भक्ती चाळक
रमझानच्या पवित्र महिन्यात कुटुंबाच्या सेवेत व्यस्त असणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी मुंब्रा-कौसा परिसरात 'ईद मेहंदी महोत्सवा'चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. नगरसेविका मार्झिया शानू पठाण यांच्या संकल्पनेतून आणि एमएसपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम सलग सहाव्या वर्षी यशस्वीपणे राबवला जात आहे. सण-उत्सवाच्या काळात महिलांना विनामूल्य मेहंदी लावून देण्यासोबतच स्थानिक मुलींच्या कौशल्याला रोजगार मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
रमझानच्या काळात महिला घरकामात प्रचंड व्यस्त असतात. अनेकदा त्यांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. मेहंदी लावणे ही एक सुन्नत (धार्मिक परंपरा) असली तरी वाढत्या महागाईमुळे अनेकींना ते परवडत नाही. सध्या बाजारात एका हातावर मेहंदी लावण्यासाठी ५०० ते १००० रुपये आकारले जातात. हीच अडचण ओळखून मार्झिया पठाण यांनी पाच वर्षांपूर्वी या महोत्सवाची सुरुवात केली होती. यावर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवून दोन दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. २८व्या रोजाला मुंब्र्यातील डायमंड हॉल येथे आयोजित कार्यक्रमात सुमारे एक हजार महिलांना मेहंदी लावण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. रात्री उशिरापर्यंत शेकडो महिलांनी रांगेत उभे राहून या सुविधेचा लाभ घेतला.
या उपक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे अलमास कॉलनी येथील के.जी.एन. हॉल मध्ये होणारे आयोजन. हा भाग नगरसेविका मार्झिया पठाण यांच्या प्रभागात येत असल्याने तिथल्या स्थानिक महिलांसाठी विशेष सोय केली आहे. आज २९ व्या रोजाला सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत सुमारे ४५० महिलांना इथे मेहंदी लावली जात आहे. आपल्या हक्काच्या नगरसेविकेने स्वतः पुढाकार घेऊन हा उत्सव घरापर्यंत आणल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

केवळ महिलांना सेवा देणे इतकाच हा मर्यादित विषय नाही. मुंब्रा-कौसा परिसरातील तरुण मुली मेहंदी काढण्याच्या कलेत अत्यंत निपुण आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने अशा अनेक प्रतिभावान मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. अनेक मुली गेल्या पाच-सहा वर्षांपासून या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. "स्थानिक मुलींच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे नेणे हे माझे कर्तव्य आहे," अशी भावना मार्झिया पठाण यांनी यावेळी व्यक्त केली. या कामासाठी पालकांचाही मोठा पाठिंबा मिळत असून सुरक्षित वातावरणात या मुली आपल्या कलेचे सादरीकरण करत आहेत.
आपले वडील शानू पठाण यांचा समाजसेवेचा वारसा पुढे नेण्यावर मार्झिया यांचा भर आहे. "एक लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची काळजी घेणे आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणे ही माझी जबाबदारी आहे. आपण लोकांवर प्रेम केले तरच लोक आपल्याला प्रेमाने प्रतिसाद देतात," असे त्यांनी आवर्जून सांगितले. एमएसपी केअर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेला हा उपक्रम भविष्यातही असाच कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. महिलांनी दिलेल्या दुआंमुळेच सेवेचे हे कार्य अविरत सुरू असल्याची कृतज्ञताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -