'बेबाक'च्या अनोख्या रमजान कार्ड्सने रुजवल्या हक्क, समता आणि कर्तव्ये अधोरेखित करणाऱ्या दुआ

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भक्ती चाळक

रमजानच्या पवित्र महिन्याची सांगता होत आहे. सर्वांना आता ईदची चाहूल लागली आहे. रमजानचा संपूर्ण महिना उपवास आणि इबादतमध्ये व्यतीत झाला आहे. या इबादतमध्ये सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे 'दुआ'. म्हणजे ईश्वराकडे केलेली याचना. याविषयी मुंबईच्या बेबाक कलेक्टिव या संस्थेने एक आगळावेगळा पुढाकार घेतला होता.

रमजान सुरु होण्याची चाहूल कशी लागते, तर मस्जीदींच्या भिंतींवर लावलेल्या छापील रमजान कार्डवरून. रमजान सुरु होण्यापूर्वीच हे कार्ड घरोघरी पाहायला मिळतात. सहसा स्वयंपाकघराच्या भिंतीवर किंवा हॉलमधील मुख्य जागेवर देखील ते चिटकवलेले असतात. पहाटे उठल्यावर सेहरीला किती वेळ शिल्लक आहे? आणि दिवसभर काम करताना ‘इफ्तारला किती मिनिटे बाकी आहेत?’ हे पाहण्यासाठी घराघरांत या कार्डचा वापर केला जातो. सहसा प्रत्येकाच्याच खिशात हे कार्ड असतात. 
 

रोजाच्या वेळेसोबतच या रमजान कार्डवर अनेक दुआ लिहिलेल्या असतात. या दुआ प्रामुख्याने संकल्प, कृतज्ञता आणि आत्मशुद्धी या तीन विषयांभोवती गुंफलेल्या असतात. परंतु बेबाक या संस्थेने तयार केलेल्या रमजान कार्डच्या माध्यमातून महिलांच्या न्याय्यहक्कांवर स्पष्ट भाष्य केले आहे. त्यांनी केलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे. 

स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणाऱ्या या उपक्रमाबाबत बेबाक कलेक्टिवच्या संस्थापिका हसीना खान यांनी महत्त्वाची भूमिका मांडली. त्या म्हणतात की, “ही संकल्पना आम्ही यापूर्वी सुद्धा राबवली होती. १५ वर्षांपासून आम्ही महिलांच्या अधिकारांवर काम करत आलोय. रमजानमध्ये रोजा कार्डांवरील दुवांचे संकुचित अर्थ लावले जातात. काही ठिकाणी स्त्रियांनी केवळ पडद्यात राहावे, असे विचार त्यात असतात. कार्ड छापणाऱ्यांचा हा मर्यादित दृष्टिकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही तयार केलेल्या रमजान कार्डच्या माध्यमातून स्त्रियांचे न्याय-हक्क मांडणारा विचार आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे.”

हसीना खान पुढे सांगतात की, “देशात शांतता टिकून यासाठी पहिली सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी. महिलांवरील हिंसाचार थांबल्याने घरात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होऊ शकते. या कार्डमधून आम्ही हाच संदेश दिला आहे. स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवून त्यांना जगण्याचे सर्व अधिकार मिळणे, ही दुआ कोणत्याही एका समुदायापुरती मर्यादित नाही. भेदभावमुक्त समाज आणि सर्वधर्मसमभाव ही प्रत्येक श्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तीची भावना असायला हवी. तीच भावना कार्डच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे.”
 

न्याय आणि समानतेबाबत दृष्टीकोन देणाऱ्या दुआ :
 
१) ऐ अल्लाह, औरतों को हर तरह के जुल्मों से निजात अता फरमा.
२) ऐ अल्लाह, हमारे मुल्क में गरीबों, मजलूमों और बेसहारों के लिए आसानी पैदा फरमा.
३) ऐ अल्लाह, क़ानून बनाने वालों को ईमानदारी, इंसाफ और अवाम की भलाई की सोच अता फरमा.
४) ऐ अल्लाह, हर औरत को अपनी जिन्दगी में पसंद से पढ़ाई, शादी, नौकरी करने का फैसले खुद लेने का पूरा हक़ अता फरमा.
५) ऐ अल्लाह, हर मज़हब, हर जाति के लोगों के बीच आपसी मोहब्बत बढ़ा.
६) ऐ अल्लाह, खान-पान, कपड़ों, रंग और मज़हब के नाम पर हो रहे हर तरह के भेदभाव को मिटा दे.
७) ऐ अल्लाह, हम सबको बेहतर जेहनी और जिस्मानी सेहत अता फरमा.
८) ऐ अल्लाह, अच्छे अखलाक़, बड़ों की इज़्ज़त और छोटों से मोहब्बत करने वाला बना.
९) मेरा रोज़ा और इबादत क़बूल फ़रमा, तेरा जिक्र और शुक्र करने की तौफ़ीक़ दे.
१०) ऐ अल्लाह, हमारे शहर और मुल्क में अमन और सुकून क़ायम फ़रमा.
११) ऐ अल्लाह, हमें हर नफरत भरी सोच से बचा कर मोहब्बत का ज़रिया अता फरमा.
१२) ऐ अल्लाह, हमें ऊंच नीच का फर्क करने से परहेज़ फ़रमा.
१३) ऐ अल्लाह, हर तरह की घरेलू हिंसा को रोकने का अज़्म पैदा कर और हमारे घरों में अमन व सुकून कायम फ़रमा.
१४) ऐ अल्लाह, हमें सिर्फ़ तेरा मोहताज बना, किसी और के आगे हाथ फैलाने से बचा.
१५) ऐ अल्लाह, हमारे मुल्क में नफरत, फ़साद और हिंसा को रोकने की तौफीक आता फ़रमा.
१६) हे अल्लाह, हमारे देश में आईन के ज़रिये सबको बराबरी, हक़ और इज्जत अता फरमा.
१७) ऐ अल्लाह, जो दुआएँ हम माँगना भूल गए, तू अपनी रहमत से वो भी कुबूल फ़रमा.

हसीना खान यांच्या मते, देशातील शांतता टिकवण्याची सुरुवात आपल्या घरापासून व्हायला हवी. महिलांवरील हिंसाचार थांबल्याने घरात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होऊ शकते. सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात दलित, मुस्लिम, आदिवासी आणि मजूर वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. या कार्डच्या माध्यमातून या शोषित घटकांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. सर्वांना सन्मानाने रोजगार मिळावा आणि मागासवर्गीयांच्या हाताला काम मिळून त्यांची सुरक्षा वाढावी, अशी स्पष्ट मांडणी यात केली आहे.

यासारख्या अनेक उपक्रमांमधून बेबाक संस्थेने एका प्रगत समाज घडवण्याचे प्रयत्न केले आहेत. एक असा समाज जिथे महिलांना आदर, सुरक्षा आणि निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल. प्रत्येक घर आणि परिसर हिंसाचारापासून मुक्त असावा, ही यामागची मूळ भावना आहे. द्वेषाच्या राजकारणापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व मिळावे, अशी आशा, हसीना यांनी व्यक्त केली आहे. त्या सांगतात, “आमची संस्था दिव्यांग व्यक्ती, महिला आणि तरुण मुलींसाठी काम करते. मुलींच्या वाढत्या वयासोबत त्यांच्यावर येणारी बंधने दूर व्हायला हवीत, यासाठी आम्ही जोरदार लढा देत आहोत.”

त्या पुढे म्हणतात, “आमची संस्था दिव्यांग व्यक्ती, महिला आणि तरुण मुलींसाठी विशेष काम करते. दिव्यांग मुलांसाठी खेळण्याच्या जागा आणि वृद्धांसाठी फिरण्यासाठी योग्य सोयी उपलब्ध करून देण्याचे आमचे भविष्यातील ध्येय आहे. तसेच वंचितांना न्याय, मुलांना दर्जेदार शिक्षण आणि सुरक्षित भविष्य मिळावे, हे आमचे मुख्य हेतू आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात दलित, मुस्लिम, आदिवासी आणि मजूर वर्गाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसतेय. मागासवर्गीयांच्या हाताला काम मिळून त्यांची सुरक्षा वाढावी आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे यासाठी आम्ही झटत आहोत.”
 

आमीन म्हणत महिलांच्या हक्कांवर एकमत 

रमजान हा महिना केवळ उपासनेचा नसून स्वतःचे अंतकरण स्वच्छ करण्याचा आणि सत्याच्या बाजूने उभे राहण्याचा काळ आहे. समानता आणि न्यायावर आधारित समाज घडवण्यासाठी या विशेष रमजान कार्डमधील संदेशांचा प्रसार करावा आणि आपल्या प्रार्थनांमध्ये शांततेचा समावेश करावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

रमजानच्या काळात संस्थेने आयोजित केलेल्या एका विशेष इफ्तार कार्यक्रमात विविध जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येत या सर्व दुआंचे वाचन केले. शेकडो जणांनी एका सुरात या विचारांना आमीन म्हणत पाठिंबा दिला. महिलांचे हक्क, त्यांना न्याय आणि स्त्री-पुरुष समानता यांचा पुरस्कार करणारे हे रमजान कार्ड समाजात सकारात्मक परिवर्तनाची नांदी ठरत आहे.
 

बेबाक कलेक्टिवविषयी… 

मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी संसदेपर्यंतचा लढा :
भारतीय समाजव्यवस्थेत अल्पसंख्याक महिलांचे प्रश्न अनेकदा दुर्लक्षित राहतात किंवा धार्मिक चौकटीत अडकवले जातात. अशा वातावरणात मुस्लिम महिलांच्या घटनात्मक अधिकारांसाठी आणि लिंगभावात्मक न्यायासाठी बेबाक कलेक्टिव संस्था कार्य करते. स्वायत्त महिलांची ही संस्था धार्मिक सुधारणांवर मर्यादित न राहता, महिलांच्या नागरिकत्वाच्या अधिकारांसाठी सडक ते संसद असा संघर्ष करत आहे.

राजकीय आणि सामाजिक सक्रियता : 
फेब्रुवारीमध्ये नवी दिल्ली येथे १४ राज्यांतील ५०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित केलेले अधिवेशन हे संस्थेच्या कार्याचा एक ऐतिहासिक टप्पा होता. 'मुसलमान औरतों की आवाझ: सडक से संसद तक' या माध्यमातून त्यांनी सामाजिक सुरक्षा आणि समान नागरी हक्कांची मागणी लावून धरली.

डिजिटल सुरक्षिततेवर संशोधन : 
'बिहाइंड द पिक्सेल्स' या अहवालाद्वारे संस्थेने सोशल मीडियावरील मुस्लिम महिलांच्या असुरक्षिततेचे वास्तव जगासमोर आणले. ऑनलाइन मिळणाऱ्या जिवे मारण्याच्या किंवा बलात्काराच्या धमक्यांमुळे महिलांचा सार्वजनिक वावर कसा मर्यादित होत आहे, याचे सखोल दस्तऐवजीकरण संस्थेने केले आहे.
 

धार्मिक कट्टरतावादाला विरोध : 
गुड़िया किंवा इमराना सारख्या प्रकरणांमध्ये जेव्हा धर्मगुरूंनी अन्यायी फतवे काढले, तेव्हा बेबाक कलेक्टिवने त्या विरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. "आम्ही मुस्लिम आहोत, महिला आहोत, पण आम्हाला हे फतवे मान्य नाहीत," अशी स्पष्ट भूमिका घेत संस्थेने रुढीवादी प्रतिमा मोडीत काढल्या आहेत.

प्रगत समाजासाठी रमजान कार्ड :  
रमजानच्या काळात केवळ उपासनेचे वेळापत्रक न छापता, महिलांचे हक्क, मजुरांचे प्रश्न आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देणारे रमजान कार्ड प्रसिद्ध करून संस्थेने धर्माला मानवी मूल्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
 
हसीना खान यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही संस्था मुंबईच्या वस्त्यांमधून सुरू होऊन आज राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्याजोगी शक्ती बनली आहे. उजव्या विचारसरणीचे राजकारण आणि समाजातील कट्टरतावाद अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत, बेबाक कलेक्टिव आज दलित, मुस्लिम, आदिवासी आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांच्या संरक्षणासाठी एक भक्कम व्यासपीठ ठरत आहे. हा लढा केवळ मुस्लिम महिलांपुरता मर्यादित नसून, तो एका न्याय्य आणि भेदभावमुक्त भारताच्या निर्मितीसाठीचा एक महत्त्वाचे पाऊल आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter