कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी ३१ मे २०२५ रोजी सांगितलं की, त्यांचं सरकार हेट स्पीचविरुद्ध कायदा आणण्याचा गंभीरपणे विचार करत आहे. तसंच, ऑनलाइन सट्टेबाजीविरुद्ध कायदा करण्याबाबतही चर्चा सुरू आहे. सर्व जिल्ह्यांच्या उपायुक्त (DC) आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत (CEO) दोन दिवसीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.
“हेट स्पीच करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. यासाठी कायदा आणू. सरकार याबाबत गंभीर आहे,” असं सिद्धरामय्या म्हणाले. “हेट स्पीच करणाऱ्यांवर, मग ते कितीही प्रभावशाली असले, तरी गुन्हे दाखल करावेत,” असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
कायदा आणि सुव्यवस्था यांचा विकासाशी थेट संबंध आहे, असं सांगत त्यांनी उपायुक्त आणि पोलीस अधीक्षकांना (SP) घटनेच्या उद्देशांना बाधा आणणाऱ्या शक्तींना आळा घालण्याचे कडक निर्देश दिले. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अलीकडील सांप्रदायिक हत्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.
ऑनलाइन सट्टेबाजीबाबत सिद्धरामय्या म्हणाले की, कायदा मंत्री एच. के. पाटील आणि आयटी/बीटी मंत्री प्रियांक खर्गे याबाबत कारवाई आणि कायद्याची गरज यावर चर्चा करत आहेत. “त्यांच्या सूचनेनुसार पुढील पावलं उचलली जातील,” असं त्यांनी स्पष्ट केलं. क्रिकेट सट्टेबाजी, जुगार आणि मटका यांसारख्या गैरप्रवृत्तींवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
मागील वर्षी (२०२४-२५) राज्यात ७०० बालविवाह झाल्याचं नमूद करत सिद्धरामय्या यांनी बालविवाह पूर्णपणे थांबवण्याचे निर्देश दिले. “बालविवाहाविरुद्ध कायदे आहेत. त्यांना रोखण्याबरोबरच ते होणारच नाहीत याची खबरदारी घ्यावी. बाल गर्भधारणा रोखण्यासाठीही पावलं उचलावीत,” असं त्यांनी सांगितलं. शहरी आणि ग्रामीण भागात याची अंमलबजावणी करण्यासाठी तळागाळातील अधिकाऱ्यांचा वापर करावा, असं त्यांनी नमूद केलं.
सूक्ष्म वित्तसंस्थांकडून (MFI) कर्जदारांना होणारा त्रास रोखण्यासाठी कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी दिले. तसंच, अर्भक मृत्यूदर आणि मातृ मृत्यूदर कमी करण्याचं उद्दिष्ट अधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे.
उपायुक्त, CEO आणि SP ही जिल्ह्यातील तीन महत्त्वाची पदं आहेत. “या तिघांमध्ये समन्वय असेल तरच जिल्ह्याचा विकास शक्य आहे. अहंकार बाजूला ठेवून सरकार आणि जनता यांच्यातील पूल म्हणून काम करावं,” असं सिद्धरामय्या म्हणाले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter