सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन' चा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला

Story by  Awaz Marathi | Published by  Pooja Nayak • 1 Months ago
सारा खान
सारा खान

 

सारा अली खान नावाच्या अभिनेत्रीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका म्हणून तिच्या ए वतन मेरे वतन नावाच्या चित्रपटाचे नाव सांगावे लागेल. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून येत आहेत. त्याला कारण या चित्रपटाचा व्हायरल झालेला ट्रेलर. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे.

गेल्या वर्षी सारानं तिच्या चित्रपटांनं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. तिचा विकी कौशल सोबत प्रदर्शित झालेला चित्रपटही चर्चेचा विषय होता. या सगळ्यात अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातून साराचा एक वेगळाच अंदाज दिसून येतो. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ. इंग्रजांची ती जुलमी राजवट मोडून काढण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं मोहिमा सुरु होत्या. त्यातील एका मोहिमेचं प्रतिनिधीत्व सारा अली खान करते आहे.

मेरे वतन हा अशा एका महिलेची कथा सांगतो जिनं तिच्या धाडसीपणानं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये सारानं उषा नावाच्या मुलीची भूमिका वठवली असून त्यात तिचा स्वातंत्र्याप्रतीचा संघर्ष दिसून आला आहे. १९४२ साली भारत छोडो जे आंदोलन छेडले गेले त्यात भूमीगत राहून रेडिओ स्टेशन चालवण्याचे काम उषानं केलं होतं. ते हे या चित्रपटातून दिसून येते.

ट्रेलरच्या सुरुवातीला दिसते की, सारा अली खान ही हातात तिरंगा घेतलेली दिसते. तो काळ १९४२ मधील मुंबईचा आहे. बॅकग्राउंडमधून आवाज येतो, इंग्रजांनी भारताची जी गत केली आहे त्याचा आपण गांभीर्यानं विचार करायला हवा. आपण काय विचार करायचा, काय बोलायचं आणि काय करायचा हे सगळं इंग्रजांनी का ठरवायचं, हे सगळं मोडून काढायला हवं. असं म्हणत उषा आक्रमक होते. तिचा तो निर्धार खूप काही सांगून जाणारा आहे.

ए वतन मेरे वतन नावाचा चित्रपट हा अॅमेझॉन प्राईमवर येत्या २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून त्याची निर्मिती करण जोहरनं केली आहे. तर दिग्दर्शन कन्नन आयर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. अखेर त्याचा ट्रेलर चाहत्यांसमोर आला असुन त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.