इंदूरमध्ये ईव्ही चार्जिंगवेळी मोठा स्फोट; भीषण आगीत कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

इंदूरमध्ये बुधवारी पहाटे एका तीन मजली घराबाहेर इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग पॉईंटवर झालेल्या स्फोटानंतर घराला भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ८ सदस्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेने हादरलेल्या मध्य प्रदेश सरकारने तज्ज्ञांच्या समितीमार्फत या प्रकरणाच्या सविस्तर तपासाची घोषणा केली आहे. तसेच इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रजेश्वरी ॲनेक्स कॉलनीतील या घरात पहाटे ३:३० ते ४:३० च्या दरम्यान ही आग लागली, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कुंदन मंडलोई यांनी पीटीआयला दिली. या तीन मजली घराबाहेर एक कार चार्ज केली जात होती. चार्जिंग पॉईंटवर अचानक स्फोट झाला आणि कारला लागलेल्या आगीने संपूर्ण घराला कवेत घेतले, असे पोलीस आयुक्त संतोष कुमार सिंह यांनी सांगितले. घराच्या दरवाजांना इलेक्ट्रॉनिक कुलूप असल्याने पोलिसांना आत शिरणे कठीण झाले होते. घरात असलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचाही स्फोट झाला आणि त्यामुळे आग अधिकच भडकली. घरात अडकलेल्या ३ जणांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

आगीत मृत्यू झालेल्या ८ जणांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात आणले असून त्यांचे शवविच्छेदन केले जात आहे, अशी माहिती शासकीय महात्मा गांधी स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरविंद घनघोरिया यांनी दिली. तन्मय (६), राशी सेठिया (१२), सिमरण (३०), तिनू (३५), सुमन सेठिया (६०), विजय सेठिया (६५), छोटू सेठिया (२२) आणि मनोज (६५) अशी मृतांची नावे आहेत. आगीतून वाचवलेल्या दोन व्यक्तींनाही रुग्णालयात आणले होते, मात्र प्राथमिक उपचारानंतर त्यांनी दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना सुटी देण्यात आली.

राज्याचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी घटनास्थळाला भेट दिली. ईव्ही चार्जिंग सुरू असताना घराला आग लागल्याची ही घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी तज्ज्ञांच्या समितीकडून सविस्तर तपास करण्याचे निर्देश पोलीस आणि प्रशासनाला दिले आहेत. या तपासासोबतच ईव्ही चार्जिंगसाठी नवीन नियमावली तयार केली जाईल. 

सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे कल वाढत आहे. अशा परिस्थितीत ईव्ही चार्जिंग दरम्यान लागलेली आग ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, असे विजयवर्गीय म्हणाले. तसेच या भागात लहान भूखंडांवर बांधल्या जाणाऱ्या मोठ्या इमारती आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या गाड्यांमुळे रुग्णवाहिकांना येणारा अडथळा यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक रहिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.