दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांसह अनेक कलाकारांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका अविस्मरणीय ठरली. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे चाहते आणि सहकलाकार त्यांना विसरू शकलेले नाहीत. त्यांच्या कामाचे कौतुक आजही तितक्याच उत्साहाने होते. इंडस्ट्रीतील अनेकजण त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव हा शिकवणारा होता, असे सांगतात.
अशातच बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांनी नुकताच इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. लवकरच अनुराग बसू यांचा ‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. यानिमित्त मुंबईत एक मोठा इव्हेंट आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी चित्रपटातील कलाकारांनी दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यादरम्यान अनुराग बसू म्हणाले, “कोंकणा सेन शर्मा इरफान खान यांच्या आठवणीत रडली होती.” कोंकणा पुढे याबद्दल बोलताना म्हणाली, “‘जमाने लगेंगे उनको भुलाने में’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना मला अनेकदा इरफान खान यांची आठवण व्हायची. अनेकदा त्यांची कमी जाणवायची. पण, मी तुम्हाला सांगणार नाही की का आणि कसं झालं; कारण मी जे बोलतेय ते तुम्हाला चित्रपट पाहताना जाणवेल.”
यानंतर अनुराग बसू पुढे म्हणाले, “चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान आम्ही बऱ्याचदा त्याची आठवण काढली. एकदा एका सीनसाठी कोंकणा व आम्ही शूट करत होतो, तेव्हा सीनच्या मध्ये तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती रडायलाच लागली. आम्हाला नेहमी इरफान व के. के. (दिवंगत गायक किशोर कुमार) यांची आठवण येत असते. आमच्याव्यतिरिक्त टीममधील अशी बरीच माणसं आहेत, ज्यांना त्यांची आठवण येते.” इरफान खान व कोंकणा सेन शर्मा यांनी यापूर्वी अनेक कलाकृतींमधून एकत्र काम केलं आहे.