सर्वांना इल्म (ज्ञान) प्राप्त करायचंय. मग तो मुलगा असो किंवा मुलगी हीच इस्लामची शिकवण आहे. तुम्हाला सर्वांना इल्म हासिल करायचंच आहे. प्यारे नबी (स.अ.व.) यांचा एक 'हदीस' (प्रेषितांचे वचन) आहे, 'तलबुल इल्मी फरिझतुन अला कुल्लि व मुस्लिमीन.' त्याचा अर्थ असा आहे की, ज्ञान' मिळवणे प्रत्येक मुसलमान पुरुष आणि स्त्रीवर फर्झ (बंधनकारक कर्तव्य) आहे.”
त्या पुढे म्हणतात, “आणि इल्म हासिल केल्यानंतर तुमची ही जबाबदारी आहे की, तुम्ही जे ज्ञान मिळवलंय ते तुम्ही इतरांपर्यंतही पोहोचवा. त्याचा स्वतःही फायदा घ्या आणि इतरांनाही त्याचा फायदा घेऊ द्या.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -