दिल्लीतील अब्दुल गफ्फार यांच्या शिलाई मशीनमधून निर्माण होणारी देशभक्ती

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
अब्दुल गफ्फार आणि त्यांचे बंधू अब्दुल मलिक सदर
अब्दुल गफ्फार आणि त्यांचे बंधू अब्दुल मलिक सदर

 

दिल्लीच्या सदर बाजारातील गर्दीच्या ठिकाणी एक छोटेसे दुकान आहे. तिथे गेल्या ६४ वर्षांपासून शिलाई मशीनचा आवाज सतत कानावर पडतो. चारही भिंतींना लावलेले असंख्य झेंडे आणि दुकानाच्या मध्यभागी आपल्या जुन्या शिलाई मशीनसमोर बसलेले अब्दुल गफ्फार. भारतात त्यांना सगळे प्रेमाने 'झेंडेवाले चाचा' म्हणून ओळखतात. वयाच्या ७४ व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यात देशभक्तीची ज्योत कायम आहे.

अब्दुल गफ्फार हे गेल्या ६४ वर्षांपासून झेंडे शिवत आहेत. त्यांनी एका दिवसात १,५०,००० तिरंगे झेंडे बनवण्याचा विक्रम देखील केला आहे. भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने 'हर घर तिरंगा' ही योजना राबवली होती. त्यावर्षी योजनेअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या तीन दिवसांत २० कोटी घरांमध्ये राष्ट्रीय झेंडा फडकवण्याचे उद्दिष्ट होते. त्याचवेळी १,५०,००० झेंडे बनवून गफ्फार यांनी विक्रम केला होता. 
 
 
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गफ्फार यांनी सांगितले की, "१९७५ मध्ये आणि त्यानंतरच्या १० वर्षांत झेंड्यांची मागणी खूप होती, परंतु भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंग्याची मागणी अभूतपूर्व आहे. स्वातंत्र्यदिन जवळ आला की, आम्ही दररोज ४,००० ते ५,००० झेंडे बनवतो. पण ७५व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आम्ही दररोज १,००,००० हून अधिक झेंडे बनवले होते. त्यावेळी मागणी इतकी होती की, दुकाने आणि कारखाने चोवीस तास सुरू असायचे आणि कामगार चार पाळ्यांमध्ये काम करायचे."

ते पुढे म्हणतात की, "आमच्या भारत हँडलूम्सच्या दुकानात बनवलेल्या तिरंग्यांनी आणीबाणी, अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आणि अण्णा हजारे यांचा आंदोलनाचा काळ पाहिला आहे. स्वातंत्र्यदिन जवळ येताच आमच्या दुकानातील चारही खोल्या राष्ट्रीय झेंड्यांनी भरलेल्या असायच्या. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की मी हे कार्य नफ्यासाठी नव्हे, तर देशासाठी करतो."

अब्दुल गफ्फार पुडे आत्मविश्वासाने म्हणतात की, "एक दिवस असा येईल की आमच्याकडून बनवल्या जाणाऱ्या झेंड्यांची संख्या २ हजार पर्यंत पोहोचेल. आणि पुन्हा सर्व विक्रम मोडतील. आमचे दुकान झेंडे बनवणारे पहिले आणि सर्वात जुने आहे. आतापर्यंत कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर झेंडे बनवले गेले नाहीत. व्यवसाय आणि नफ्याचा विचार बाजूला ठेवता हा आमच्यासाठी सुवर्णकाळ आहे. कारण यातून आमच्या कामगारांना चांगले वेतन मिळत आहे आणि आम्ही जास्तीत जास्त रोजगार देत आहोत. 
 

ते पुढे म्हणतात की, "वाढत्या मागणीमुळे सध्या दुकानात सुमारे ६०० कारागीर काम करत आहेत. मजुरीच्या तुलनेत पूर्वी २०० ते २५० रुपये रोज मिळणाऱ्या कारागिरांना आता ८०० ते १,००० रुपये रोज मिळत आहेत. यातील बहुतांश कामगार महिला देखील आहेत."

गफ्फार यांच्या दुकानात काम करणारे कारागीर झहूर अहमद गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रीय झेंडे बनवत आहेत. ते म्हणतात की, "मी दररोज ५०० ते ७०० झेंडे बनवण्यात हातभार लावतो. आम्हाला यातून चांगला रोजगारही मिळतो आणि आमच्या हातून देशसेवा देखील घडते."
 

गफ्फार यांच्या जवळच्या मस्जिदचे इमाम मोहम्मद रहमतुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "पूर्वी चीनमधून येणारी प्रत्येक गोष्ट आता भारतात भारतीय लोक बनवत आहेत. अब्दुल गफ्फार गेल्या अनेक वर्षांपासून देशासाठी तिरंगे शिवत आपली सेवा देत आहेत." 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter