‘टर्टल वॉकर’चा युएनओसी २०२५ मध्ये सन्मान: भारतीय माहितीपटाची जागतिक ओळख

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 1 d ago
‘टर्टल वॉकर’
‘टर्टल वॉकर’

 

 मुंबई: भारतीय माहितीपट ‘टर्टल वॉकर’ला युनायटेड नेशन्स ओशन कॉन्फरन्स (युएनओसी) २०२५ मध्ये विशेष प्रदर्शनाची संधी मिळाली आहे. तायरा मलाने दिग्दर्शित आणि झोया अख्तर व रीमा कागती निर्मित हा पुरस्कारप्राप्त माहितीपट ९ ते १३ जून २०२५ दरम्यान फ्रान्समधील नाइस येथे दाखवला जाणार आहे.

 

हा माहितीपट सतीश भास्कर यांच्या प्रेरणादायी कथेवर आधारित आहे, ज्यांनी भारताच्या किनारपट्टी आणि बेटांवर लुप्तप्राय कासवांचे संरक्षण करण्यासाठी दशकं घालवली. १९७० च्या उत्तरार्धात भास्कर यांनी दुर्गम भागांत प्रवास करून कासवांच्या घरट्यांचा शोध घेतला आणि त्यांच्या वर्तनाचा अभ्यास केला. त्यांच्या प्रयत्नांनी भारतात सागरी जीवसंरक्षणाकडे लक्ष वेधलं.

 

 

गोव्यातील छोट्या स्वतंत्र चमूने सुरू केलेला हा प्रकल्प सात वर्षांत जागतिक स्तरावर पोहोचला. टायगर बेबी, इमाहो फिल्म्स आणि अमेरिकेतील ऑस्कर-नामांकित एचएचएमआय टँगल्ड बँक स्टुडिओजच्या पाठबळाने हा माहितीपट तयार झाला. २०२४ मध्ये डॉक एनवायसी महोत्सवात याचा जागतिक प्रीमियर झाला. त्यानंतर जॅक्सन वाइल्ड मीडिया अवॉर्ड्समध्ये ग्रँड टेटन पुरस्कारासह ब्लू वॉटर फिल्म फेस्टिव्हल, इंटरनॅशनल ओशन फिल्म फेस्टिव्हल आणि सँटियागो वाइल्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवांत याला मान्यता मिळाली.

तायरा मलाने म्हणाल्या, “भारताच्या दुर्गम बेटांपासून सुरू झालेली ‘टर्टल वॉकर’ ही आश्चर्य आणि चिकाटीची कथा आहे. निसर्गाच्या पुनरुत्थानाची शक्ती दाखवणारा हा माहितीपट युएनओसीमध्ये दाखवणं म्हणजे सागर संरक्षणाच्या

जागतिक प्रयत्नांना प्रेरणा देण्याची संधी आहे.” निर्मात्या झोया अख्तर म्हणाल्या, “हा माहितीपट भारताच्या वन्यजीवांवर केंद्रित आहे. युएनओसी हे सागर संरक्षणाच्या आमच्या ध्येयाशी जुळणारं सर्वोत्तम व्यासपीठ आहे.”

 

हा माहितीपट सागरी संरक्षणाच्या मोहिमेचा भाग आहे, आणि युएनओसीमधील प्रदर्शन हे त्यातील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.