पत्रकार आणि लेखिका हिनाकौसर खान यांच्या 'इत्रनामा'ला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार!

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
महाराष्ट्र शासनाचा सन्मान स्विकारताना लेखिका हिनाकौसर खान
महाराष्ट्र शासनाचा सन्मान स्विकारताना लेखिका हिनाकौसर खान

 

भक्ती चाळक

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या २०२४ या वर्षातील स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली. या पुरस्कारांसाठी परीक्षण समितीने ३५ पात्र साहित्यिकांची निवड केली होती. त्यामध्ये यंदा कादंबरी प्रकारातील प्रतिष्ठेचा 'हरी नारायण आपटे पुरस्कार' लेखिका हिनाकौसर खान यांच्या 'इत्रनामा' या पहिल्याच कादंबरीला मिळाला आहे. एका अत्यंत वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या या कादंबरीच्या यशानंतर लेखिका हिनाकौसर खान यांनी 'आवाज-द-व्हॉईस'ला प्रतिक्रिया दिली.

पुरस्कारामुळे मिळाली नवी ऊर्जा

राज्य शासनाकडून कादंबरीसाठी 'हरी नारायण आपटे' हा पुरस्कार दिला जातो. २०२४ या वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांसाठी ही निवड करण्यात आली आहे. भाषा आणि संस्कृती विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून हे पुरस्कार दिले जातात. पहिल्याच कादंबरीला हा सर्वोच्च सन्मान मिळाल्याबद्दल हिनाकौसर खान यांनी मोठा आनंद व्यक्त केला. त्या म्हणतात, "पहिलीच कादंबरी असल्यामुळे राज्य शासनाचा हा पुरस्कार मिळाल्याचा खूप आनंद आहे. मला नेहमी वाटते, अशा गोष्टी एका मोठ्या प्रोत्साहनासारख्या असतात. एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते एक मोठे बळ असते. नव्याने लेखन करण्यासाठी यातून नवी ऊर्जा मिळते."

 
इत्रनामा : मानसिक संघर्षाची वेगळी प्रेमकथा

इत्रनामा या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राबद्दल बोलताना त्यांनी अनेक पैलू उलगडले. ही एक प्रेमकथा असली तरी तिला आजच्या काळातील एक भक्कम सामाजिक पार्श्वभूमी आहे. सुमित आणि नाझिया या हिंदू-मुस्लिम तरुण-तरुणीची ही गोष्ट आहे. आतापर्यंत अनेक कथा आणि चित्रपटांमधून प्रेमकथा समोर आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने समाज किंवा कुटुंबाचा विरोध प्रकर्षाने दाखवला जातो. पण इत्रनामाच्या माध्यमातून त्यांनी सविस्तर उलगडा केला आहे. 

यावर बोलताना त्या पुढे म्हणतात, "व्यक्ती प्रेमात पडेपर्यंत किंवा प्रेमाची जाणीव होईपर्यंत जोडीदाराच्या जाती-धर्माविषयी मनात कोणतीही शंका नसते. पण भविष्यात दीर्घकाळ नाते टिकवण्याचा विचार समोर येतो, तेव्हा मानसिक गोंधळ उडण्याची शक्यता असते. कारण आपल्याला वेगळ्या धर्माची आणि संस्कृतीची पुरेशी माहिती नसते, परिचय नसतो. नेमक्या याच मानसिक स्तरावरच्या गोंधळाची ही हिंदू-मुस्लिम पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा आहे."

विद्वेषाच्या काळात प्रेमकथेला मिळालेला सन्मान महत्त्वाचा

सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी या पुरस्काराचे महत्त्व अधोरेखित केले. "आजच्या काळात आणि सध्याच्या विद्वेषाच्या माहोलमध्ये एका भिन्नधर्मीय प्रेमकथेला पुरस्कार मिळणे, ही माझ्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे," अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली.

आगामी काळात दोन नवी पुस्तके भेटीला

या यशानंतर त्यांच्या आगामी लेखनाबद्दल विचारले असता, त्यांनी आपल्या नव्या प्रकल्पांची माहिती दिली. सध्या त्या आणखी एका नव्या कादंबरीवर काम करत आहेत. या कादंबरीलाही मुस्लिम समाजाची पार्श्वभूमी असणार आहे. सध्याच्या काळात असलेली शंका-कुशंका आणि परस्परांविषयीचे भय या सर्व वातावरणात मुस्लिम समाजाच्या मनात नेमके काय सुरू आहे, याचा वेध या नव्या कादंबरीत घेतला जाणार आहे. या व्यतिरिक्त याच वर्षी त्यांचा एक कथासंग्रह आणि एक ललित स्वरूपाचे पुस्तक अशी दोन पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार आहेत. 

हिनाकौसर खान यांच्याविषयी… 

हिनाकौसर खान गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. संवेदनशील पत्रकार आणि लेखिका  म्हणून महाराष्ट्रभर त्या ख्यातकिर्त आहेत.  मुस्लिम समाजाचे अंतरंग लेख, मुलाखती, ललित कथांच्या माध्यमातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तिहेरी तलाक विरोधात लढा देणाऱ्या मुस्लीम महिलांच्या व्यथा मांडणारा ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’ ही अभ्यासपूर्ण पुस्तिका, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांशी संवाद साधून ‘धर्मारेषा ओलांडताना’ हा मुलाखतींचा संग्रह या त्यांच्या महत्त्वाच्या कृतींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.   अलीकडेच त्यांचा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. हिंदू-मुस्लिमांना शांततामय सहजीवनाचा सम्यक मार्ग दाखवणाऱ्या या पुस्तकाचे नाव ‘इज्तिहाद’ असे आहे. तसेच शासनाचा पुरस्कार मिळालेली 'इत्रनामा' ही त्यांची कादंबरीही सध्या गाजते आहे. 
 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter