इराणी दिग्दर्शक जफर पनाही यांना शनिवारी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांच्या “इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट” या थरारपटासाठी पाल्म द ओर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केट ब्लँशेट यांनी पनाही यांना हा पुरस्कार प्रदान केला.
तीन वर्षांपूर्वी पनाही यांना इराणमध्ये तुरुंगात डांबले होते. त्यानंतर त्यांनी उपोषण केले. गेल्या दीड दशकापासून त्यांनी इराणमध्ये गुप्तपणे चित्रपट बनवले. त्यापैकी एक चित्रपट (“दिस इज नॉट अ फिल्म”) त्यांच्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये, तर दुसरा (“टॅक्सी”) कारमध्ये चित्रित केला.
पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकांनी त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट केला. व्यासपीठावर कान्स निर्णायक मंडळाच्या अध्यक्षा ज्युलिएट बिनोश यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. पुरस्कार स्वीकारतान व्यासपीठावर पनाही म्हणाले की, “कोणीही आपल्याला काय परिधान करावे, काय करावे किंवा काय करू नये हे सांगण्याचा हक्क नाही. चित्रपटसृष्टी हा एक समाज आहे. कोणालाही आपण काय करावे किंवा टाळावे हे सांगण्याचा अधिकार नाही.”
“इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट” च्या विजयाने निऑन या स्वतंत्र वितरक कंपनीचा अभूतपूर्व विक्रम कायम राहिला. गेल्या सहा पाल्म द’ ओर विजेत्यांना निऑनने पाठिंबा दिला आहे. कान्समध्ये प्रीमियरनंतर निऑनने या चित्रपटाचे उत्तर अमेरिकेतील वितरण हक्क घेतले. यापूर्वी 'पॅरासाइट,' 'टायटेन,' 'ट्रायंगल ऑफ सॅडनेस,' 'अॅनाटॉमी ऑफ अ फॉल' आणि 'अनोरा' यांना निऑनने पाठिंबा दिला होता.
हे सर्व चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते. 'पॅरासाइट' आणि 'अनोरा' यांनी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.
गेल्या वर्षी दिग्दर्शक मोहम्मद रसूलोफ यांनी इराण सोडून त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी कान्सला हजेरी लावली आणि जर्मनीत स्थायिक झाले. पण पनाही यांनी सांगितले की, रसूलोफ यांच्याप्रमाणे परदेशात राहणे त्यांच्यासाठी शक्य नाही. रविवारी ते तेहरानला परतण्याच्या तयारीत होते.
'इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट' हा चित्रपट पनाही यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारित आहे. चित्रपटात पूर्वीचे कैदी त्यांना तुरुंगात छळणाऱ्या व्यक्तीला भेटतात आणि त्याला ठार मारायचे की नाही याचा विचार करतात, अशा पद्धतीची चित्रपटाची कथा आहे. पनाही यांना तेहरानच्या इविन तुरुंगात डांबले गेले होते. तिथे ते रसूलोफ यांच्या सुटकेची चौकशी करण्यासाठी गेले होते. २०२३ मध्ये उपोषणानंतर त्यांची सुटका झाली.
२००९ मध्ये ग्रीन मूव्हमेंट आंदोलनात मारल्या गेलेल्या विद्यार्थ्याच्या अंत्यसंस्काराला हजर राहिल्याने त्यांच्यावर इराणमधून बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली. त्या काळात त्यांनी इराणमध्ये परवानगीशिवाय चित्रपट बनवले. यूएसबी ड्राइव्हवर चित्रपट स्मगल करून आंतरराष्ट्रीय महोत्सवांपर्यंत पोहोचवले. २०२३ मध्ये सुटकेनंतर त्यांच्यावरील प्रवास बंदी उठवली गेली.