झहीर फारुकी : पुरकाझीत बदल घडवणारे मुस्लीम नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
झहीर फारुकी
झहीर फारुकी

 

नेल्सन मंडेला म्हणायचे, “शिक्षण हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. त्याने जग बदलता येते.” उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यातील पुरकाजी या छोट्या गावात नगर पंचायतीचे अध्यक्ष झहीर फारुकी हे तरुणांना  या 'सर्वात शक्तिशाली शस्त्राने' सशस्त्र करत आहेत. राजकारणी भ्रष्टाचाराने संपत्ती कमावतात, अनेकदा अशी टीका होते. परंतु फारुकी यांनी स्वतःची १.५ कोटी रुपयांची जमीन गावातील पहिल्या उच्च माध्यमिक शाळेसाठी दान दिली आहे.  

फारुकी हे शेतकरी नेते आणि पेशाने वकील आहेत. गावात उच्च माध्यमिक शाळेची गरज त्यांनी अनेक वर्षांपासून मांडली. गावातील शाळा फक्त प्राथमिक शिक्षण देते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अन्य गावांत जावे लागते. २०१७ मध्ये फारुकी नगर पंचायतीचे अध्यक्ष झाले. तेव्हापासून त्यांनी शिक्षण या विषयावर भर दिला. प्राथमिक वर्गांना त्यांनी खुर्च्या आणि टेबल मिळवून दिले. वर्गखोल्या स्मार्ट क्लासरूम बनल्या. या कामाची दखल घेत केंद्र सरकारने गावातील शाळेला पीएम श्री शाळा योजनेत सामील केले.  
 

शिक्षणाबरोबर शेतकरी प्रश्नांवरही त्यांचे लक्ष आहे. मुस्लिम समाज गौशाळा उभारण्यात उदासीन असतो, असा एक समज आहे. परंतु फारुकी यांनी तो समज खोडून काढला. सरकारने गौशाळांसाठी अनेकदा निधी दिला. परंतु अनेक पंचायतींनी तो वापरला नाही. काहींनी छोट्या गौशाळा उभारल्या. फारुकी यांच्या पंचायतीने मात्र देशातील पहिली सरकारी दुहेरी मजली गौशाळा उभारली.  

या गौशाळेत वासरे, गर्भवती गायी, जखमी गायी आणि वृद्ध गायींसाठी स्वतंत्र जागा आहे. याठिकाणी सौर पॅनेलने वीज मिळते. तसेच चारा कापण्याचे यंत्र देखील आहे. पशुवैद्य दररोज गायींची तपासणी करतो. इथे शेणापासून खत बनवले जाते. ते विकून गौशाळेच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळते.  
 

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पंचायतीने गावात अनेक ठिकाणी इंटरनेट प्रोसेसिंग सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी हे कॅमेरे गावाच्या प्रवेश आणि निर्गम मार्गांवरही आहेत. वाहनांचे नंबर प्लेट वाचण्याची क्षमता या कॅमेऱ्यांमध्ये आहे. याचा पहिला फायदा असा झाला की, मुजफ्फरनगर पोलिसांनी उत्तराखंडच्या एका बलात्काऱ्याला पकडले. त्याने पुरकाझीजवळ सहा वर्षांच्या दलित मुलीवर अत्याचार केले होते.  

स्थानिक टेलर तन्वीर आलम सांगतात, उत्तराखंड पोलिसही गुन्हे सोडवण्यासाठी या कॅमेऱ्यांचा वापर करतात. गावातील अनेक महिलांना कॅमेऱ्यांमुळे सुरक्षित वाटते. प्रत्येक कॅमेऱ्याला लाऊडस्पीकर आहे. यामुळे केंद्रीकृत ध्वनी घोषणा यंत्रणा तयार झाली. सरकारी धोरणांची माहिती आणि आपत्कालीन सूचना देण्यासाठी याचा उपयोग होतो.  

गावात पहिल्यांदा महिलांसाठी जिम सुरू झाली. याने ग्रामीण, विशेषतः मुस्लिम महिलांमध्ये आरोग्य आणि फिटनेसची जागरूकता वाढली. २०१९ मध्ये सरकारी निधीतून ही जिम उघडली. पडदा पाळणाऱ्या महिलांना लाभ घेता येईल का, याबाबत शंका होती, परंतु त्यावरही तोडगा निघाला.   
 

सध्या जिममध्ये जवळपास शंभर सदस्य आहेत. जिमच्या प्रशिक्षक शाहीन उस्मानी बुरख्यात जिममध्ये येतात. आत गेल्यावर त्या बुरखा काढतात. त्या सांगतात, “मला कारण माहित नाही. पण जिममुळे महिलांच्या प्रजनन आरोग्यात सुधारणा झाली.” 

फारुकी यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सुलीवाला बागेला तीर्थस्थान बनवले. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धात येथे क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला हजारो लोक येथे जमतात. देशातील कोणत्याही नगर पंचायतीतील सर्वात मोठी तिरंगा यात्रा येथे निघते, असा दावा आहे.  
 

झहीर फारुकी हे भारतीय मुस्लिम नेते आहेत. ते गावपातळीवर बदल घडवत आहेत. सर्वसामान्यांना सरकारी योजना आणि निधीचा लाभ मिळवून देतात. तरुणांचे शिक्षण, महिलांचे आरोग्य, गुन्हेगारी निर्मूलन, सर्वांमध्ये देशभक्ती आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.

- साकीब सलीम

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter