आयडी फ्रेशचे संस्थापक पी.सी. मुस्तफा
श्रीलता मेनन
जर तुमचा आवडता नाश्ता इडली असेल आणि तुमच्या आईप्रमाणे पीठ (बॅटर) तयार करायला तुमच्याकडे वेळ नसेल, तर हा माणूस तुमच्यासाठी एक मोठा 'चेंजमेकर' ठरला आहे... केवळ केरळसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी. 'आयडी फ्रेश'चे संस्थापक पी.सी. मुस्तफा यांनी केवळ इडलीच्या पिठाला एक प्रमाणित स्वरूप दिले नाही, तर रसायनमुक्त पिठाचे एक नवे मॉडेलच विकसित केले. त्यांचे पीठ आईच्या हातच्या पिठासारखेच चविष्ट असल्याचा ते दावा करतात.
मुस्तफा यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते मालाच्या वाहतुकीसाठी बॅटर ट्रक्सचा वापर करतात. त्यामुळे वाहतुकीदरम्यान आंबवण्याची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे प्रिझर्व्हेटिव्ह वापरण्याची गरजच उरत नाही. या स्टार्टअपमुळे इडली-डोसा पिठाच्या बाबतीत तरी खाद्य उद्योगाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आज ४००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे प्रमुख असलेले आणि १० पेक्षा जास्त देशांमध्ये पुरवठा करणारे 'बॅटर किंग' पी.सी. मुस्तफा आता पोरोठा आणि तयार करी यांसारख्या इतर खाद्यपदार्थांकडेही वळले आहेत. तथापि, इडलीचे पीठ हेच त्यांचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
इतर उद्योजकांना यशाचा मंत्र देताना मुस्तफा म्हणतात, "नवनिर्मितीवर लक्ष केंद्रित करा. ब्रँड तयार करण्याचा आणि स्पर्धेत पुढे राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'कॉमन सेन्स'."
केरळच्या वायनाडमध्ये वाढलेल्या पी.सी. मुस्तफा यांनी आपल्या वडिलांना रोजंदारीवर शेतमजूर म्हणून तुटपुंज्या रकमेसाठी कष्ट करताना पाहिले होते आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्याची त्यांची इच्छा होती.
मुस्तफा सहावीत असताना शाळा सोडून वेगवेगळ्या वस्तू विकण्याचा प्रयत्न करू लागले. तथापि, त्यांचे शिक्षक आणि पालकांनी त्यांना पुन्हा शाळेत जाण्यासाठी प्रवृत्त केले. गणितातील कौशल्यामुळे, ते शाळेत टॉपर आले आणि त्यांनी एनआयटी कालिकत येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग केले आणि नंतर आयआयएम बंगळूरमधून सॉफ्टवेअर एंटरप्राइज मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
पुढे मुस्तफा आणि त्यांच्या चुलत भावांनी स्टार्टअपसाठी विविध कल्पनांवर विचार केला आणि अखेरीस इडली-डोसा पीठ विकण्यावर त्यांचे एकमत झाले. त्यांनी एका लहानशा फ्लॅटमध्ये फक्त ३० दुकानांना पुरवठा करून सुरुवात केली. लवकरच ही संख्या ३०० पर्यंत पोहोचली आणि 'आयडी फ्रेश' हे नाव बंगळूरमधील घराघरांत पोहोचले.
लवकरच मुस्तफा यांनी अझीम प्रेमजींसारख्या गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधले. १०० किलो पिठाचा पुरवठा करण्यापासून ते आज केवळ भारतीय शहरांमध्येच नव्हे, तर दुबई आणि इतर नऊ देशांमध्ये पसरलेल्या अनिवासी भारतीयांसाठी दररोज २,५०,००० किलो पिठाचा पुरवठा करत आहेत.
आधुनिक मशीन्स आणि मनुष्यबळाचा उपयोग करून मुस्तफा यांनी आपला व्यवसाय सुसज्ज केला. त्यांनी २००६ मध्ये आपल्या चुलत भावांसोबत 'आयडी फ्रेश फूड'ची सह-स्थापना केली आणि सध्या ते भारतातील ग्रामीण भागातील २५०० हून अधिक तरुणांना रोजगार देत आहेत. मुस्तफा आज यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान झाले आहेत.
.webp)
मुस्तफा कबूल करतात की, सामान्य गृहिणी त्यांच्या पिठाच्या चाहत्या असल्या, तरी ते आपल्या स्वतःच्या आईला पीठ विकत घेण्यासाठी पटवू शकलेले नाहीत. कारण त्यांची आईची पिढीचा विकतच्या पिठावर विश्वास नाही. "ज्यांनी आयुष्यभर स्वतः पीठ बनवले आहे, त्यांना ते विकत घ्यायला लावणे सोपे काम नाही," असे ते म्हणतात.
आपल्या आईच्या पिढीसमोर आलेल्या या अपयशाची कबुली देताना, ते हेही सांगतात की, इडली आणि डोसा पिठाला असणारी मागणी कधीही आटणार नाही. ही एक अशी व्यवसायिकची संधी आहे, जी कधीही अयशस्वी होऊ शकत नाही.