अमीर खुसरो : मुस्लिमांचे भारतीयत्व अधोरेखित करणारा मध्ययुगीन कवी

Story by  Sarfaraz Ahmad | Published by  Pooja Nayak • 16 d ago
अमीर खुसरो
अमीर खुसरो

 

भारताला सुफी संतांची मोठी परंपरा आहे. हिंदू मुस्लिम सौहार्दाची व गंगा जमनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परंपरेत सुफी संप्रदायाची मोठी भूमिका राहिली आहे. यापैकी अनेक सुफी संतांनी अध्यात्मासोबतच इथल्या संस्कृतीत विविधांगी योगदान दिले आहे. अमीर खुसरो त्यातील आघाडीचे नाव. अमीर खुसरो यांनी भारतीय संगीतामध्ये अनेक रागांची भर घातली, अनेक वाद्ये निर्माण केली. याशिवाय विविध क्षेत्रांतील त्यांचे योगदान अमूल्य म्हणावे असेच आहे. दिल्लीतील त्यांची समाधी आहे. सध्या त्यांचा ७२०वा उरूस सुरू आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विविध पैलूंची ओळख करून देणारे लेख 'आवाज'वर प्रसिद्ध करत आहोत. त्यापैकी हा एक लेख... 
 
अलिकडच्या काळात मुस्लिमांच्या राष्ट्रीयत्वाविषयी अनेक गफलती आढळतात. खुद्द मुस्लिमांनाही स्वतःच्या राष्ट्रवादाची मुल्ये ज्या परंपरातून आकाराला आली, त्याचे भान राहिलेले नाही. सांस्कृतिक उपरेपणा पत्करण्यापेक्षा ऐतिहासिक परंपरांच्या आधारे राष्ट्राशी असलेले नाते आधिकाधीक घट्ट करण्याची संधी मुस्लिम समाजाला खुसरोंसारख्या प्रतिकांच्या माध्यमातून सहज घेता येईल.
 
खुसरोंनी स्वतःचे भारतीयत्व इथल्या परंपरा, सामाजिक मुल्ये, धार्मिक श्रध्दा यांच्याशी समन्वयाचे धोरण ठेऊन आधिकाधिक पक्के केले. हे करताना त्यांनी स्वतःचे धार्मिक तत्वज्ञान कुठेच वेठीस धरले नाही. पण त्याचा गैरअर्थ लावून सामाजिक संवाद तोडण्याचा कर्मठपणाही दाखवला नाही. खुसरोंच्या कविता राष्ट्रनिष्ठेची इतरांपेक्षा निराळी आणि त्या अर्थाने अपारंपारिक भूमिका मांडतात. मानवी समाजाच्या गरजांची पुर्ती करणारी व्यवस्था व त्यातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि आधिकारांवर भाष्य करुन त्या आधारे आदर्श समाज ही संकल्पना खुसरोंनी मांडली आहे.
 
ज्ञानेश्वरांप्रमाणे खुसरो भुतदया सांगतात. डॉ. मुशिरुल हक यांनी यासंदर्भात काही महत्त्वाची निरिक्षणे मांडली आहेत. त्यांच्या मते, खुसरोंनी अवाजवी शस्त्रास्त्रनिर्मितीला विरोध केला  होता. शस्त्रास्त्रे ही मानवी जीवनाच्या हितासाठी असावीत. इतरांवर धाक निर्माण करण्यासाठी किंवा नाहक युध्द लादण्यासाठी त्यांचा वापर होऊ नये, असे खुसरोंचे मत होते. खुसरो तुकारांमाप्रमाणे अनेक ठिकाणी समाजातल्या चुकीच्या गोष्टीं विरोधात बंड पुकारतात.

जियाउद्दीन बरनी हा सल्तनत काळातला एक महत्त्वाचा विचारवंत होता. त्याने उच्चवर्गीय मुसलमानांना अत्याधिक महत्त्व दिले. आणि समाजातील वाईट गोष्टींची जबाबदारी मात्र खालच्या वर्गातल्या लोकांवर ढकलली आहे. अमीर खुसरो यांनी बरनीच्या या विचारांना विरोध केला. त्याचे मुद्दे खोडून काढताना खुसरो लिहितात, ‘समाजातील वाईट गोष्टींसाठी गरीब आणि खालच्या वर्गातील लोकांना जबाबदार धरणे योग्य नाही. गरीब मजूर, लहान-मोठे व्यापारी आणि फेरीवाले दिवसभरातील काबाड कष्टानंतर रात्री झोपतात. समाजाची गरज पूर्ण करतात. बादशाह आणि अमीरांच्या  सहाय्यकांनाही दिवसरात्र हुजुरातीत हजर रहावे लागते. आपल्या पोटासाठी हे लोक सारी रात्र जागून काढतात. मात्र आश्चर्य असे आहे की, ते याला कर्तव्य समजतात आणि या कर्तव्यपुर्तीत जीवनाचा आनंद शोधतात. या कर्तव्यपुर्तीच्या आधारेच समाजात उच्चवर्ग व कनिष्ठ वर्गाची संकल्पना मांडली जावी’ .
 
खुसरो समाजातल्या अखरेच्या स्तरातील शेवटच्या माणसाच्या जगण्याची दखल घेत. एकेठिकाणी खुसरोंनी मजूरांची बाजू घेऊन मालकांना खडसावले आहे. ते लिहीतात, ‘मजूरांना मजूरी देताना त्याच्यावर आपण उपकार करत असल्याचे मालकांना वाटते. पण हे मजूर अमर्याद कष्ट सोसून तुमची कामे करतात. त्यामुळेच तुम्हाला आधिकाधिक नफा मिळतो हे विसरु नका.’ मध्ययुगातील सामाजिक संघर्षात समाजातल्या अभिजनांनी हिणवलेल्या वर्गाची बाजू घेऊन खुसरो लढत राहिले. खुसरोंसारख्या चळवळ्या सुफी साधकांची चर्चा सातत्याने व्हायला हवी. भारतीय समाजाच्या सर्वकालीक सांस्कृतिक जडणघडणीसाठी या चर्चा गरजेच्या आहेत. 

अमीर खुसरो आणि जियाउद्दीन बरनी यांची एकमेकांच्या विरोधातली मते अनेकांना राजकारणासाठी खुणावत होती. पण खुसरोंनी याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी निष्ठेने आपल्या सुफी प्रेरणांच्या आधारे दरबारात राजकीय भूमिका मांडल्या. उलेमांचा एक गट त्यांच्या विरोधात गेला तरी खुसरोंनी तमा बाळगली नाही. अमीर खुसरोंचा हा वेगळापणा तत्कालीन समाजाचे वास्तव समजून घेतल्यानंतर आधिक ठळक होतो.
 
खुसरोंनी त्यांच्या आयुष्यात अनेक सत्तांतरे पाहिली. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय स्थितत्यंतरे अनुभवली. त्यातून होणाऱ्या इष्ट, अनिष्ट बदलांचेही ते साक्षीदार ठरले. पण त्यांनी सुफी मुल्यांवरची आपली निष्ठा ढळू दिली नाही. समाजात समता आणि समन्वय निर्माण करण्याची आपली भूमिका बदलली नाही. खुसरोंनाही राजकारणातल्या बदलांचाही फटका बसला पण त्यांनी राजकीय परिस्थितीप्रमाणे स्वतःत बदल घडवला नाही. राजा बदलला म्हणून त्याची भाटगिरी करणे खुसरोंना कधीच जमले नाही. सत्तेचा घटक म्हणून जगताना सामान्य माणसांशी असलेले नाते खुसरोंनी दिवसागणिक नव्या उंचीवर नेले. 

खुसरोंनी आयुष्यभर प्रेमासाठी इश्काची काफीरी करताना कुणाचीही तमा बाळगली नाही. त्यांची एक कविता या मुद्यांच्या स्पष्टीकरणासाठी आधिक समर्पक आहे. 

‘काफिरे – इश्कम मुसलमानी मरा दरकार निस्त
हर रगे मन तार गश्ता, हाजते जुन्नार नीस्त ।
अज सरे बालीने मन बर खेज ऐ नादाँ  तबीब
दर्द मन्द इश्क रा दारो- बखैर दिदार नीस्त ।
मा व इश्क यार, अगर किब्ला, गर दर बुतकदा,
आशिकान दोस्त रा बकुफ्रो-ईमां कार नीस्त।
खल्क मी गोयद के खुसरो बुत परस्ती मी कुनद
आरे-आरे मी कुनम बा खलको-दुनिया कार नीस्त ।’

(मी प्रेमाचा काफीर आहे. मला मुसलमानीची आवश्यकता नाही. माझे प्रत्येक अंग (रग) तार बनले आहे. मला जाणव्याचीही गरज नाही. हे बालीश वैद्या माझ्या समोरुन उठून जा. ज्याला प्रेमाच्या वेदना लागल्या आहेत. त्याचे उपचार प्रियकराच्या दर्शनाशिवाय अन्य काहीच नाही. आम्ही आणि प्रेयसीचे प्रेम आहे. काबा असो वा मूर्तींचा गाभारा, प्रेयसीच्या प्रियकाराला पाखंड आणि श्रद्धेशी कोणतेच काम नाही. जग म्हणते खुसरो मूर्तीपूजा करतोय. होय, होय मी करतो. मला दुनियेशी कोणतेही सरोकार नाही.)

मध्यकाळामध्ये भारतात राष्ट्र ही संकल्पना अस्तीत्वात होती की नाही हा वादाचा विषय आहे. प्रादेशिक रचनेवरुन स्वतंत्र भौगोलीक ओळख अनेक प्रदेशांनी प्राप्त केली होती. त्यावरुन त्या प्रदेशाशी सांस्कृतीक निष्ठा जपणारा वर्गही मध्ययुगात अस्तित्वात होता. भारतीय समाज हा अशाच भौगोलीक ओळखीवर उभा होता. त्यावरच त्याच्या राजकीय व सामाजिक निष्ठांनी जन्म घेतला होता.
 
अमीर खुसरो वंशाने परकीय असले तरी जन्माने भारतीय होते. त्यांचे पिता तूर्क आणि आई भारतीय होती. खुसरो आजन्म भारतात राहिले. त्यांच्या भूमिका ज्या भौतीक परिस्थिीतीत घडल्या ती भारतीय होती. त्यामुळे त्यांच्या साहित्यात जे अभिव्यक्त झाले, ज्याचे पडसाद उमटले ते भारतीय होते. ते ज्या धर्मात जन्मले तो धर्म इस्लाम भारतीय नसला तरी त्याचा लावलेला अर्थ मात्र भारतीय समाजवास्तवावर आधारीत होता. यामुळेच त्यांच्या साहित्यात भारताविषयी असिम प्रेमाच्या भावना आढळतात.
 
खुसरोंनी भारताच्या गौरवाचे गीत गायले. त्यांनी फारसीत लिहलेल्या अनेक कवितांमध्ये भारताच्या अनेक रुपांना, त्याच्या वैशिष्ट्यांना अधोरेखीत केले आहे. त्यांनी भारताच्या गौरवार्थ लिहलेल्या कवितांमध्ये वापरलेल्या प्रतिमा, दिलेली उदाहरणे, उपमा आधुनिक राष्ट्रविषयक काव्यलेखनाच्या खूप पुढच्या आहेत. उदाहरणादाखल त्यांच्या भारतावरच्या काही कविता पाहता येतील. एका शेरमध्ये ते लिहीतात-
 
‘हस्त मेरा मौलीद व मावा वतन’
(हिंद माझी जन्मभूमी आणि माझा देश आहे.)
 
दुसऱ्या एका कवितेत खुसरो म्हणतात-
 
‘किश्वरे हिंद बहिश्ते बर जमीन’
(भारत पृथ्वीवरील स्वर्ग आहे.)

देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे. हे सांगताना खुसरो म्हणतात,  
 
‘दीं ज रसूल आमदाहे काई ज मरा दीन’
(देशप्रेम करणे माझ्या धर्मनिष्ठेचा (इमानचा) भाग आहे.)
 
यासाठी खुसरोंनी प्रेषितांच्या का वचनाचा संदर्भ दिलाय. ज्यात प्रेषितांनी म्हटलय ‘हुब्बुल वतन मन उल इमां’ अर्थात देशाशी प्रेम करणे इमानचे (श्रध्देचा) एक अंग आहे.

खुसरोंचे दिल्ली शहरावर खूप प्रेम होते. ते सहसा दिल्ली सोडून बाहेर जात नसत. पण ज्यावेळी खुसरो दिल्लीतून बाहेर जात अस्वस्थ होत. दिल्लीत परतल्यानंतर त्यांना प्रेषित युसूफ यांना तुरुंगातून सुटका झाल्यानंतर जितका आनंद झाला होता, तितकाच आनंद आपण अनुभवल्याचे खुसरोंनी लिहून ठेवले आहे. गयासुद्दीन बल्बनचा मुलगा बुखरा खानसोबत एकदा ते लखनउला गेले होते. त्यावेळी दिल्लीच्या आठवणींनी त्यांचे मन व्याकुळ झाले होते. एकदा खुसरो त्यांचे मित्र अमीर हाकीम खान याच्यासोबत व्यापारासाठी दिल्लीहून अवधला निघाले होते. पण रस्त्यातच त्यांना दिल्लीच्या आठवणींनी अस्वस्थ व्हायला लागले. ते लहान मुलांसारखे रडू लागले. हे पाहून हकीम खानने त्यांना दिल्लीला परतण्याची परवानगी दिली. तेव्हा खुसरोंनी आपले अश्रू पुसले. आणि भावनावेगात ते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. या अनुभवावर त्यांनी एक कविता लिहीली आहे. त्यात खुसरो म्हणतात, 

‘बा अज्म ए सफर अनान कुशादूम कूं नाबा जदीद गान कुशादूम 
बा लष्कर ए शाह कुच बर कुच दर गिरीया हमी शुदम बहर ए कुच’

शहरातील जामा मसजिदीला ते ‘फैज ए इलाही’ (अल्लाहची कृपा) म्हणत. कुतूब मिनार विषयी खुसरो लिहीतात, ‘या मिनाराला पाहून चंद्राने आपली टोपी काढून टाकली आहे.’ त्या काळातील ‘हौज ए शम्सी’ या पाण्याच्या हौदाविषयी खुसरो लिहीतात, ‘याचे पाणी जर हजरत खिजर यांनी पिले असते तर ते अमृत संजीवन देणाऱ्या झऱ्यालाही विसरले असते.’ हजरत खिजर यांच्याविषयी सुफींमध्ये अनेक कथा प्रचलित आहेत. त्यांनी अमृत संजीवनी असणाऱ्या झऱ्याचे पाणी प्यायले होते. त्यामुळे ते चिरंजीव असल्याचे म्हटले जाते. दिल्लीतल्या रहिवाश्यांविषयी खुसरो म्हणतात, 

‘मर्दुम ए ओ जुम्ल ए फरिश्ता सरीश्त
खुशदिल व खुश होए चो अहले बहीश्त’
(ते फरिश्त्यांच्या चारित्र्याचे आहेत. आणि स्वर्गात राहणाऱ्या लोकांप्रमाणे प्रसन्न असतात.)

गयासुद्दीन बल्बनच्या काळात मंगोलांनी दिल्लीवर हल्ला केला होता. त्यावेळी अमीर खुसरोंचा आक्रोष अनेकांनी अनुभवला होता. खुसरोंनी या हल्ल्याचे वर्णन कवितेत आस्मानी संकट, कयामत, राजकीय पाखंड अशा शब्दात केले आहे.

‘वाकिया ए अस्त ऐं या  बलाकज आस्मान आमद पदीद
आफत अस्त ऐं या कयामत कज जहान आमद पदीद
राह दर बुनियादे आलम दाद सेल ए फितना ए रा
रख्न ए का मसाल दर हिंदुस्तान आमद पदीद’
 
सय्यद सबाउद्दीन अ. रहमान लिहीतात, ‘खुसरो त्यांच्या ‘नुह सिपेहर’ या मसनवीत मोठ्या सहृदयतेने हिंदू बुध्दीजीवी परंपरेचा उल्लेख करतात. खुसरो म्हणतात, रोममधून तत्वज्ञानाने मोठी झेप घेतली. पण हिंदूमध्ये तत्वज्ञानाचा इतिहास कमी समृध्द नाही. त्यांच्याकडे तर्कशास्त्र, नक्षत्रविद्या, वक्तृत्वशास्त्र, गणिताचा मोठा वारसा आहे. खुसरोंनी ब्राह्मणांच्या प्रतिभेवर ‘बरहमने हस्त के दर इल्म व खुर्द दफ्तर ए कानून अरस्तू बदरद’ हा शेर लिहीला आहे.
 
याशिवाय खुसरोंनी हिंदूच्या श्रध्दांविषयी जे लिहीले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. मुसलमानांसाठी तौहीद (एकेश्ववाद) ला इस्लामच्या अनुयायीत्वाची आधारशिला मानले जाते. एकेश्वरवादात कसलाच हस्तक्षेप मुसलमान मान्य करत नाहीत. खुसरो हिंदू मुसलमानांना एक करु इच्छीत होते. त्यासाठीच त्यांनी स्वधर्मीयांना हिंदूचा सनातन धर्म एकेश्वरवादीच असल्याची खात्री पटवून देत होते. खुसरोंनी हिंदूच्या इश्वराच्या संकल्पनेला इस्लामी एकेश्ववादाशी जोडून त्यांच्यातील संघर्ष संपवण्याचा प्रयत्न केला. 

अमीर खुसरोंना अनेक भाषा ज्ञात होत्या. त्यांनी हिंदवी प्रमाणे फारसीतही काव्य रचना केली. तुर्की आणि फारसी भाषेवर खुसरोंना विशेष प्रभुत्त्व प्राप्त होते. या दोन भाषांव्यतिरिक्त खुसरोंनी हिन्दवी भाषेत काव्य रचना करुन त्याचे रुपच बदलले. हिन्दवी भाषेला समृद्ध करण्यात खुसरोंचा मोठा वाटा आहे. डॉ. परमानन्द पांचाल म्हणतात, ते अरबी आणि तुर्कीचे पंडित होते. त्यांना खडीबोलीचा वारसा मिळाला होता. फारसी त्यांच्या घरची दासी होती. संस्कृतवर त्यांना अधिकार होता. भारतातील अनेक भाषांचा त्यांना परिचय होता. बंगाल, अवध, मुल्तान, देवगिरी येथे राहून त्यांनी भारतातल्या अनेक भाषांची माहिती मिळवली होती. खुसरो असे पहिले कवी होते, ज्यांनी सर्व भारतीय भाषांचा अभ्यास केला होता. खुसरोंनी ‘नूह सिपेहर’ या ग्रंथात त्याची माहिती दिली आहे.  खुसरोंच्या या भाषा अभ्यासाची माहिती देताना पांचाल यांनी त्यांची एक कविता उद्‌धृत केली आहे. त्यात खुसरो लिहितात, 

‘सिंधी व लाहोरी व कश्मीर व कबर
घुर समंदरी व तिलंगी, व गुजर
माअबरी व गौरी व बंगाल व अवद
देहली व पैरान्श अन्दर हमह हद
ईन हमह हिंदवी स्त ज अय्यामे-कुहन
आम्मह बकार अस्त बहर गुनह सुखन’

भारतातील विविध भाषांची माहिती दिल्यानंतर खुसरो हिंदी भाषेची फारसीशी तुलना करतात, 

‘न लफ्जे हिन्दवी कम अज फारसी कम’
 हिन्दवीचे शब्द दर्जाच्या बाबतीत फारसी पेक्षा कमी नसल्याचे मत मांडणाऱ्या खुसरोंनी संस्कृतविषयी देखील शेर लिहले आहेत. 
 
‘संस्कृत नाम जी अहदे कुहनश
आम्मह न दारह खबर अज कुन मकुनश’

प्राचीन काळापासून या भाषेचे नाव संस्कृत आहे. ही भाषा खूप गोड आहे. सामान्यजनांशी याच्या व्याकरणाचे बारकावे चर्चिले जात नाहीत, अशी खंतही खुसरोंनी व्यक्त केली आहे. 
 
- सरफराज अहमद 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 

Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter